त्रिपुरामध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आपला विजय व्हावा यासाठी सगळेच पक्ष तयारीला लागेल आहे. अशात भाजपाही मागे कसा हटणार? पंतप्रधान नरेंद्र मोदी हे प्रचारासाठी त्रिपुरामध्ये आले आहेत. त्रिपुरातल्या अंबासामध्ये त्यांनी रॅलीला संबोधित केलं. आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कम्युनिस्ट आणि काँग्रेस यांच्यावर कडाडून टीका केली. तसंच भाजपाने त्रिपुराला भीती, हिंसा यापासून मुक्ती दिली आहे असंही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे.
काय म्हटलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी?
निवडणुकीसाठी असलेला आमचा जाहीरनामा हे सांगतो की भाजपा तेच करते जे लोकांना आणि जनतेला हवं असतं. लोकांना जे आवश्यक आहे जी त्यांची प्राथमिकता आहे तीच आमच्यासाठी प्राथमिकता आहे. एक काळ असा होता की त्रिपुरामध्ये फक्त डाव्या कॅडरला विविध सरकारी योजनांचा लाभ मिळत असे. मात्र राज्यातल्या प्रत्येक नागरिकाला आता सरकारी योजनेत लाभ मिळतो आहे.पोलीस ठाण्यांवरही सीपीएम कॅडरचा कब्जा होता. भाजपाचं सरकार आल्यानंतर राज्यात कायद्याचं राज्य आलं आहे असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.
त्रिपुरातल्या गावांना जोडण्यासाठी आपण पाच हजार किमीचे रस्ते तयार केले आहेत. आगरतळा या ठिकाणी नवं विमानतळ उभं राहिलं आहे. ऑप्टिकल फायबर आणि फोरजी कनेक्टिव्हिटी गावांमध्येही पोहचवली गेली आहे. त्रिपुरा आता वैश्विक होतं आहे असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. आता पूर्वोत्तर भाग आणि त्रिपुरा हे बंदरांनी जोडण्यासाठीही आम्ही जलमार्ग विकसित करतो आहोत असंही मोदींनी म्हटलं आहे. तसंच फिर एक बार डबल इंजिन सरकार असाही नारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात दिला.
विरोधकांवर कडाडून टीका
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात विरोधकांवरही टीक केली. काँग्रेस आणि CPM ने त्रिपुराच्या प्रगतीत खोडा घातला असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. भाजपाने त्रिपुरामध्ये विकासाची मुहूर्तमेढ रोवली. काँग्रेस आणि कम्युनिस्टांच्या हाती सरकार होतं तेव्हा त्यांनी हिंसा हीच त्रिपुराची ओळख बनवली होती. मात्र भाजपाने ही ओळख बदलली असंही मोदी म्हणाले.