इंडिया आघाडीवर सतत संकट कोसळत आहे. आधी पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जी यांनी ‘एकला चालो’चा दिलेला नारा, त्यानंतर पंजाबमध्ये भगवंत मान यांचा एकटे लढण्याचा निर्णय आणि आता नितीश कुमार यांच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा या सर्व घडामोडी इंडिया आघाडीमध्ये फूट पडत असल्याचा इशारा करत आहे. इंडिया आघाडीला या गोष्टींचा फटका बसत आहे, असे काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी शनिवारी कबूल केले. यात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांच्यासोबत चर्चा करणार असल्याचे आणि इतर मित्रपक्षांसोबत एक-दोन दिवसांत जागावाटपावर शिक्कामोर्तब करणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
राहुल गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे ममता बॅनर्जी यांचा आदर करत असून पक्षाने त्यांना पुन्हा एकदा राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेत सामील होण्याचे आवाहन केले. ही यात्रा रविवारी उत्तर बंगालमधील जलपाईगुडी येथून दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा सुरू होत आहे. खर्गे यांनी बॅनर्जी यांना पत्रही लिहिले आहे. “काही गैरप्रकार यात्रेत घडू शकतात आणि यात्रेसाठी अडचणी निर्माण करू शकतात, अशी शक्यता वर्तवली जात आहे. बंगालमधून ही यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी आणि राहुल गांधींसह यात्रेकरूंची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी” त्यांच्या बाजूने योग्य निर्देश देण्यात यावे, अशी मागणी या पत्राद्वारे करण्यात आली आहे.
विशेष म्हणजे खर्गे यांनी लिहिले की, “मला याची जाणीव आहे की, गांधी कुटुंब आणि तुमचे अतिशय सौहार्दपूर्ण संबंध आहेत आणि तुम्ही खात्री कराल की सर्व सुरक्षेशी संबंधित समस्या पुरेशापणे हाताळल्या जातील.”
इंडिया आघाडी सध्या संकटात सापडली असल्याचे चित्र आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार गटातून बाहेर पडून एनडीएमध्ये परतण्याच्या तयारीत आहेत, तर ममता बॅनर्जी आणि आम आदमी पार्टीचे भगवंत मान यांनी त्यांच्या राज्यांमध्ये काँग्रेससोबत जागावाटप नाकारली आहे.
खर्गे यांनी दोन-तीनदा नितीशकुमार यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण त्यांच्याशी संपर्क साधता आला नसल्याचीही कबुली काँग्रेसने दिली. यात बिहारमधील काँग्रेस आमदारांच्या एका गटाशी संपर्क होऊ शकला नसल्याच्या वृत्तादरम्यान, पक्षाने छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांना विशेष निरीक्षक म्हणून पटणा येथे पाठवण्याचा निर्णय घेतला.
“परिस्थिती चांगली होऊ शकते, ही स्थिती तणावपूर्ण आहे असे मी म्हणणार नाही. एक पक्ष सोडून जात आहे, भाजपासोबत सरकार स्थापन करण्याच्या तयारीत आहे. एक पक्ष आमच्यावर नाराज आहे, अशा अनेक बातम्या येत आहेत आणि लोकं पाहत आहेत…. दिखता अच्छा नहीं है, इंडिया की छवी के लिए अच्छा नही है”, असे काँग्रेसचे संपर्कप्रमुख जयराम रमेश यांनी पत्रकारांना सांगितले. मात्र, युती तुटत नसल्याचेही जयराम रमेश म्हणाले.
जेडी(यू)च्या वरिष्ठ प्रवकत्याचा काँग्रेसवर आरोप
जेडी(यू)चे वरिष्ठ राष्ट्रीय प्रवक्ते के. सी. त्यागी म्हणाले की, इंडिया आघाडी तुटण्याच्या मार्गावर आहे. “पंजाब, बिहार आणि पश्चिम बंगालमध्ये जवळपास कोणतीही युती नाही… नितीश कुमार हे ज्या प्रयत्नाने आणि हेतूने इंडिया आघाडीत सामील झाले होते, ती काँग्रेसच्या बेजबाबदार आणि हट्टी वृत्तीमुळे तुटण्याच्या मार्गावर आहे. निवडणुकीला जेमतेम दीड महिना उरला आहे, पण एकही नेता नाही, निमंत्रक नाही, संयुक्त बैठका नाही, जाहीरनामा नाही…” असे त्यागी म्हणाले.
यावर जयराम रमेश यांनी स्पष्ट केले की, “ही काही फूट नाहीये. लोक आपली मते मांडत आहेत. त्यांच्या स्वतःच्या गरजा असू शकतात. पण माझा विश्वास आहे की, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्र्यांचे काही प्रश्न आहेत, त्यांनी काही चिंता व्यक्त केल्या आहेत. त्यांनी सांगितले की, त्यांना एकटे लढायचे आहे. माझ्या सहकाऱ्यांनी केलेल्या काही टिप्पण्यांबद्दल त्यांनी आक्षेप व्यक्त केले आहेत. पण, भाजपाशी तडजोड न करता लढणार असल्याचेही सांगितले आहे. त्यामुळेच आम्हाला आशा आहे की, शेवटी आम्ही एक मध्यम मार्ग शोधू.”
ते पुढे म्हणाले, “मी मध्यम मार्गाचा शोध सोडलेला नाही. आपण मला वैयक्तिकरित्या विचारल्यास, युती अधिक चांगली होऊ शकली असती. पण, यात कुठेही फूट पडलेली नाही. इंडिया आघाडीत मोठी फूट पाडण्यासाठी भाजपा प्रयत्न करत आहे, याची मला खात्री आहे. ” रमेश म्हणाले की, बॅनर्जी आणि नितीश कुमार हे इंडिया आघाडी तयार करणारे सहकारी होते. बिहारच्या मुख्यमंत्र्यांनीच गेल्या जूनमध्ये पटणा येथे त्यांच्या निवासस्थानी युतीची पहिली बैठक आयोजित केली होती.
बंगालमध्ये इंडिया आघाडी एकत्र लढेल
रमेश म्हणाले, काँग्रेसला आशा आहे की बंगालमध्ये इंडिया आघाडी एकत्र लढेल. काँग्रेसमुळे इंडिया आघाडीमध्ये जागावाटप होण्यास उशीर होत असल्याच्या बातम्याही त्यांनी फेटाळून लावल्या. अनेक मतदारसंघांवर पक्षांमध्ये करार झाला असल्याचेही ते म्हणाले.
त्यांनी सांगितलेल्या व्यवस्थेबद्दल विचारले असता, रमेश म्हणाले, “मी तुम्हाला अचूक संख्या देऊ शकत नाही. उदाहरणार्थ, महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना (उद्धव ठाकरे गट) आणि काँग्रेस किती जागा लढवणार हे ठरले आहे. तमिळनाडू आणि झारखंडमध्ये इंडिया आघाडीची चांगली स्थिती आहे. यूपीमध्ये संख्या अजून ठरलेली नाही.” काँग्रेसला जागावाटपासाठी दोषी ठरवणे अत्यंत चुकीचे असल्याचे ते म्हणाले.