Congress Plan For Future Elections : लोकसभेपाठोपाठ विधानसभा निवडणुकीतही विजयाची घोडदौड कायम ठेवणाऱ्या भाजपाला यापुढं कसं रोखायचं, यावर काँग्रेसच्या गुजरात येथील अधिवेशनात बुधवारी (तारीख ९ एप्रिल) विचारमंथन करण्यात आलं. केंद्र सरकार व भाजपाप्रणित राज्य सरकारांना कोणकोणत्या मुद्द्यांवरून लक्ष्य करायचं याबाबतही बैठकीत चर्चा करण्यात आली. या अधिवेशनात काँग्रेस नेत्यांनी केलेल्या चर्चांमधून दोन महत्त्वाच्या बाबी समोर आल्या आहेत. यातील पहिली बाब म्हणजे, केंद्र सरकारवर आक्रमक टीका करणे आणि त्यांच्या प्रत्येक कृतीला विरोध करणे. दुसऱ्या बाबतीत सरकारच्या उणीवा काढताना पक्षाने जनतेसमोर नकारात्मकतेऐवजी सकारात्मक उदाहरणे ठेवली पाहिजेत.

काँग्रेसच्या अधिवेशनात काय चर्चा झाली?

काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, युवा नेते कन्हैया कुमार आणि इम्रान प्रतापगढी यांसारख्या उदयोन्मुख नेत्यांनी या अधिवेशनातून भाजपा सरकारच्या कथित द्वेषपूर्ण राजकारणावर टीका केली, ज्यामध्ये केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करणे, अल्पसंख्यांकांना कथितपणे लक्ष्य करणे, महागाईवर नियंत्रण न ठेवणे अशा प्रमुख मुद्द्यांचा समावेश होता. विशेष बाब म्हणजे, सचिन पायलट यांनी मांडलेल्या प्रस्तावाला पाठिंबा देण्याऐवजी काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी वेगळंच मत मांडलं. “गेल्या तीन लोकसभा निवडणुकीत पक्षापासून दुरावा ठेवणाऱ्या मतदारांना परत आणण्यासाठी आपल्याला काम करावे लागेल, जेणेकरून पक्षाच्या मतांचा आकडा झपाट्याने वाढेल”, असा सल्ला थरूर यांनी काँग्रेस नेत्यांना दिला.

इतकंच नाही तर काँग्रेसकडे देशाचा विकासाचा कोणता आराखडा आहे, हे आपण जनतेला समजून सांगितलं पाहिजे. सध्या आपण फक्त नकारात्मक मोहीम चालवून भाजपाला चुकीचे म्हणत आहोत. मतदारांना पक्षाकडे आकर्षित करायचे असेल तर काँग्रेस सत्तेत आल्यानंतर काय बदल घडवून आणणार हे देखील आपल्याला जनतेसमोर मांडावं लागेल, असंही शशी थरूर यांनी अधिवेशनात सांगितलं.

‘महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत घोटाळा’

काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी आपल्या भाषणातून भाजपाला लक्ष्य केलं. भाजपाने मतदार याद्यांमध्ये फेरफार करून महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक जिंकली, असा आरोप खरगे यांनी केला. केंद्रीय निवडणूक आयोगाने ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरवर निवडणुका घेतल्या पाहिजेत. जगभरातील अनेक विकसित देशांनी मतदानासाठी ईव्हीएम हटवून त्याजागी मतपत्रिकेचा स्वीकार केला आहे. दुसऱ्या बाजूला आपण आजही ईव्हीएमवर अवलंबून आहोत. भारतीय जनता पार्टी त्यांच्या वैयक्तिक लाभांसाठी अजूनही ईव्हीएम वापरत आहे आणि ईव्हीएमचाच प्रचार करत आहे, अशी टीका खरगेंनी केली आहे. मतपत्रिकेवर निवडणूक घेण्याच्या मागणीचे नेतृत्व देशातील तरुणांकडून केले जाईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

‘मोदीजी देशाची मालमत्ता विकून निघून जातील’

ईव्हीएममधील फेरफार आणि मतदार यादीत घोटाळा झाल्याचे पुरावे मागणाऱ्या निवडणूक आयोगावरही खरगेंनी अप्रत्यक्ष टीका केली. “तुम्ही अशा युक्त्या आखल्या आहेत की, त्यांचा फायदा फक्त सत्ताधारी पक्षाला होतो. त्यांनी कोणत्या प्रकारच्या मतदार याद्या तयार केल्या आहेत, महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत सर्वात मोठी फसवणूक झाली आहे. हरियाणामध्येही असेच प्रकार घडले आहेत,” असं खरगे यांनी म्हटलं आहे. “मोदी सरकारने खाणकामापासून विमानतळांपर्यंत सर्व काही त्यांच्या उद्योगपती मित्रांच्या हाती सोपवलं आहे. जर परिस्थिती अशीच राहिली तर एक दिवस असा येईल, जेव्हा मोदी सरकार आणि स्वतः मोदीजी देशाची मालमत्ता विकून निघून जातील; मी हे स्पष्टपणे सांगत आहे,” अशी टीकाही खरगेंनी केली.

