पिंपरी : एकेकाळी पिंपरी-चिंचवडवर अधिराज्य असलेल्या पालकमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला शहर भाजपशी संघर्ष करावा लागत आहे. महायुतीमधील सत्तेत सहभागी असताना आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे जिल्ह्याचे पालकमंत्री असतानाही महापालिकेत कामे होत नसल्याने राष्ट्रवादी (अजित पवार) पक्ष आणि भाजपमध्ये सुप्त संघर्ष सुरू झाला आहे. महापालिका प्रशासनही भाजपच्या नेत्यांनी सुचविलेली कामे करत असून, राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या नेत्यांकडूनही दुर्लक्ष होत असल्याने पदाधिकाऱ्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.
एकेकाळी पिंपरी-चिंचवड शहर हा अजित पवार यांचा बालेकिल्ला अशी ओळख होती. मात्र, या बालेकिल्ल्याला भाजपने २०१७ मध्ये सुरुंग लावला. १५ वर्षांची राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता भाजपने उलथवून टाकली. आता अजित पवार भाजपसोबत सत्तेत सहभागी असले, तरी दोन्ही पक्षांनी महापालिका निवडणूक स्वबळावर लढणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यातूनच महायुती असतानाही अजित पवारांची राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये कुरघोडीचे राजकारण सुरू झाले आहे. त्याचा प्रत्यय मागील महिन्यात झालेल्या विविध विकासकामांचे भूमिपूजन आणि उद्घाटन कार्यक्रमात आला.
भाजपने विकासकामाच्या फलकांवर पवार यांचे छायाचित्र छापण्याचे टाळले. देवेंद्र फडणवीस २०१४ मध्ये मुख्यमंत्री झाल्यानंतर पिंपरी-चिंचवड शहराची खऱ्या अर्थाने ओळख झाल्याचे विधान भाजपचे आमदार महेश लांडगे यांनी केले. त्यावरून पवार यांनी फडणवीस यांच्यासमोरच लांडगे यांना सुनावले होते. त्यावरून संघर्षाची ठिणगी पडली आहे.
आता महापालिका प्रशासनही भाजप आमदारांच्याच कलाने काम करीत असल्याचा आरोप राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे. भाजपच्या माजी नगरसेवकांची तत्काळ कामे होतात; पण, राष्ट्रवादीच्या नगरसेवकांची कामे होत नाहीत. त्यांकडे दुर्लक्ष केले जाते. भाजपच्या नेत्यांबरोबर महापालिका प्रशासन बैठका घेते. परंतु, आम्हाला भेटण्यासाठी वेळ देत नाहीत. भाजपच्या आमदारांकडून प्रशासनावर राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची कामे न करण्यासाठी दबाव आणला जातो. परंतु, पक्षाकडून याकडे कोणी लक्ष देत नाही. ज्यांच्यावर शहराची जबाबदारी आहे. ज्यांच्याकडून पक्षातील कार्यकर्त्यांना अपेक्षा आहेत, तेच दुर्लक्ष करीत असल्याचे सांगत आमदार व शहराध्यक्षांबद्दलही नाराजीचा सूर बैठकीत पदाधिकाऱ्यांनी काढला. ही नाराजी अजित पवार यांच्यापर्यंत पोहोचविण्याची ग्वाही निरीक्षक सुरेश पालवे यांनी दिली.
महापालिका प्रशासन सहकार्य करत नाही. कामे केली जात नाहीत. भाजप पदाधिकाऱ्यांची कामे तत्काळ होतात, अशा तक्रारी पदाधिकाऱ्यांनी केल्या आहेत. अजित पवार यांचा व्याप वाढला आहे. त्यामुळे थोडेसे दुर्लक्ष होत असले, तरी त्यांचे स्वीय सहायक हे पक्ष कार्यालयात येऊन पदाधिकाऱ्यांच्या तक्रारी जाणून घेतात. खासदार सुनेत्रा पवार यांनीही लक्ष घातले आहे. भाजपचे चार, तर राष्ट्रवादीचा एकच आमदार आहे. त्यामुळे कामे करताना कमी-जास्त होते. -योगेश बहल, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार)