केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राज्यसभेत (संसदेच्या हिवाळी अधिवेशनात) संविधानावरील चर्चेदरम्यान केलेल्या एका टिप्पणीमुळे ते वादात अडकले आहेत. काँग्रेसने या टिप्पणीवर आक्षेप घेतला असून अमित शाह यांनी माफी मागावी, अशी मागणी केली आहे. अमित शाह राज्यसभेत भाषण करताना म्हणाले, “आजकाल आंबेडकरांचं नाव सारखं सारखं घेण्याची फॅशनच सुरू झाली आहे. आंबेडकर, आंबेडकर, आंबेडकर असा जप काही लोक करत असतात. एवढ्या वेळा जर देवाचं नाव घेतलं तर एखाद्याला स्वर्गात जागा मिळेल.” हे वक्तव्य करण्याआधी अमित शाह म्हणाले होते की “तुम्ही १०० वेळा जरी आंबेडकरांचं नाव घेतलं तरी तुम्हाला आंबेडकरांविषयी काय वाटतं, ते आम्हाला माहिती आहे. यानंतर काँग्रेससह विरोधी पक्षांनी अमित शाहांना घेरण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, आंबेडकरांविषयी बोलताना, भूमिका घेताना भाजपासह काँग्रेसचा दुटप्पीपणा देखील अनेकदा पाहायला मिळाला आहे, असं तवलीन सिंह यांनी म्हटलं आहे. तवलीन सिंह या इंडियन एक्सप्रेसमधील स्तंभलेखिका असून त्यांनी भारतातील दलितांची स्थिती, आजवर सत्ताधाऱ्यांनी त्यांच्याविषयी घेतलेल्या भूमिका व संसदेत गेल्या आठवड्याभरात घडलेल्या घडामोडींवर भाष्य केलं आहे.

तवलीन सिंह लिहितात, “सगळेजण आज आंबेडकरांविषयी प्रेम व आदर दाखवण्याचा प्रयत्न करत असले तरी ते त्यांचं खरं रूप नाही. राहुल गांधी नेहमी पांढऱ्या रंगाचं टी-शर्ट परिधान करतात. मात्र, अमित शाहांच्या वक्तव्यानंतर ते संसदेत निळ्या रंगाचं टी-शर्ट घालून आले होते. तर, त्यांची बहीण प्रियाका गांधी या देखील निळ्या रंगाची साडी नेसून संसदेत पोहोचल्या. इतर काँग्रेस खासदारांनी देखील निऱ्या रंगाचे कुर्ते परिधान केले होते. त्यांनी संसदेच्या परिसरात ‘जय भीम’ अशा घोषणा देखील दिल्या. ‘मी आंबेडकर आहे’, ‘आंबेडकर आमचे दैवत आहेत’, अशा घोषणा देणारे फलकही काँग्रेस खासदारांनी संसद परिसरात झळकावले. वास्तविक काँग्रेसचे देखील बाबासाहेब आंबेडकरांशी मतभेद होते.

हे ही वाचा >> One Nation One Election : वकील ते तीन वेळा खासदार… कोण आहेत एक देश, एक निवडणुकीवरील संसदीय समीतीचे अध्यक्ष पी. पी. चौधरी?

दोन्ही पक्ष दुटप्पी

काँग्रेसचं हे आंदोलन म्हणजे केवळ काँग्रेसचा दुटप्पीपणा नाही. तर भाजपाची ढोंगे कमी नाहीत. भाजपा नेत्यांनी लगेच त्यांच्या पक्षाचा प्रचार केला. भाजपाने कसा बाबासाहेबांचा मरणोत्तर भारतरत्न देऊन सन्मान केला, काँग्रेसने कसं त्यांना या सन्मानापासून दूर ठेवलं, काँग्रेसने त्यांना निवडणुकीत कसं पराभूत केलं, आम्ही (भाजपा) सत्तेत आल्यावर कशी बाबासाहेबांच्या नावाने स्मारकं बांधली इत्यादी. मात्र, भाजपाची ही सर्व मंडळी जी नव्यानेच बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने फॅन क्लब बनवू पाहत आहे ती मंडळी बाबासाहेबांच्या विचारांचा विरोध करत आली आहे. हे लोक ज्या सावरकरांच्या हिंदुत्वाचा पुरस्कार करतात त्यास बाबासाहेबांचा विरोध होता हे विसरून जातात.