अमेरिकेच्या आयात शुल्कावरून सरकारवर टीका

अमेरिकेने भारतावर लादलेल्या आयात शुल्कावरूनही खरगे यांनी केंद्र सरकारला लक्ष्य केलं. अमेरिकेने देशावर मोठ्या प्रमाणात आयात शुल्क लादल्यानंतर मोदी सरकारने त्यावर संसदेत चर्चा होऊ दिली नाही. गेल्या ११ वर्षांपासून हे सरकार सत्तेत आहे, परंतु आजवर विरोधी पक्षांमधील कोणत्याही नेत्याला सभागृहात त्याचं व जनतेचं म्हणणं मांडता आलेलं नाही, हे आपल्या देशाचं दुर्दैव आहे,” अशी खंतही खरगेंनी व्यक्त केली. काँग्रेसमधील जे लोक पक्षाच्या हिताचे काम करीत नाहीत, त्यांनी तातडीने राजकीय निवृत्ती घ्यावी, असा खोचक सल्लाही त्यांनी पक्षातील नेत्यांना दिला.

शशी थरूर आपल्या भाषणात काय म्हणाले?

तिरुअनंतपूरमचे खासदार शशी थरूर यांनीही आपल्या भाषणातून काँग्रेस नेत्यांना तसेच पदाधिकाऱ्यांना अनेक महत्त्वपूर्ण सल्ले दिले. काँग्रेसला भविष्यात कशी बळकटी मिळेल यावरही त्यांनी अधिवेशनात भाष्य केलं. “काँग्रेस हा आशेचा पक्ष असला पाहिजे, नाराजीचा नाही; सकारात्मकतेचा पक्ष असला पाहिजे, नकारात्मकतेचा नाही; भविष्याचा पक्ष असला पाहिजे, फक्त भूतकाळाचा नाही; सकारात्मक दृष्टिकोन ठेवणारा पक्ष असला पाहिजे, कोणत्याही गोष्टीवर टीका करणारा नाही. मला आशा आहे की, आपण भविष्यावर लक्ष केंद्रित करू आणि सर्वांसाठी एक चांगला भारत निर्माण करू,” असं थरूर म्हणाले.

‘भाजपा अल्पसंख्यांकांना लक्ष्य करतंय’

केरळमध्ये पुढील वर्षात विधानसभा निवडणूक होणार आहे. तेथील काँग्रेसचे खासदार शफी परंबिल यांनी काँग्रेसला भविष्यातील दृष्टिकोन आणि वैचारिक स्पष्टतेची गरज असल्याचं म्हटलं आहे. भाजपा जाणूनबुजून अल्पसंख्यांकांना लक्ष्य करतंय, असा आरोपही शफी परंबिल यांनी केला आहे. भाजपाला पराभूत करायचे असेल तर आपल्याला नवीन साधने शिकावी लागतील. निवडणुकांचं स्वरूप बदललं आहे. खेळपट्टी आणि मैदानेही बदलली आहेत. जुनी रणनीती आपल्याला पुढे जाण्यास मदत करू शकत नाही, त्यासाठी आपल्याला नवीन दृष्टिकोन जनतेसमोर मांडावा लागेल,” असंही ते म्हणाले.

‘काँग्रेसच भाजपाचा पराभव करणार’

काही दिवसांपूर्वी भाजपाने लोकसभेत वक्फ दुरुस्ती विधेयक मंजूर केले, यावरून काँग्रेस खासदार व लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी भाजपाला पुन्हा एकदा लक्ष्य केलं आहे. “भाजपाचे नेते धार्मिक स्वातंत्र्य आणि संविधानावर हल्ला करीत आहेत. आरएसएसच्या मुखपत्र ऑर्गनायझरमध्ये लिहिले आहे की, ख्रिश्चनांवर हल्ला होणार आहे. केंद्र सरकारने मंजूर केलेलं वक्फ विधेयक हे धर्मविरोधी विधेयक आहे. देशात प्रत्येक समुदायाला आदर मिळावा अशी इच्छा आहे”, असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. “ज्या पक्षाकडे विचारसरणी आणि स्पष्टता नाही, तो पक्ष भाजपा-आरएसएसविरुद्ध उभा राहू शकत नाही. ज्यांच्याकडे विचारसरणी आहे, तेच भाजपाला पराभूत करू शकतात. भाजपाचा पराभव काँग्रेस पक्षाकडूनच होणार”, असा विश्वासही राहुल गांधी यांनी व्यक्त केला.