महेश सरलष्कर
काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांची चौकशी ‘’नॅशनल हेराल्ड’’ प्रकरणी सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) मंगळवारी केली. त्याच दिवशी काँग्रेसने पुन्हा जोरदार शक्तिप्रदर्शन केले. पण, यावेळी काँग्रेसने रणनीती बदलत आंदोलनाला ‘नैतिक मुलामा’ देण्याचा प्रयत्न केला. काँग्रेसने आंदोलन करताना ‘’ईडी’’ चौकशी विरोधापेक्षाही महागाई, जीएसटी आदी जनतेशी निगडीत मुद्दे अग्रभागी ठेवलेले पाहायला मिळाले.
सोनिया गांधी यांची गेल्या आठवड्यामध्ये ’ईडी’ने अडीच तास चौकशी केली होती. तेव्हाही काँग्रेसने आक्रमक होत आंदोलन केले होते. हे आंदोलन म्हणजे ’सत्याग्रह’ असल्याचे काँग्रेसचे म्हणणे आहे. ’ईडी’चा राजकीय गैरवापर होत असल्याचा आरोप करत काँग्रेससह अन्य विरोधी पक्षनेत्यांनीही सोनियांना पाठिंबा व्यक्त केला होता. पण, मंगळवारी सोनियांची ‘ईडी’च्या कार्यालयामध्ये चौकशी सुरू असताना काँग्रेसचे नेते प्रामुख्याने इंधन दरवाढ, महागाई, बेरोजगारी, जीएसटी आदी मुद्दे घेऊन विजय चौकात निदर्शने करत होते. ’ईडी’च्या कार्यालयात सोनियांना सोडल्यानंतर काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी थेट विजय चौकात पोहोचले आणि त्यांनी ठिय्या आंदोलन केले. राहुल गांधी यांनीही ‘ईडी’ चौकशीऐवजी महागाई, जीएसटीचा मुद्दा उपस्थित करत केंद्र सरकारवर टीका केली. राहुल गांधी यांची ‘ईडी’ चौकशी झाली, तेव्हाही काँग्रेसने ‘सत्याग्रह’ केला होता. त्यावरून भाजपने काँग्रेसला कोंडीत पकडले होते. त्याची पुनरावृत्ती टाळण्यासाठी काँग्रेसने ‘शक्तिप्रदर्शना’साठी मुद्द्यांचा अग्रक्रम बदलल्याचे दिसले.
हेही वाचा… ईडीच्या अगाध लीला; अर्जुन खोतकर यांची रावसाहेब दानवे व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी दिलजमाई
‘नॅशनल हेराल्ड’ प्रकरणामध्ये राहुल गांधी यांची ‘ईडी’ने पाच दिवस सुमारे ४० तास चौकशी केली होती. राहुल गांधी यांच्या चौकशीविरोधात आंदोलन केले जात असल्याचे काँग्रेसने चौकशीच्या पहिल्या दिवसापासून स्पष्ट केले होते. राहुल गांधी ‘ईडी’च्या कार्यालयात जाण्यापूर्वी अकबर रोडवरील काँग्रेसच्या मुख्यालयात येत होते. राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसह ‘ईडी’च्या कार्यालयापर्यंत पदयात्रा काढण्याचाही प्रयत्न केला होता. पण, काँग्रेस मुख्यालयाभोवती तसेच, अबकर रोडला लागून असलेल्या सर्व रस्त्यांवर नाकाबंदी करण्यात आली होती. दिल्ली पोलिसांनी राहुल गांधी याची पदयात्रा अडवल्याने अखेर त्यांना कारने ‘ईडी’च्या कार्यालयात पोहोचावे लागले होते. राहुल गांधी यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी राजस्थान आणि छत्तीसगढचे मुख्यमंत्री अनुक्रमे अशोक गेहलोत आणि भूपेंद्र बघेल यांच्यासह ज्येष्ठ नेते, लोकसभा व राज्यसभेतील नेते अधीर रंजन चौधरी, मल्लिकार्जुन खरगे, युवक काँग्रेसचे नेते रस्त्यावर उतरले होते. पी. चिदंबरम यांच्यासह काँग्रेस खासदार आणि अनेक नेत्यांनाही ताब्यात घेण्यात आले होते. पण, हे आंदोलन फक्त गांधी कुटुंबासाठी केले जात असल्याची तीव्र टीका भाजपने केली. त्यावर सज्जड प्रत्युत्तर देण्याऐवजी काँग्रेस निरुत्तर झाल्याचे दिसले होते.
हेही वाचा… शिवसेनेला ४८ तासात हादरेही अन् निष्ठावंतांमुळे दिलासाही
यावेळी, ‘गांधी कुटुंबा’वरून भाजपने लक्ष्य करू नये यासाठी काँग्रेसने मंगळवारी जनतेशी निगडीत संवेदनशील मुद्दे मांडत आंदोलन केले. संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू असताना ‘ईडी’कडून सोनियांची चौकशी होत आहे. संसदेमध्ये दोन्ही सभागृहांमध्ये काँग्रेससह विरोधी पक्षांनी इंधन दरवाढ, महागाई, बेरोजगारी, जीएसटी आदी सगळेच मुद्दे उपस्थित केले आहेत. दोन्ही सभागृहांमध्ये या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यासाठी प्रस्तावही दिले आहेत. मात्र, केंद्र सरकारने अजून चर्चेची तयारी दाखवलेली नसल्याने सभागृहांमध्ये कामकाज सातत्याने तहकूब केले जात आहे. संसदेत चर्चा होत नसल्याचा मुद्दा पकडत काँग्रेसने संसद भवनाच्या शेजारी असलेल्या विजय चौकामध्ये जोरदार ‘शक्तिप्रदर्शन’ केले. राहुल गांधी पहिल्यांदाच काँग्रेसच्या आंदोलनाचे नेतृत्व करताना दिसले. काँग्रेसचे नेते, खासदारांना आधीच ताब्यात घेण्यात आल्यामुळे विजय चौकात राहुल गांधी एकटेच ठिय्या देऊन बसले होते. सुमारे अर्धा तासानंतर अखेर दिल्ली पोलिसांनी राहुल गांधी यांनाही ताब्यात घेतले.