मध्य प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि समाजवादी पार्टी यांच्यात जागावाटपाच्या मुद्द्यावरून वाद सुरू झाला आहे. समाजवादी पार्टीला मध्य प्रदेशमध्ये जनाधार नाही, त्यामुळे या पक्षाने स्वत:चे उमेदवार उभे न करता काँग्रेसच्या उमेदवारांना पाठिंबा द्यावा, अशी भूमिका उत्तर प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अजय राय यांनी घेतली आहे; तर इंडिया आघाडी ही फक्त लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने असेल तर आम्ही हेच सूत्र उत्तर प्रदेशमध्येही लागू करू, अशी भूमिका समाजवादी पार्टीचे (सपा) सर्वेसर्वा अखिलेश यादव यांनी घेतली आहे. विशेष म्हणजे या दोन्ही पक्षांतील जागावाटपाची चर्चा निष्फळ ठरली आहे. असे असतानाच अखिलेश यादव यांनी मोठे विधान केले आहे. ‘काँग्रेस अशा प्रकारे वागत असेल, तर त्यांच्यासोबत कोण उभे राहणार’ असे अखिलेश यादव म्हणाले आहेत. या विधानामुळे आता इंडिया आघाडीमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“…तर पराभवाची शक्यता जास्त”

समाजवादी पार्टी हा पक्ष मध्य प्रदेशची विधानसभा निवडणूक लढवत आहे. गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस आणि समाजवादी पार्टी या दोन पक्षांत जागावाटपावर चर्चा सुरू होती. मात्र, ही चर्चा आता निष्फळ ठरली आहे. त्यानंतर काँग्रेस पक्ष इंडिया आघाडीतील घटकपक्षांची फसवणूक करत आहे, असा आरोप अखिलेश यादव यांनी केला आहे. “मध्य प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीदरम्यान माझ्या हे लक्षात आले आहे की, इंडिया आघाडी फक्त लोकसभा निवडणुकीसाठीच आहे. प्रश्न विश्वासार्हतेचा आहे. काँग्रेस अशा प्रकारे वागत असेल, तर त्यांच्यासोबत कोण उभे राहणार? भाजपा हा सुसंघटित आणि मोठा पक्ष आहे. या पक्षाविरोधात लढायचे असेल तर कोणताही संभ्रम असता कामा नये. असा संभ्रम निर्माण झाल्यास पराभवाची शक्यता जास्त आहे”, असे अखिलेश यादव म्हणाले.

काँग्रेसचे जशास तसे उत्तर

समाजवादी पार्टीने मध्य प्रदेशची निवडणूक लढू नये असा सल्ला अजय राय यांनी दिला होता. राय यांच्या या आवाहनानंतर अखिलेश यादव यांनी १९ ऑक्टोबर रोजी त्यांच्यावर ‘चिरकूट’ म्हणत टीका केली होती. मात्र, अखिलेश यादव यांच्या या टीकेला राय यांनीदेखील जशास तसे उत्तर दिले आहे. ज्यांनी आपल्या पित्याला सन्मान दिला नाही, अशा माणसाकडून आपण काय अपेक्षा करू शकतो, असे राय अखिलेश यादव यांना उद्देशून म्हणाले.

उत्तर प्रदेशमध्येही हेच सूत्र राबवले जाणार-समाजवादी पार्टी

मध्य प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत जागावाटपाची चर्चा निष्फळ झाल्यानंतर आता समाजवादी पार्टीने येथे साधारण ३० जागांसाठी आपले उमेदवार जाहीर केले आहेत. समाजवादी पार्टीच्या याच निर्णयावर आता काँग्रेसने प्रश्न उपस्थित केले आहेत. कारण मध्य प्रदेशमध्ये काँग्रेस आणि भाजपा यांच्यात थेट लढत आहे; तर दुसरीकडे समाजवादी पार्टीनेदेखील काँग्रेसवर टीका केली असून उत्तर प्रदेशमध्येही हेच सूत्र राबवले जाईल, असा इशाला काँग्रेसला दिला आहे. उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पार्टी हा पक्ष काँग्रेसच्या तुलनेत प्रबळ आहे.

“काँग्रेसला कदाचित आम्ही पाठिंबाही दिला असता”

अखिलेश यादव शुक्रवारी शाहजहानपूरमध्ये होते. यावेळी त्यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मध्य प्रदेशधील काँग्रेस आणि समाजवादी पार्टी यांच्यातील वादावर भाष्य केले. “काँग्रेस पक्षाने स्पष्टपणे सांगायला हवे होते, त्यांना जागावाटप करायचे नसते तर त्यांनी आमच्याशी चर्चाच केली नसती. आम्हाला तुमचा पाठिंबा हवा आहे, अशी विचारणा त्यांनी करायला हवी होती. आम्ही त्यांना कदाचित पाठिंबाही दिला असता. मात्र, त्यांनी आमच्याशी यावर कुठलीही चर्चा केली नाही. याच कारणामुळे मध्य प्रदेशमध्ये आमचा पक्ष ज्या भागात प्रबळ आहे, तेथे आम्ही विधानसभा निवडणूक लढवत आहोत”, असे अखिलेश यादव यांनी सांगितले.

अखिलेश यादव यांच्या टीकेला काँग्रेसचे प्रत्युत्तर

अखिलेश यादव यांनी उत्तर प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अजय राय यांच्यावर चिरकूट म्हणत टीका केली होती. त्यांच्या या टीकेला काँग्रेसनेही जशास तसे उत्तर दिले आहे. “ज्या व्यक्तीने आपल्या वडिलांना सन्मान दिला नाही, त्या व्यक्तीकडून आपण अन्य लोकांचा सन्मान करण्याची अपेक्षा कशी करू शकतो. अखिलेश यादव यांचे वडील मुलायमसिंह यादव यांचा सर्व जण आदर करायचे. भविष्यातही आम्ही त्यांचा आदरच करू”, अशी प्रतिक्रिया अजय राय यांनी दिली. समाजवादी पार्टीतील अनेक नेत्यांना त्या पक्षात अपमानास्पद वाटते, असा दावाही त्यांनी यावेळी केला.

“अखिलेश यादव यांनी बोलताना काळजी घ्यायला हवी होती”

काँग्रेसचे आमदार विरेंद्र चौधरी यांनीही अखिलेश यादव यांच्यावर टीका केली. “अखिलेश यादव हे एक राष्ट्रीय नेते आहेत. त्यांनी भाषा जपून वापरायला हवी. एका प्रदेशाध्यक्षाबद्दल बोलताना त्यांनी काळजी घ्यायला हवी होती. अखिलेश यादव यांना आमच्या शुभेच्छा आहेत”, असे विरेंद्र चौधरी म्हणाले.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress and samajwadi party clash over madhya pradesh assembly election akhilesh yadav criticised congress prd