पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत काँग्रेस पक्षाने गुरुवारी (२४ एप्रिल) आपत्कालीन बैठक बोलावली. पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर काँग्रेसने भाजपाविरोधी प्रतिक्रिया देणे टाळले होते. मात्र, काँग्रेसने गुरुवारी सुरक्षेतील त्रुटीचा मुद्दा उपस्थित केला. तसेच या हल्ल्याचा गैरवापर करून भाजपा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर करून आणखी मतभेद, द्वेष, ध्रुवीकरण आणि फूट पाडत आहे, असा आरोप काँग्रेसने केला आहे. काँग्रेस कार्यकारिणी समितीच्या बैठकीत कोणत्या मुद्यांवर चर्चा झाली? काँग्रेसने भाजपावर काय आरोप केलेत? त्याविषयी जाणून घेऊ.
काँग्रेस कार्यकारिणी समितीची बैठक
काँग्रेस कार्यकारिणी समितीच्या (सीडब्ल्यूसी) आपत्कालीन बैठकीत दक्षिण काश्मीरच्या पहलगाममध्ये पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याबद्दल, सरकारच्या प्रतिसादावर आणि पुढील मार्गावर चर्चा करण्यात आली. काँग्रेसने सर्वपक्षीय बैठक बोलावण्याचीही मागणी केली. मात्र, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी या सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित राहणार नाहीत असे संकेत होते. कार्यकारिणीचे मत होते की, विरोधी पक्षाचे दोन्ही नेते म्हणजेच खरगे आणि राहुल गांधी यांनी सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित राहावे आणि पक्षाचे विचार मांडावेत.
त्यानुसार काल झालेल्या बैठकीत दोघेही उपस्थित राहिले. अखिल भारतीय काँग्रेस समिती (एआयसीसी) चे कोषाध्यक्ष अजय माकन यांनी दोन्ही विरोधी पक्षनेत्यांनी बैठकीला उपस्थित राहावे, असे स्पष्ट मत व्यक्त केले. होते त्यांच्या मताचे समर्थन करत अभिषेक सिंघवी म्हणाले होते की, जर पंतप्रधान बैठकीला उपस्थित राहत नसतील, तर विरोधी पक्षनेत्यांनी बैठकीला उपस्थित राहणे महत्त्वाचे आहे.
पहलगाम हल्ल्यानंतर काँग्रेसने गुप्तचर आणि सुरक्षा अपयशांबद्दल कोणतीही टीका केली नाही. खरगे यांनी या हल्ल्याबाबत बोलताना म्हटले होते, “पक्षपाती राजकारण करण्याची ही वेळ नाही. ही वेळ आहे दहशतवादी हल्ल्यातील गुन्हेगारांना न्याय मिळवून देऊन प्राण गमावलेल्या नागरिकांच्या शोकाकुल कुटुंबांना न्याय मिळवून देण्यासाठी संकल्प करण्याचा.”
काँग्रेस नेत्यांची पक्षश्रेष्टींकडे मागणी काय?
केंद्रीय कार्यकारिणी समितीच्या बैठकीत बहुतांश नेत्यांचे असे मत होते की, पक्षाने सुरक्षा आणि गुप्तचर समस्यांवरही प्रकाश टाकावा. केंद्रीय कार्यकारिणी समितीने आपल्या ठरावात म्हटले, “पहलगाम हे कडक सुरक्षा असलेले क्षेत्र आहे. या क्षेत्रात त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था आहे.केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अखत्यारीत येणाऱ्या केंद्रशासित प्रदेशात असे हल्ले होत असल्यास गुप्तचराचे अपयश आणि सुरक्षा त्रुटींचे विश्लेषण करणे आवश्यक आहे. हे प्रश्न उपस्थित करणे महत्त्वाचे आहे. ज्या कुटुंबांचे जीवन उद्ध्वस्त झाले आहे त्यांना खरोखर न्याय मिळवून देण्याचा हा एकमेव मार्ग आहे.” दहशतवादी हल्ल्यातून वाचलेल्या अनेकांनी म्हटले आहे की दहशतवाद्यांनी हिंदूंना मारण्यापूर्वी त्यांचा धर्म विचारला, परंतु अद्याप काँग्रेसकडून याचा उल्लेख केला गेला नाही.
सीडब्ल्यूसीने म्हटले आहे की, “पाकिस्तानने घडवलेला हा भ्याड हल्ला आणि ठरवून केलेले दहशतवादी कृत्य आपल्या प्रजासत्ताकाच्या मूल्यांवर थेट हल्ला आहे. देशभरात हिंदूंना जाणूनबुजून लक्ष्य करून भावना भडकवल्या गेल्या आहेत.” त्यांनी पुढे म्हटले, सीडब्ल्यूसी शांततेचे आवाहन करते आणि सीमेपलीकडून होणाऱ्या दहशतवादाचा एकतेने मुकाबला करण्याच्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा संकल्प पुन्हा अधोरेखित करते.”
अमरनाथ यात्रेच्या सुरक्षेची मागणी
त्यांनी आगामी अमरनाथ यात्रेतील यात्रेकरूंना सुरक्षा प्रदान करण्याची गरज असल्याचेदेखील सांगितले. बुधवारी खरगे यांनी आपल्या निवेदनात अमरनाथ यात्रेकरूंचे संरक्षण केले पाहिजे आणि सुरक्षा अधिक कडक केली पाहिजे अशी मागणी केली. केंद्रीय कार्यकारिणी समितीनेही यावर म्हटले, “भारतभरातून लाखो यात्रेकरू दरवर्षी या यात्रेत सहभागी होतात आणि त्यांच्या सुरक्षेला अधिक प्राधान्य दिले पाहिजे.” त्यांनी म्हटले, एकही क्षण न गमावता सक्रिय सुरक्षा व्यवस्था व्यवस्थापित केली पाहिजे. यात्रेकरूंच्या सुरक्षिततेचे, जम्मू आणि काश्मीरमधील लोकांचे जीवनमान याचा गांभीर्याने विचार केला गेला पाहिजे. जम्मू आणि काश्मीरमधील बहुतांश लोक पर्यटनावर अवलंबून आहेत,” असे त्यात म्हटले आहे.
काश्मिरी स्थानिकांच्या शौर्याची स्तुती
सीडब्ल्यूसीने म्हटले, ” सीडब्ल्यूसी स्थानिक पोनीवाले आणि नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करते. त्यांच्यापैकी एक भारतीय पर्यटकांचे रक्षण करण्याच्या प्रयत्नात शहीद झाला.” सूत्रांनी माहिती दिली की, अनेक काँग्रेस नेत्यांनी भाजपाशी संबंधित सोशल मीडिया हँडलवरील काही पोस्टवर टीका केली. त्यात भाजपाच्या छत्तीसगडमधील एक्स हँडलने टाकलेल्या पोस्टचाही समावेश आहे.
सीडब्ल्यूसीने म्हटले, “या हल्ल्याचा जम्मू आणि काश्मीरमधील सर्व राजकीय पक्षांकडून आणि तेथील नागरिकांकडून निषेध करण्यात आला आहे. परंतु, हे धक्कादायक आहे की भाजपा त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे या दुर्घटनेचा फायदा घेऊन मतभेद, ध्रुवीकरण, द्वेष आणि फूट पाडत आहे. परंतु, आता एकता सर्वात जास्त महत्त्वाची आहे.”