संतोष प्रधान
राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम करणार नाही याचा पुनरुच्चार विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केल्याने त्यांच्याबद्दल गेले काही दिवस सुरू असलेला संभ्रम आता तरी दूर होणार का, असा सवाल उपस्थित केला जात आहे. अजित पवार यांच्याबद्दल केले काही दिवस संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे. पवार हे राष्ट्रवादी सोडून भाजपसोबत जाणार, अशी चर्चा सुरू झाली होती. अजितदादा अस्वस्थ आहेत, असा ठाम दावा केला जात होता. अजित पवार ४० आमदारांना बरोबर घेऊन जाणार अशीही हवा निर्माण करण्यात आली होती. पण या साऱ्या अंदाजांवर अजित पवार यांनी खुलासा करीत राष्ट्रवादी सोडण्याचा कोणताही विचार नसल्याचे स्पष्ट केले.
देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबरील पहाटेच्या शपथविधीनंतर अजित पवार यांच्याबद्दल निर्माण झालेले संशयाचे मळभ अद्यापही दूर झालेले नाही. अजित पवार कधीही भाजपबरोबर जाऊ शकतात, अशी शक्यता व्यक्त केली जाऊ लागली. राष्ट्रवादीचे विधानसभेत ५३ आमदार आहेत. पक्षांतरबंदी कायद्याच्या कचाट्यातून सुटण्याकरिता दोन तृतीयांश म्हणजे ३६ आमदारांचा पाठिंबा मिळवावा लागेल. त्यातूनच अजित पवार यांना ४० आमदारांचा पाठिंबा असल्याची आवई उठविण्यात आली. पक्षातील सूत्रांच्या माहितीनुसार, अजित पवार यांच्याकडे आमदारांचे तेवढे संख्याबळ नाही. नोव्हेंबर २०१९ मध्ये त्यांचे बंड फसले होते. पुन्हा पक्षात बंड करायचे असल्यास सारी खबरदारी घ्यावी लागणार आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडाची कोणालाही कुणकूण लागली नव्हती. याउलट अजित पवार वेगळी भूमिका घेणार अशी चर्चा सुरू झाल्याने सारेच सावध झाले होते.
हेही वाचा… सांगली बाजार समितीची निवडणूक लक्षणीय
भाजपच्या हाती एकनाथ शिंदे लागल्याने भाजपला आता तरी अजित पवार यांची तेवढी आवश्यकता नाही. तसेच सरकार स्थिर असून, पुरेसे संख्याबळ आहे. भाजपला चिंता लोकसभा निवडणुकीची आहे. महाविकास आघाडीतील तीन घटक पक्ष एकत्र लढल्यास यासमोर कितपत निभाव लागेल याची भाजपाला अधिक चिंता आहे. यामुळेच महाविकास आघाडीत फूट पाडण्याची भाजपची योजना आहे.
हेही वाचा… अमरावतीत नव्या राजकीय समीकरणांची नांदी
अजित पवार यांनी त्यांच्या बद्दलचा निर्माण झालेला संशय दूर करून राष्ट्रवादी सोडणार नाही अशी ग्वाही दिली. यामुळे अजितदादांबद्दल निर्माण झालेला संभ्रम दूर होणार का, याची उत्सुकता आहे. कारण नेत्यांची वक्तव्ये आणि प्रत्यक्ष कृती यात बरेच अंतर असते. अजित पवार यांनी सफाई दिली असली तरी २०२४च्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी काही धमाके फुटतील, असा दावा भाजपकडून केला जात आहे.