हे ही वाचा >> Mahayuti : महायुतीला प्रचंड बहुमत मिळूनही गोंधळाची स्थिती का आहे? काय आहेत कारणं?

दलितांकडून आजही हातांनी सफाईची कामं करून घेतली जातात

आज सत्तेत असणारे व आधी सत्तेत असलेले लोक ज्यांनी बाबासाहेबांचा फॅन क्लब तयार केला आहे त्या मंडळींनी खरंच बाबासाहेब आंबेडकरांचे विचार अंगीकारले असते तर आज दलित समाजाला जी वागणूक मिळतेय, सामाजिक स्तरावर ते आज ज्या ठिकाणी आहेत तशी त्यांची अवस्था कधीच नसती. दलितांना त्यांच्या परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी बाबासाहेबांप्रमाणे यांनी देखील काम केलं असतं, त्यांचा विकास केला असता. दलितांकडून आजही हातांनी सफाईची कामं करून घेतली जातात. भारतीय रेल्वे यात सर्वात आघाडीवर आहे. त्यांची आकडेवारी आपल्या सर्वांसाठी लाजिरवाणी आहे. भारतातील जवळपास निम्म्या जिल्ह्यांमध्ये हाताने सफाई केली जाते.

हे ही वाचा >> पश्चिम वर्‍हाडात पडझडीमुळे शिवसेनेमध्ये खदखद, पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये असंतोषाची दरी; स्वपक्षीय नेत्यांनाच विरोध

सफाई कर्मचाऱ्यांची स्थिती बिकट

गटारे, सेप्टिक टँक (शौचालयाच्या टाक्या) साफ करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांपैकी ९० टक्क्यांहून अधिक लोक हे अनुसूचित जाती-जमातींमधील असतात. त्यांना साधे ग्लोव्हज (रबरी हातमोजे) पुरवण्यातही आपलं सरकार असमर्थ ठरलं आहे, इतर सामग्री पुरवणं तर खूप लांबची गोष्ट आहे. त्यांच्या सुरक्षेच्या वस्तू देखील त्यांना पुरवल्या जात नाहीत. दर वर्षी शेकडो सफाई कर्मचारी या कामामुळे मरण पावतात. परंतु, फॅन क्लबवाल्या मंडळींनी आजवर या सफाई कर्मचाऱ्यांसाठी काय केलंय? राहुल गांधी अलीकडे अशा कर्मचाऱ्यांबरोबर फिरताना, त्यांच्यात मिसळताना दिसले, मात्र त्यांची स्थिती सुधारण्यासाठी त्यांनी काय नवीन केलं?

हे ही वाचा >> Rahul Gandhi : राहुल गांधींनी प्रतिष्ठेला धक्का पोहचवाल्याचा आरोप करणाऱ्या भाजपाच्या महिला खासदार आहेत कोण?

दलितांविरोधातील गुन्ह्यांची वाढती आकडेवारी चिंताजनक

दलितांविरोधातील गुन्ह्यांची आकडेवारी देखील भयानक आहे. एका आकडेवारीनुसार देशात दर १८ मिनिटांत दलित समाजातील एका व्यक्तीविरोधात गुन्हा घडतो. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोने म्हटलं आहे की २०१५ ते २०२० दरम्यान दलित मुलींवरील बलात्कारांच्या घटनांमध्ये ४५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. म्हणजेच मोदींचं सरकार आल्यापासून दलित मुलींची सुरक्षितता चव्हाट्यावर आली आहे. ग्रामीण भारतातील सामूहिक बलात्काराच्या घटना वाढल्या आहेत. तसेच लैंगिक अत्याचाराला बळी पडणाऱ्या मुली व महिलांमध्ये दलितांचं प्रमाण अधिक आहे. दलित मुलांशी शाळांमध्ये भेदभाव केला जातो. अलीकडच्या काळात अशा प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे. हिंदूंच्या मंदिरांमध्ये आजही अनेक ठिकाणी त्यांना प्रवेश नाही. हे सर्व पाहून आपण विकसित भारताकडे नव्हे तर विक्षिप्त भारताच्या दिशेने प्रवास करतोय असं वाटतं, असं मत तवलीन सिंह यांनी नमूद केलं आहे.

Story img Loader