अलिबाग : रायगडच्या पालकमंत्रीपदावरून पुन्हा एकदा महायुतीत सुप्त संघर्ष निर्माण झाला आहे. आदिती तटकरे यांना पालकमंत्रीपद मिळू नये यासाठी रायगड जिल्ह्यातील शिवसेना आमदारांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. भरत गोगावले यांच्याकडे पालकमंत्रीपद दिले जावे यासाठी भाजपच्या आमदारांनाही विश्वासात घेण्यात आले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

महाविकास आघाडी सरकारच्या काळात रायगड जिल्ह्यात पालकमंत्रीपदाचा वाद विकोपाला गेला होता. आदिती तटकरे या शिवसेना आमदारांच्या मतदारसंघात ढवळाढवळ करतात, जिल्हा नियोजनचा निधी योग्य प्रमाणात देत नाहीत, आमदारांच्या कामाचे श्रेय घेतात असे आरोप शिवसेनेच्या तिन्ही आमदारांनी त्यावेळी केले होते. शिवसेना आमदारांच्या पक्षांतर्गत उठावाला रायगडचे पालकमंत्री पद हे तात्कालिक कारण ठरले होते. याच वादामुळे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारच्या काळात शिवसेनेच्या आमदारांनी आदिती तटकरे यांना रायगडचे पालकमंत्री पद मिळू दिले नव्हते.शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसमधील संघर्ष यास कारणीभूत ठरला होता.

आणखी वाचा-मंत्री संजय शिरसाट यांचा रोख अब्दुल सत्तारांवर

या वादाचे पडसाद विधानसभा निवडणुकीत उमटले होते. कर्जत विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुधाकर घारे यांनी बंडखोरी करत अपक्ष निवडणुक लढवली होती. त्यामुळे दोन्ही पक्षातील वाद विकोपाला गेले होते. अटीतटीच्या लढतीत शिवसेनेचे महेंद्र थोरवे निवडून आले. पण निवडणुकीदरम्यान आणि निवडणूकीनंतर महेंद्र थोरवे आणि तटकरे कुटूंबियात शाब्दिक चकमकी झडत राहिल्या. त्यामुळे दोन्ही घटक पक्षातील वाद धुमसत राहीला.

राज्यमंत्रीमडळाच्या विस्तारात राष्ट्रवादी काँग्रेसच्या आदिती तटकरे यांची तर शिवसेनेच्या भरत गोगावले यांची मंत्रीमंडळात वर्णी लागली. आदिती तटकरे यांना महिला व बाल विकास विभागाचा, तर गोगावले यांना फलोत्पादन आणि रोजगार हमी विभागाचा कार्यभार सोपविण्यात आला. गोगावले यांची मंत्रिमंडळात वर्णी लागताच, शिवसेनेच्या आमदारांनी रायगडच्या पालकमंत्रीपदासाठी गोगावले यांच्यासाठी लॉबिंग करण्यास सुरूवात केली आहे. आदिती तटकरे यांना कुठल्याही परिस्थितीत रायगडचे पालकमंत्रीपद दिले जाऊ नये यासाठी राजकीय मोर्चेबांधणीला सुरवात केली आहे. भाजपच्या जिल्ह्यातील तिन्ही आमदारांना आणि पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेण्यास सुरुवात केली आहे.

आणखी वाचा-डॉ. आंबेडकरांच्या बाबतीत काँग्रेस व भाजपा दोघेही दुटप्पी; दलितांच्या प्रश्नांवर दोन्ही पक्ष उदासीन

भरत गोगावले यांनी रायगडमध्ये येताच रायगडच्या पालकमंत्रीपदासाठी शिवसेनेचे पारडे जड आहे. आणि हे पालकमंत्रीपद आमच्याचकडे रहावे यासाठी शिवसेना आग्रही असल्याचे म्हटले आहे. आदिती तटकरे यांनी अथवा खासदार सुनील तटकरे यांनी याबाबत कुठलीही प्रतिक्रीया दिली नाही. पण सुनील तटकरे यांचे राज्याच्या आणि देशाच्या राजकारणातील सध्याचे स्थान लक्षात घेता ते सहजासहजी ते जिल्ह्याचे पालकमंत्रीपद सोडणार नाहीत असे राजकीय विश्लेषकांना वाटते आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी कोणाच्या पारड्यात पडणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Conflict in mahayuti over post of guardian minister of raigad aditi tatkare bharat gogawale print politics news mrj