अदानी समुहावरून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पदवीवरून विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मित्र पक्ष काँग्रेस व शिवसेनेच्या विरोधात भूमिका घेतली आहे. राफेल विमान खरेदीपाठोपाठ अदानी या दोन वादग्रस्त व वादळी ठरलेल्या प्रश्नांवर पवारांच्या भूमिकेवरून संभ्रमच तयार झाला आहे.
भाजपच्या विरोधात सध्या राज्यात महाविकास आघाडीच्या वतीने वज्रमूठ सभांचे आयोजन करण्यात आले आहे. छत्रपती संभाजीनगरमधील पहिल्या सभेत भाजप सरकारला लक्ष्य करण्यात आले. केंद्रात बिगर भाजप पक्षांच्या आघाडीत सहमती घडवून आणण्याकरिता शरद पवार यांनी पुढाकार घेतला होता. मध्यंतरी पवारांच्या नवी दिल्लीतील निवासस्थानी विरोधी नेत्यांची बैठक झाली होती. मात्र, पवार काका-पुतण्याने भाजपला अनुकूल अशी भूमिका घेतल्याने संशयाचे वातावरण तयार झाले आहे.
हेही वाचा – भाजपच्या संसदीय पक्षाच्या उद्या होणाऱ्या बैठकीकडे कर्नाटकातील इच्छुकांच्या नजरा
अदानी उद्योग समुहावर झालेल्या आरोपांच्या संयुक्त संसदीय चौकशीच्या मागणीवरून काँग्रेस व अन्य विरोधी पक्षांनी आक्रमक भूमिका घेतली. यातून अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे कामकाज वाया गेले. अदानी समुहाच्या विरोधात संसदेच्या प्रांगणात विरोधी पक्षांनी केलेल्या आंदोलनाच्या वेळी राष्ट्रवादी दूर होता. शरद पवार यांनी तर अदानी समुहाला लक्ष्य केले जात असल्याचे मत मांडले. तसेच संयुक्त संसदीय समितीच्या काँग्रेसच्या मागणीच्या विरोधात मतप्रदर्शन केले. अदानीवरून १९ राजकीय पक्षांचे एकमत झाले असून, राष्ट्रवादीची भूमिका वेगळी असू शकते, असे काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते जयराम रमेश यांनी स्पष्ट केले.
‘राफेल’ वरूनही पवारांचा संभ्रम
पाच वर्षांपूर्वी राफेल विमान खरेदीवरून असाच गोंधळ झाला होता. संसदेत व संसदेच्या बाहेर काँग्रेसने राफेल विमान खरेदीत भ्रष्टाचाराचा आरोप केला होता. तेव्हाही पवारांनी भाजपला अनुकुल अशीच भूमिका घेतली होती. ‘राफेल विमान खरेदीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हेतूबद्दल शंका व्यक्त करता येणार नाही’ असे विधान शरद पवार यांनी केले होते. राफेल विमान खरेदीत पवारांनी मोदी यांना अनुकूल अशी भूमिका घेतल्याची टीका होऊ लागताच मी काही मोदी यांना अभय दिलेले नाही, अशी सारवासारव तेव्हा पवारांनी केली होती.
मोदींच्या पदवीवरून अजितदादांचे समर्थन
पंतप्रधान मोदी यांच्या पदवीवरून वाद निर्माण झाला असता काँग्रेस तसेच शिवसेनेने मोदी यांना लक्ष्य केले होते. गेल्या रविवारी महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पदवीवरून मोदी यांना टोला लगावला. काँग्रेसने तर मोदींच्या पदवीचा मुद्दाच केला आहे. मात्र, मोदी यांच्या पदवीचा मुद्दा आताच उकरून काढणे योग्य नाही, अशी काँग्रेस व शिवसेनेच्या विरोधात भूमिका विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी घेतली. तसेच मोदी यांचा जनाधार वाढल्याचेही त्यांनी सांगितले. अजित पवार यांच्या या भूमिकेबद्दल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी टीका केली होती.