पुणे : पुणे लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक घेण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिल्यानंतर प्रत्यक्षात निवडणूक होणार की नाही याबाबत संभ्रमावस्था असली, तरी पुण्यातील राजकीय पक्षांच्या तयारीला वेग आला आहे. भाजपामध्ये उमेदवारीचा तिढा, तर काँग्रेसमध्ये गटबाजीला उधाण आले आहे. ही संधी साधून राष्ट्रवादी काँग्रेसही निवडणूक लढवण्याच्या तयारीत असल्याने महाविकास आघाडीत बिघाडीचे चित्र आहे. भाजप आणि काँग्रेस या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांबरोबरच मनसेही निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याने तिरंगी लढतीची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
निवडणूक आयोगाकडून सर्वोच्च न्यायालयात अपील केल्यानंतर पोटनिवडणूक लांबणीवर पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र, एप्रिल २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकांच्यादृष्टीने पुण्यात राजकीय पक्षांनी तयारीला सुरुवात केली आहे.
हेही वाचा – एक ओबीसी, तर एक हिंदुत्वाचा चेहरा; भाजपाने छत्तीसगडला दिलेले दोन उपमुख्यमंत्री कोण आहेत?
भाजपमध्ये तीन तिघाडा
गिरीश बापट यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर भाजपकडून तीन प्रमुख उमेदवार असल्याची चर्चा आहे. त्यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक आणि भाजपाचे माजी राष्ट्रीय सचिव सुनील देवधर, माजी आमदार जगदीश मुळीक आणि माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांचा समावेश आहे. उमेदवारीबाबत तिढा निर्माण झाल्याने भाजप कोड्यात पडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गट हा भाजपच्या साथीला असल्यामुळे भाजपची ताकद आणखी वाढली आहे. त्यामुळे भाजपच्या उमेदवाराला ही निवडणूक सोपी जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र तिन्हीपैकी कोणाला उमेदवारी द्यायची, असा प्रश्न भाजपपुढे पडला आहे.
काँग्रेसमध्ये गटबाजी, ‘राष्ट्रवादी’चा उमेदवारीवर दावा?
पुण्यातील काँग्रेसला गटबाजीची लागण झाली आहे. माजी आमदार मोहन जोशी आणि रमेश बागवे यांचा एक गट असून, प्रभारी शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांचा दुसरा गट आहे. या दोन्ही गटांकडून उमेदवारीची नावे पुढे केली जात आहेत. त्यामध्ये माजी आमदार मोहन जोशी, कसब्याचे आमदार रवींद्र धंगेकर, माजी शहराध्यक्ष अभय छाजेड, प्रभारी शहराध्यक्ष शिंदे यांची नावे चर्चेत आहेत. काँग्रेसमध्ये सुरू असलेली गटबाजी पाहून राष्ट्रवादी काँग्रेसनेही उमेदवारीवर दावा करण्याची तयारी सुरू केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून विद्यमान राज्यसभा खासदार वंदना चव्हाण यांचे नाव चर्चेत आले आहे. याबाबत खासदार चव्हाण म्हणाल्या, “मी लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक नाही. मात्र, पक्षाने जबाबदारी दिल्यास ती पार पाडावी लागेल”.
हेही वाचा – आठ कोटींमुळे भाजपाच्या खासदार किरण खेर वादाच्या भोवऱ्यात; नेमकं प्रकरण काय?
मनसे उमेदवाराच्या शोधात
मनसेकडून गेल्या वर्षभरापासून लोकसभा निवडणुकीच्यादृष्टीने तयारी करण्यात येत आहे. त्यासाठी मनसेचे नेते अमित ठाकरे यांच्यावर जबाबदारी देण्यात आली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून अमित ठाकरे पुण्यात येऊन पदाधिकाऱ्यांशी सातत्याने बैठका घेत आहेत. मात्र उमेदवाराबाबत मनसेपुढे प्रश्न पडला आहे. माजी नगरसेवक वसंत मोरे यांच्याकडून ‘भावी खासदार’ अशी फलकबाजी शहरभर करण्यात आली असली, तरी पक्षाअंतर्गत त्यांच्या नावाला विरोध आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीसाठी सक्षम उमेदवार निवडण्याचे आव्हान मनसेपुढे उभे राहिले आहे. मनसेमुळे निवडणूक तिरंगी होण्याची शक्यता आहे.
पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी, ‘नको रे बाबा!’
भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसेमध्ये इच्छुक उमेदवार असले, तरी पोटनिवडणूक झाल्यास अडीच महिन्यांसाठी उमेदवारी नको रे बाबा, असा सूर इच्छुक उमेदवारांकडून काढला जात आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पोटनिवडणूक झाली, तर जेमतेम अडीच महिन्यांचा कालावधी मिळणार आहे. त्यामुळे अडीच महिन्यांसाठी खासदारकी नको, असे इच्छुकांकडून बोलले जात आहे.