सांगली : जिल्ह्यातील जत, मिरज व खानापूर-आटपाडी या तीन विधानसभा मतदारसंघांमध्ये कार्यकर्त्यांनी विधानसभेची तयारी करण्याच्या सूचना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी एका बैठकीत दिले आहेत. यामुळे जतमध्ये काँग्रेसच्या आणि खानापूर-आटपाडीतील ठाकरे गटाच्या जागेवर दावा करण्याच्या तयारीत राष्ट्रवादी काँग्रेस असल्याचे मानले जाते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सांगलीत राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक आमदार पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. या बैठकीस आमदार मानसिंगराव नाईक, आमदार सुमनताई पाटील, आमदार अरूण लाड यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी पाटील म्हणाले, वाळवा, शिराळा आणि तासगाव-कवठेमहांकाळ या तीन जागी आमच्याच पक्षाचे आमदार आहेत. आता जिल्ह्यातील आणखी तीन जागा पक्षाला मिळवाव्या लागतील. यासाठी मिरज, जत व खानापूर या ठिकाणच्या कार्यकर्त्यांनी विधानसभेच्या तयारीला लागावे.

हेही वाचा – लोकसभेच्या अध्यक्षपदासाठी झाली निवडणूक; याआधी अशी निवडणूक कधी झाली आहे?

काँग्रेसचे नेते आमदार डॉ. विश्‍वजित कदम यांनीही जिल्ह्यात पाच आमदार काँग्रेसचे निवडून आणायचे आहेत असे जाहीर वक्तव्य केले आहे. सध्या पलूस-कडेगाव आणि जत या दोन मतदारसंघांचे प्रतिनिधित्व काँग्रेसकडे आहे. जतमध्ये डॉ. कदम यांचे नातेवाईक आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विक्रमसिंह सावंत हे आमदार आहेत. त्यांनाच पुन्हा काँग्रेसकडून संधी दिली जाण्याची शक्यता असताना राष्ट्रवादीनेही या जागेसाठी तयारी सुरू केल्याने हा एक प्रकारे आमदार डॉ.कदम यांना शह देण्याचा प्रयत्न मानला जात आहे.

हेही वाचा – कोल्हापुरातील गड शाबूत राखण्याचे सतेज पाटील यांच्यासमोर आव्हान

तसेच खानापूर-आटपाडीचे प्रतिनिधित्व करणारे अनिल बाबर यांचे आकस्मिक निधन झाले. ही जागा सध्या रिक्त असली तरी या ठिकाणी शिवसेनेचे प्रतिनिधी म्हणून आमदार बाबर यांची निवड झाली होती. त्यांनी शिंदे शिवसेनेत प्रवेश केला होता. तरीही या जागेवर उद्धव ठाकरे गट दावा करण्याची शक्यता वर्तवली जात असून या ठिकाणीही राष्ट्रवादीने दावा केल्याने महाविकास आघाडीत जागा वाटपावेळी चुरस राहणार आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress and sharad pawar groups are now trying over seat allocation in sangli print politics news ssb
First published on: 27-06-2024 at 10:41 IST