चंद्रपूर : विधानसभा निवडणुकीत राजुरा मतदारसंघात काँग्रेस जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे व शेतकरी संघटनेचे नेते माजी आमदार ॲड. वामनराव चटप या दोन्ही सत्तरीपार नेत्यांचा पराभव झाला. यामुळे काँग्रेस आणि शेतकरी संघटनेचे नेतृत्व आता नव्या दमाच्या तरुणांकडे सोपवावे, अशी भावना कार्यकर्त्यांमधून व्यक्त होत आहे. काँग्रेसकडून अरुण धोटे, तर शेतकरी संघटनेकडून ॲड. दीपक चटप यांची नावे चर्चेत आहेत.
कुणबीबहुल राजुरा मतदारसंघात भाजपचे देवराव भोंगळे यांनी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे यांचा अवघ्या तीन हजार मतांनी पराभव केला. या मतदारसंघात सुभाष धोटे व ॲड. वामनराव चटप यांच्यातच थेट लढत होईल, असे प्रचारादरम्यानचे चित्र होते. मात्र देवराव भोंगळे यांनी अखेरच्या काही फेऱ्यांमध्ये आघाडी घेत विजय संपादन केला आणि राजुरा मतदारसंघात भाजपच्या तरुण नेतृत्वाचा उदय झाला. येथे काँग्रेस व शेतकरी संघटनेला पुन्हा पहिल्या क्रमांकावर आणायचे असेल तर धोटे व ॲड. चटप या दोघांनाही राजकारणात मार्गदर्शकाची भूमिका स्वीकारून नव्या दमाच्या तरुणांकडे नेतृत्व सोपवावे लागेल. पराभवानंतर धोटे यांनी तशी भूमिकाही जाहीर केली आहे. त्यानुसार राजुराचे माजी नगराध्यक्ष अरुण धोटे यांच्याकडे भविष्यातील सूत्रे सोपवली जातील, असे संकेत आहेत. त्याचबरोबर धोटे यांचे सुपुत्र अभिजित धोटे व पुतण्या युवक काँग्रेस अध्यक्ष शंतनू धोटे यांनाही राजुरा मतदारसंघात सक्रिय केले जाईल, तसेच काँग्रेस निष्ठावंत आर्किटेक्ट बापूजी धोटे यांना काँग्रेसच्या वतीने या भागात सक्रिय केले जाईल अशीही शक्यता आहे.
आणखी वाचा-राज्याच्या इतिहासात सात जणांनी भूषविले एकापेक्षा अधिक वेळा मुख्यमंत्रीपद !
शेतकरी संघटनेत युवा नेतृत्व म्हणून ॲड. दीपक यांचे नाव समोर आले आहे. त्याचबरोबर नीळकंट कोरांगे, अरुण नवले, श्रीनिवास मुसळे, ही नावेदेखील चर्चेत आहेत. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत ॲड. दीपक प्रचारात सक्रिय होते. विविध पातळ्यांवर त्यांनी काम हाताळले. उच्चविद्याविभूषित ॲड. दीपक यांची राजकीय महत्त्वाकांक्षा लपून राहिलेली नाही. ते कोरपना व जिवती या दोन तालुक्यांत स्वयंसेवी संघटनेच्या माध्यमातून कार्यरत आहेत.
यावरून भविष्यात या मतदारसंघात धोटे व ॲड. चटप या दोन्ही नेत्यांची राजकीय सेवानिवृत्ती जाहीर होईल आणि नवे नेतृत्व सक्रिय होईल, अशी आशा कार्यकर्त्यांना आहे. २०२९ ची विधानसभा हे दोन्ही नेते लढणार नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे नव्या नेतृत्वाला आतापासूनच सक्रिय व्हावे लागेल, असे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.