एजाजहुसेन मुजावर
शिवसेनेचे शिवसंपर्क अभियानाचा सोपस्कार सोलापूर जिल्ह्यात पूर्ण झाला. त्यातून अपेक्षेनुसार शिवसेनेची संघटनाबांधणी, नवी उभारी मिळण्यापेक्षा पक्षातील गटबाजीच समोर आली. भाजपसारखा तगडा पक्ष समोर असताना जिल्ह्यात महाविकास आघाडीत मात्र शिवसेना फोडत राष्ट्रवादी वाढवण्याचे काम सुरू आहे. कधीकाळी जिल्ह्यात चार आमदार असलेल्या शिवसेनेला सत्ता येऊनही उभारी घेता आलेली नाही.खासदार श्रीरंग बारणे हे शिवसंपर्क अभियान घेऊन सोलापुरात आले होते. तर माढा-करमाळा भागात पक्षाचे निरीक्षक अनिल कोकीळ यांनी मुंबईहून येऊन पक्षाच्या कामाचा आढावा घेतला. तेथेही पक्षातील वाद उफाळून आला. सोलापुरात पुरूषोत्तम बरडे, संभाजी शिंदे, धनंजय डिकोळे आणि गणेश वानकर असे चार जिल्हाप्रमुख आहेत. जिल्हा संपर्क प्रमुखाचे पद रिकामेच आहे. त्यामुळे जिल्हाप्रमुखांवर ज्या त्या विभागांची जबाबदारी निश्चित असली तरीही त्यांच्यात ताळमेळ राहिला नाही.
गेल्या अडीच वर्षांपासून उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात महाविकास आघाडी सरकार सत्तेवर असताना त्याचा फायदा पक्ष बांधणी मजबूत होण्यासाठी होत नाही. तसा प्रयत्नही होताना दिसत नाही. पक्षाच्या प्रमुख पदाधिका-यांचे प्राधान्य स्वतःचे उखळ पांढरे करून घेण्यापर्यंत सीमित राहिले आहे. त्याबद्दलची खदखद आणि अस्वस्थता काही निष्ठावंत शिवसैनिकांनी शिवसंपर्क अभियानात उघड केली. त्याची दखल कितपत घेतली जाईल, याचीही शंका असल्याचे सामान्य शिवसैनिकच सांगतात. कारण शिवसंपर्क अभियानाच्या बैठकीत अडचणीचे म्हणजे गैरसोयीचे प्रश्न मांडणा-या शिवसैनिकांना बोलू न देता टपली मारून खाली बसविण्याचे प्रकार घडले. सोलापूर जिल्ह्यात काही वर्षापूर्वी माजी मंत्री उत्तमप्रकाश खंदारे (उत्तर सोलापूर), रतिकांत पाटील (दक्षिण सोलापूर), राजेंद्र राऊत (बार्शी) आणि जयवंत जगताप (करमाळा) असे चार आमदार निवडून गेले होते. त्याचा लाभ पक्षवाढीसाठी होणे अपेक्षित होते. कारण स्थानिक पातळीवर पक्षासाठी तो वैभवाचा काळ होता. पण झाले भलतेच. पक्षाला कधीही उभारी घेता नाही. कुर्डूवाडीसारख्या शहरात शिवसेनेची अनेक वर्षांपासूनची सत्ता अबाधित आहे. तेवढाच काय तो दिलासा. पण अलिकडे त्याच कुर्डूवाडी-माढा भागात शिवसेना पोखरली आहे. विशेषतः जिल्हाप्रमुख धनंजय डिकोळे यांनी प्रस्थापित राष्ट्रवादीच्या नेत्यांशी सलगी केल्यामुळे करमाळा विधानसभा निवडणुकीत कुर्डूवाडीतून कमी मते मिळाल्याने शिवसेनेला पराभव पत्करावा लागला होता. त्याची सल आजही शिवसैनिकांना वाटते. शिवसंपर्क अभियानात त्याकडे पक्ष निरीक्षक कोकीळ यांचे लक्ष वेधले असता जिल्हाप्रमुख डिकोळे दुखावले आणि तक्रारदारांवर संतापले.
इकडे सोलापुरात खासदार बारणे यांच्या बैठकीतही युवा सेनेतील वाद समोर आला. युवा सेना जिल्हाप्रमुख मनीष काळजे यांच्यावर पक्षांतर्गत गटबाजीतून वानकर गटाने दोनवेळा हल्ला केला होता. एकदा तर त्यांना पक्षाच्या मेळाव्यातून हुसकावून लावण्यात आले होते. तर माजी जिल्हाप्रमुख लक्ष्मीकांत ठोंगे यांच्यावर मारहाणीचा प्रसंग बेतला होता. अशी ही खुन्नसबाजी वाढली असताना दुसरीकडे माजी महापौर महेश कोठे हे पक्ष सोडून राष्ट्रवादीत गेले. कोठे यांना मानणारे आणखी बरेच माजी नगरसेवक शिवसेनेपासून अंतर ठेवून आहेत. येत्या काही दिवसांत शिवसेनेत आणखी फाटाफूट होण्याची चिन्हे दिसत असताना त्याबद्दल पक्षाच्या जिल्हाप्रमुखांना काहीच गांभीर्य वाटत नाही. शहराच्या पूर्व भागात काही वर्षापूर्वी शिवसेना विस्तारली होती. तेथे आता खराब स्थिती दिसून येते.
विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी इतर पक्षातून शिवसेनेत नव्याने आलेल्यांपैकी सहसा कोणीही पक्षात सक्रिय नाहीत. बार्शीचे नेते दिलीप सोपल हेदेखील आताच शिवसंपर्क अभियानाच्या निमित्ताने सक्रिय झालेले दिसतात. त्यांनी पक्ष निरीक्षकांची भेट घेऊन जिल्ह्यासाठी संपर्क प्रमुख नियुक्त करण्याची मागणी केली. पूर्वीचे संपर्क प्रमुख तानाजी सावंत गेल्या दोन वर्षांपासून मोकळे आहेत. खरे तर त्यांच्या काळातच जिल्ह्यात पक्षांतर्गत गटबाजीने जोरात सुरू झाली. जिल्ह्यात जिव्हाळ्याचे अनेक विकासाचे प्रश्न रखडले आहेत. त्यावर शिवसेना सक्रिय होऊन पाठपुरावा करीत नाही. पक्षाला काही कृती कार्यक्रमच जर नसेल तर स्थानिक विकासाच्या प्रश्नावर तरी काय करणार, असे शिवसैनिकच विचारतात. महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्या आणि नगरपालिका निवडणुकांच्या तोंडावर शिवसेनेची अवस्था जैसे थे राहिल्याने शिवसंपर्क अभियानातून पुढील भवितव्याची अपेक्षा करणे भाबडेपणाचे ठरणार असल्याची चर्चाही शिवसेनेत ऐकायला मिळते.