पुणे : खासदार गिरीश बापट यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या पुणे लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीची अद्याप घोषणा झाली नसली, तरी या मतदारसंघावरून महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बिघाडी झाली आहे. ही जागा काँग्रेसकडे असताना राष्ट्रवादी काँग्रेसनेही दावा केल्याने दोन्ही काँग्रेसने हा मतदारसंघ प्रतिष्ठेचा केला आहे. पुणे हवे असेल, तर बारामती काँग्रेसला देणार का, असा सवाल काँग्रेसने केल्याने पुण्यात दोन्ही काँग्रेसमधील अंतर्गत कलह विकोपाला गेला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जिल्ह्यातील चार लोकसभा मतदारसंघांपैकी पुणे काँग्रेसकडे, तर शिरुर, बारामती आणि मावळ हे तीन मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहेत. मात्र, पुणे मतदारसंघावरही राष्ट्रवादी काँग्रेसने दावा केला आहे. माजी महापौर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांना उमेदवारी देण्याचा आग्रह धरण्यात येत आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही जगताप यांच्या उमेदवारीला पसंती दर्शविली आहे. त्यामुळे काँग्रेसमध्ये अस्वस्थता पसरली आहे. काँग्रेसकडून माजी आमदार मोहन जोशी, प्रभारी शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांची नावे चर्चेत आहेत.

हेही वाचा – बाजार समितीसाठी अशोक चव्हाण यांचा दोन आठवडे नांदेडमध्ये मुक्काम

राष्ट्रवादी काँग्रेसकडून पुणे मतदारसंघासाठी आग्रह धरण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे प्रभारी शहराध्यक्ष अरविंद शिंदे म्हणाले, ‘पुण्याची जागा ही काँग्रसकडे आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने महाविकास आघाडीचा धर्म पाळला पाहिजे. राष्ट्रवादी काँग्रेस ही पुण्याच्या जागेवर दावा करत असेल, तर बारामती लोकसभा मतदारसंघ काँग्रेसला देणार का, असा सवाल काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून केला जाऊ लागला आहे’. काँग्रेस पुण्याच्या जागेसाठी ठाम असताना राष्ट्रवादी काँग्रेसकडून या जागेसाठी का दावा करण्यात येत आहे, याबाबत शहर प्रवक्ते प्रदीप देशमुख म्हणाले, ‘पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे वडगाव शेरी आणि हडपसरमध्ये आमदार आहेत. शहर आणि उपनगरी भागात पक्षाची ताकद आहे. त्यामुळे पुण्याच्या जागेची मागणी करण्यात येत आहे. प्रशांत जगताप यांना उमेदवारी मिळाल्यास विजयाची खात्री आहे.

पक्षाचे अस्तित्व दाखविण्यासाठी…

पुणे लोकसभा मतदारसंघांमध्ये कोथरुड, शिवाजीनगर, कसबा, वडगाव शेरी, पर्वती आणि पुणे कॅन्टोन्मेंट हे सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यापैकी वडगाव शेरीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनिल टिंगरे हे आमदार आहेत. कसब्यात काँग्रेसचे रवींद्र धंगेकर हे आमदार आहेत. उर्वरित चारही मतदारसंघ भाजपकडे आहेत. कोथरुडमध्ये पालकमंत्री चंद्रकांत पाटील, शिवाजीनगरमध्ये सिद्धार्थ शिरोळे, पर्वतीत माधुरी मिसाळ आणि पुणे कॅन्टाेन्मेंटमध्ये सुनिल कांबळे हे आमदार आहेत. आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाचे अस्तित्व दाखवून देण्यासाठी दोन्ही काँग्रेसकडून पुण्याच्या जागेचा आग्रह धरण्यात येत असल्याचे राजकीय वर्तुळातून सांगण्यात आले.

हेही वाचा – ड्रायपोर्टवरून कोल्हापूर आणि सांगलीच्या खासदारांमध्ये चढाओढ

प्रशासनाकडून मतदान केंद्रांचा आढावा

या मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाकडून अद्याप कोणतेही आदेश आलेले नाहीत. मात्र, जिल्हा प्रशासनाकडून तयारी सुरू करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी जिल्हा निवडणूक शाखेची बैठक घेऊन मतदान केंद्रांचा आढावा घेतला आहे. या मतदारसंघाच्या परिसरात मेट्रो मार्गिका आणि स्थानकांची कामे सुरू असल्याने अनेक मतदान केंद्रांमध्ये बदल करावे लागणार आहेत. मतदान केंद्रे स्थलांतरित करण्याची गरज आहे का, तसेच मतदारयादी, मतदान यंत्रे आदींचा आढावा जिल्हाधिकाऱ्यांकडून घेण्यात आला आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Conflict in pune even before the by elections announcement print politics news ssb
Show comments