लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाने दिल्लीतील उमेदवारांची यादी जाहीर केली असून नवी दिल्ली लोकसभा मतदारसंघातून माजी केंद्रीय मंत्री सुषमा स्वराज यांच्या कन्या बांसुरी स्वराज यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र, त्यांच्या या उमेदवारीवरून विरोधकांकडून भाजपाला लक्ष्य येत आहे. बांसुरी स्वराज यांना दिलेली उमेदवारी ही घराणेशाहीच्या राजकारणाचे जीवंत उदाहारण असल्याचं विरोधकांनी म्हटलं आहे.
विरोधकांच्या या टीकेला भाजपानेही प्रत्युत्तर दिलं आहे. बांसुरी स्वराज यांना केवळ सुषमा स्वराज यांची मुलगी म्हणून उमेदवारी दिली नसून मतदासंघातील त्यांचे काम, दांडगा जनसंपर्क या आधारावर दिली असल्याचे भाजपाने म्हटलं आहे. यावरून आता राजकीय वर्तुळात विविध चर्चाही रंगू लागल्या आहेत.
हेही वाचा – राजकारणात येण्यासाठी न्यायाधीशपदाचा राजीनामा; अभिजीत गंगोपाध्याय यांच्यावर टीकेची झोड!
आम आदमी पक्षाची भाजपावर टीका
आम आदमी पक्षाचे नेते सौरभ भारद्वाज यांनी यासंदर्भात बोलताना, बांसुरी स्वराज यांना दिलेली उमेदवारी म्हणजे घराणेशाहीचं जिवंत उदाहरण असल्याचे म्हटलं आहे. “भाजपा घराणेशाहीच्या मुद्द्यावरून विरोधकांवर टीका करते. मात्र आता त्यांनी नवी दिल्लीतून सुषमा स्वराज यांच्या मुलीला तिकीट दिले आहे. हे घराणेशाहीचे जिवंत उदाहरण आहे. यावरून भाजपाच्या बोलण्यात आणि कृती मोठा फरक असल्याचे दिसून येते”, असे ते म्हणाले.
काँग्रेसकडूनही भाजपाला लक्ष्य
बांसुरी स्वराज यांच्या उमेदवारीवरून काँग्रेसनेही भाजपाला लक्ष्य केलं आहे. ”विद्यमान खासदार असताना बांसुरी स्वराज यांना दिल्लीतून उमेदवारी का दिली? ही घराणेशाही नाही का? बांसुरी स्वराज याचं पक्षासाठी नेमकं काय योगदान आहे? असा प्रश्न काँग्रेसच्या प्रवक्त्या शमा मोहम्मद यांनी विचारला आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यापुढे घराणेशाहीच्या मुद्द्यावरून आमच्याकडे बोट नये, असेही त्या म्हणाल्या.
भाजपाचेही प्रत्युत्तर
दरम्यान, काँग्रेस आणि आम आदमी पक्षाच्या टीकेला भाजपाने प्रत्युत्तर दिले आहे. दिल्लीतील सातपैकी पाच उमेदवार हे भाजपाचे कार्यकर्ते आहेत. यामध्ये कोणताही मोठा चेहरा नाही. त्यांनी आपली क्षमता सिद्ध केली आहे. बांसुरी स्वराज यांच्याबाबत बोलायचं झाल्यास त्यांनी गेल्या एका वर्षात आपली योग्यता सिद्ध केली आहे. शिवाय दिल्ली भाजपातील २८ पदाधिकाऱ्यांनी मिनाक्षी लेखींऐवजी बांसुरी स्वराज यांना पाठिंबा दिला आहे. त्यामुळे केंद्रीय नेतृत्वाने त्यांना उमेदवारी दिली, अशी प्रतिक्रिया भाजपाच्या वरिष्ठ नेत्याने दिली.
बांसुरी स्वराज यांची राजकीय कारकीर्द :
बांसुरी स्वराज यांची गेल्या वर्षी भाजपाच्या विधी सेलच्या संजोजक पदी नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना सचिवपदी बढती देण्यात आली. बांसुरी स्वराज २००७ मध्ये वकिलीला सुरुवात केली होती. त्या सध्या सर्वोच्च न्यायालयात वकील म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी वॉरविक विद्यापीठातून इंग्रजी साहित्यात पदवीचे शिक्षण पूर्ण केले असून त्यानंतर त्यांनी लंडनमधील बीबीपी लॉ स्कूलमध्ये कायद्याचे शिक्षण घेतले. तसेच त्यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठातून पदव्युत्तर पदवीचे शिक्षणही पूर्ण केले. कठोर परिश्रम करण्याची तयारी आणि स्थानिक पातळीवरील जनसंपर्क यामुळे बांसुरी स्वराज यांना उमेदवारी मिळाल्याचं सुत्रांनी सांगितलं आहे.