सोलापूर : आगामी लोकसभा निवडणुकांसाठी अजून काही महिन्यांचा अवकाश असताना इकडे सत्ताधारी भाजपचे वर्चस्व असलेल्या प्रतिष्ठेच्या माढा लोकसभा मतदारसंघात पुढील खासदार कोण, यावरून याच पक्षाचे विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर आणि आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्या समर्थकांमध्ये समाज माध्यमांतून जोरदार संघर्ष युद्ध पेटले आहे. यात निंबाळकर आणि मोहिते-पाटील यांच्या राजकीय विरोधकांनी शत्रूचा शत्रू तो आपला मित्र या न्यायाने सक्रिय भूमिका घ्यायला सुरुवात केल्यामुळे माढा लोकसभा मतदारसंघात भाजपअंतर्गत गटबाजीला जोर चढल्याचे दिसून येते.
गेल्या लोकसभा निवडणुकीत ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते-पाटील राष्ट्रवादीतून थेट भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे लोकसभेची जागा जिंकणे भाजपला सहजसुलभ झाले होते. मात्र गेल्या पाच वर्षांत पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले असून खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर आणि विजयसिंह मोहिते-पाटील यांचे पुत्र आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्यात सुप्त संघर्ष सुरू आहे. यातच मोहिते-पाटील यांचे विरोधक आणि अलिकडेच अजित पवारप्रणीत राष्ट्रवादीत गेलेले माढ्याचे आमदार बबनराव शिंदे हे आपल्या विधानसभा मतदारसंघात श्रीपूर (ता. माळशिरस) येथे रस्ता विकासाच्या लोकार्पणासाठी खासदार रणाजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्यासोबत एकत्र आले असता त्यांनी आगामी माढा लोकसभा निवडणुकीत निंबाळकर यांना दोन लाखांचे मताधिक्य मिळवून देण्याचे जाहीर केले होते. त्यामुळे माढ्याचे पुढील खासदार कोण, यावरून भाजपअंतर्गत रण माजायला सुरुवात झाली आहे.
हेही वाचा – गडचिरोलीमध्ये आदिवासी युवकांच्या आंदोलनाने भाजप नेते अस्वस्थ!
‘आमचं ठरलंय.. धैर्यशील मोहिते-पाटील हेच माढ्याचे भावी खासदार,’ अशा आशयाच्या पोस्ट मोहिते-पाटील समर्थकांनी सामाजिक माध्यमांतून मोठ्या प्रमाणावर प्रसारित करून रान पेटविले आहे. याच पार्श्वभूमीवर फलटण तालुक्यातील खासदार रणजितसिंह निंबाळकर यांचे विरोधक संजीवराजे नाईक-निंबाळकर यांनी अकलूजमध्ये शिवरत्न बंगल्यावर ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते-पाटील व त्यांच्या कुटुंबीयांची आवर्जून भेट घेऊन प्रदीर्घ खलबते केली.
खासदार निंबाळकर हे स्वतःला मोहिते-पाटील कुटुंबीयांपासून अंतर ठेवून वागतात. एवढेच नव्हे तर मोहिते-पाटील यांच्या विरोधकांशी सलगी करतात. मोहिते-पाटील यांच्या जिव्हाळ्याचा विषय राहिलेल्या कृष्णा-भीमा स्थिरीकरण प्रकल्पाच्या प्रश्नावर खासदार निंबाळकर यांनी मोहिते-पाटील यांना डावलून मुंबईत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दालनात बैठक लावली होती. त्यामुळे निंबाळकर आणि मोहिते-पाटील यांच्यातील गटबाजीचे राजकारण पेटल्याचे दिसून आले आहे. याच पार्श्वभूमीवर माढ्याचे आमदार बबनराव शिंदे व इतर मोहिते-पाटील विरोधकांशी खासदार निंबाळकर यांनी सलगी वाढविल्याचे सांगितले जाते.
२००९ साली राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आणि २०१४ साली विजयसिंह मोहिते-पाटील यांनी राष्ट्रवादीकडून लोकसभेवर प्रतिनिधित्व केलेल्या माढा लोकसभा मतदारसंघाच्या मागील २०१९ सालच्या निवडणुकीत राजकीय समीकरणे बदलली असताना भाजपचे रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या विरोधात राष्ट्रवादीतर्फे आमदार बबनराव शिंदे यांचे बंधू तथा करमाळ्याचे विद्यमान अपक्ष आमदार संजय शिंदे यांनी लढत दिली होती. त्यावेळी मोहिते-पाटील यांनी स्वतःच्या माळशिरस भागातून निंबाळकर यांना एक लाखाचे मताधिक्य मिळवून देण्याचे जाहीर करून त्यानुसार तेवढे मताधिक्य मिळवून दिले होते. तर माढा विधानसभा मतदारसंघातून संजय शिंदे यांनी केवळ सहा हजार मतांची आघाडी मिळविता आली होती. आता त्यांचे बंधू आमदार बबनराव शिंदे यांनी मोहिते-पाटील विरोधी राजकारणात खासदार निंबाळकर यांना दोन लाखांचे मताधिक्य मिळवून देण्याचे घोषित केल्यामुळे हा चर्चेचा विषय ठरला आहे. भावी खासदार म्हणून ज्यांचा उल्लेख मोहिते-पाटील समर्थकांकडून आग्रहाने केला जातो, ते धैर्यशील मोहिते-पाटील हे विजयसिंह मोहिते-पाटील यांचे पुतणे आहेत.
या सुप्त संघर्षामध्ये खासदार निंबाळकर यांनी गेल्या महिन्यात अकलूजमध्ये आगामी माढा लोकसभा निवडणुकीसाठी स्वतःची उमेदवारी जाहीर केली होती. तर इकडे मोहिते-पाटील समर्थक निंबाळकर यांच्या विरोधात रण पेटवित असले तरी मोहिते-पाटील कुटुंबीयांपैकी कोणीही भाष्य करीत नाहीत. एखाद्या मुद्यावर नेहमीच सावध राहून शेवटी भूमिका जाहीर करणारे आमदार रणजितसिंह किंवा धैर्यशील मोहिते-पाटील हे सध्या तरी शांत दिसतात. स्वतःला शिस्तप्रिय म्हणवून घेणाऱ्या भाजपमध्ये जोपर्यंत पक्षश्रेष्ठी आदेश किंवा निर्णय देत नाहीत, तोपर्यंत माढ्यात चाललेला सुप्त संघर्षयुद्ध निरर्थक असल्याचे मानले जाते.