विरोधकांच्या इंडिया आघाडीने देशातील काही वृत्तवाहिन्यांच्या वृत्तनिवेदकांवर (अँकर्स) बहिष्कार टाकला आहे. या वृत्तनिवेदकांच्या कोणत्याही कार्यक्रमाला इंडिया आघाडीतील पक्ष आपले प्रतिनिधी पाठवणार नाहीत, अशी भूमिका इंडिया आघाडीने घेतली आहे. या निर्णयानंतर भाजपाने विरोधकांवर सडकून टीका केली आहे. देशात पुन्हा एकदा आणीबाणी लागू करण्याचा हा प्रयत्न आहे. विरोधक माध्यमांची गळचेपी करण्याचा प्रयत्न करत आहेत, अशी टीका भाजपाकडून केली जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

१४ वृत्तनिवेदकांवर विरोधकांच्या आघाडीचा बहिष्कार

इंडिया आघाडीतील वेगवेगळे पक्ष एकूण ११ राज्यांत सत्तेत आहेत. या सर्वच पक्षांनी वेगवेगळ्या १४ वृत्तनिवेदकांवर बहिष्कार टाकला आहे. याबाबत काँग्रेसचे माध्यम विभागाचे प्रमुख पवन खेरा यांनी भूमिका मांडली आहे. “रोज संध्याकाळी ५ वाजता काही वृत्तवाहिन्यांवर द्वेषाचा बाजार सुरू होतो. गेल्या नऊ वर्षांपासून हे घडत आहे. या बाजारात वेगवेगळ्या पक्षाचे वक्ते जातात. यात काही तज्ज्ञ, काही विश्लेषक असतात. हे सर्व जण या बाजाराचा एक भाग होऊन जातात. जड अंत:करणाने आम्ही हा निर्णय घेतला आहे. आम्ही या कोणत्याही वृत्तनिवेदकाला विरोध करत नाही. आम्ही त्यांचा द्वेषही करत नाही. मात्र, आम्हाला या द्वेषाचा भाग बनायचं नाही. आम्ही आमच्या देशावर खूप प्रेम करतो. त्यामुळे या द्वेषाला थांबवण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न आम्ही करणार आहोत. याच कारणामुळे आम्ही हा निर्णय घेतला आहे,” असे पवन खेरा यांनी स्पष्ट केले. तसेच आम्हाला द्वेषाने भरलेल्या गोष्टींना कायदेशीर मान्यता द्यायची नाही. समाजात द्वेष पसरवला जात असेल तर भविष्यात हिंसाचारही घडू शकतो. आम्हाला याचा भाग व्हायचे नाही, असेही खेरा यांनी सांगितले.

एनबीडीएची भूमिका काय?

दरम्यान, इंडिया आघाडीच्या या निर्णयाचा न्यूज ब्रॉडकास्टर्स अँड डिजिटल असोसिएशन (एनबीडीए) ने निषेध केला आहे. भाजपानेदेखील इंडिया आघाडीवर सडकून टीका केली आहे. “माध्यमांची गळचेपी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. इंडिया आघाडी भाषणस्वातंत्र्य, अभिव्यक्तीस्वातंत्र्याचा पुरस्कार केल्याचा दावा करतात. मात्र, त्यांनी घेतलेल्या या निर्णयाच्या माध्यमातून या स्वातंत्र्याचा ते विरोध करत असल्यासारखे वाटत आहे. मात्र, आम्ही त्यांच्या प्रतिनिधींना आमंत्रित करत राहू”, असे एबीपी नेटवर्कचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच एनबीडीएचे अध्यक्ष अविनाश पांडे म्हणाले. इंडिया आघाडीने काही वृत्तवाहिन्यांच्या वृत्तनिवेदकांवर बहिष्कार टाकला आहे. हे लोकशाही मूल्यांच्या विरोधात आहे. आम्ही माध्यम स्वातंत्र्याचा पुरस्कार करतो, असा दावा विरोधकांची इंडिया आघाडी करते. या निर्णयामुळे व्यक्त होण्याच्या स्वातंत्र्याला विरोध केला जात आहे, असेही एनबीडीएने म्हटले.

पंडित नेहरू यांनी भाषण स्वातंत्र्यावर बंधन घातले- नड्डा

दुसरीकडे इंडिया आघाडीच्या याच निर्णयानंतर भाजपानेदेखील आक्रमक पवित्रा घेतला आहे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी विरोधकांना लक्ष्य केले. “पंडित नेहरू यांनी भाषण स्वातंत्र्यावर बंधन घातले. ज्यांनी ज्यांनी त्यांच्यावर टीका केली, अशा सर्वांना त्यांनी तुरुंगात टाकले. इंदिरा गांधी यांनी तर आणीबाणी लादली. राजीव गांधी यांनी माध्यमांवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला, मात्र यात ते अयशस्वी झाले. सोनिया गांधी नेतृत्व करत असलेल्या यूपीएने अनेक लोकांचे सोशल मीडिया अकाउंट बंद करण्याचा निर्णय घेतला होता. संबंधित लोकांची मते आवडत नाहीत, म्हणून त्यांनी असा निर्णय घेतला होता”, अशी टीका नड्डा यांनी केली.

“आणीबाणीच्या काळात माध्यमांची गळचेपी”

भाजपाचे राष्ट्रीय माध्यम प्रमुख अनिल बालुनी यांनीदेखील विरोधकांवर टीका केली. विरोधकांची यातून दडपशाही, हुकूमशाही, नकारात्मक विचार करण्याची वृत्ती दिसून येते, अशी टीका त्यांनी केली. “आणीबाणीच्या काळात माध्यमांची गळचेपी कशी करण्यात आली होती, हे सर्वांनाच माहिती आहे. विरोधकांच्या इंडिया आघाडीवर बाहेरच्या कोणाचातरी दबाव आहे, हेच यातून स्पष्ट होते. आपल्या देशात लोकशाही आहे, त्यामुळे कोणालाही माध्यमांची गळचेपी केलेली आवडणार नाही,” असे बालुनी म्हणाले.

इंडिया आघाडीकडून माध्यमांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न- अनुराग ठाकूर

केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनीदेखील विरोधकांच्या इंडिया आघाडीवर टीका केली. “त्यांना लोकशाहीवर विश्वास नाही, हेच यातून स्पष्ट होते. तामिळनाडू, पश्चिम बंगालमध्ये पत्रकारांविरोधात गुन्हे दाखल केले जात आहेत. आता ते पत्रकारांवर बहिष्कार टाकण्याची भाषा करत आहेत, हे खूप लाजीरवाणे आहे. ते अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि माध्यमांच्या स्वातंत्र्यावर नेहमीच बोलत असतात. माध्यमांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न कोणी केला असेल तर ते घमंडिया आघाडी (इंडिया आघाडी) आहे,” असे अनुराग ठाकूर म्हणाले.

दरम्यान, इंडिया आघाडीने काही वृत्तनिवेदकांवर बहिष्कार टाकल्यामुळे भविष्यात वृत्तनिवेदक काय भूमिका घेणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress and india alliance banned 14 news anchor bjp criticises prd
Show comments