नाशिक – आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर, नाशिक-त्र्यंबकेश्वरमध्ये सुमारे १५ हजार कोटींची कामे नियोजित आहेत. गोदावरी प्रदूषण मुक्तीच्या दृष्टीने सांडपाणी प्रक्रियेसाठी काढलेली १३७४ कोटीची निविदा प्रक्रिया सत्ताधारी शिवसेना-भाजपमधील कुरघोडीच्या खेळात वादात सापडल्याने सिंहस्थाच्या पहिल्याच कामात महायुतीतील सुप्त संघर्ष चव्हाट्यावर आला आहे.
२०२७ मध्ये सिंहस्थ कुंभमेळा होणाऱ्या नाशिक जिल्ह्यात महायुतीतील वादामुळे अडीच महिने उलटूनही पालकमंत्र्याची नेमणूक झालेली नाही. मित्रपक्षांच्या आक्षेपामुळे भाजपला जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या नियुक्तीला स्थगिती देणे भाग पडले होते. तेव्हापासून चाललेले शीतयुद्ध आता कुरघोडीच्या राजकारणात परावर्तीत झाल्याचे चित्र आहे. हिंदुधर्मियांचा मोठा सहभाग असणाऱ्या कुंभमेळ्याच्या नियोजनावर खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लक्ष ठेवून आहेत. अलिकडेच नाशिक दौऱ्यात त्यांनी नियोजनाचा आढावा घेतला होता.
सिंहस्थाच्या ज्या कामांना दीड ते दोन वर्ष लागतील, ती तातडीने सुरू करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत. कुंभमेळ्यापूर्वी गोदावरी नदी प्रदूषणमुक्त करणे हा राजकीय आणि धार्मिक पटलावर कळीचा मुद्दा झाला आहे. त्या अनुषंगाने महानगरपालिकेने सांडपाण्यावर प्रक्रियेसाठी अस्तित्वातील नऊ केंद्रांचे अद्ययावतीकरण आणि दोन नव्या केंद्रांच्या उभारणीसाठी १३७४ कोटींचा प्रस्ताव तयार केला. या संबंधीची निविदा प्रक्रिया विशिष्ट ठेकेदारासाठी महानगरपालिकेने सर्वांना समान संधी न देता संशयास्पदपणे राबविल्याची तक्रार करत ती तत्काळ रद्द करण्याची मागणी शिवसेना (एकनाथ शिंदे) महानगरप्रमुख प्रवीण तिदमे यांनी केली.
याची दखल घेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नगरविकास विभागाने या निविदा प्रक्रियेची तपासणी करून सुस्पष्ट अहवाल अभिप्रायासह सादर करण्याचे आदेश दिले आहेत. या घटनाक्रमातून सिंहस्थाच्या कामातील भाजप-शिवसेनेतील विसंवाद उघड होत आहेत. सिंहस्थ नियोजनावर भाजपचा प्रभाव आहे. यासंबंधीच्या बैठकांमध्ये एखादा अपवाद वगळता मित्रपक्षांचे कुणी स्थानिक मंत्रीही दिसत नाहीत. पालकमंत्रीपदाचा योगायोग जुळून आला नसला तरी गिरीश महाजन यांचे सिंहस्थ कामांसाठी नाशिक दौरे वाढले आहेत.
मित्रपक्षांनीही पालकमंत्री पदावरील दावा सोडलेला नाही. मुख्यमंत्री येण्याआधी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाशिक दौऱ्यावर होते. तेव्हा त्यांनी नाशिकमध्ये कुंभमेळ्याची स्वतंत्र बैठक घेतली होती, या बैठकीस भाजपच्या गिरीश महाजन यांच्यासह राष्ट्रवादीचे (अजित पवार) मंत्री अनुपस्थित होते. महानगरपालिका नगरविकास विभागाच्या अंतर्गत येते. या विभागाला अंधारात ठेवून सिंहस्थाची कामे रेटली जात असल्याने शिंदे गटाने आपले उपद्रवमूल्य दाखवत कुरघोडीची तयारी केल्याचे दिसत आहे.