लोकसभेची निवडणूक जिंकायची असेल तर उत्तर प्रदेश पकड हवी. म्हणजेच लोकसभेच्या दृष्टीने प्रत्येक पक्षाला उत्तर प्रदेश राज्य फार महत्त्वाचे आहे. हाच विचार लक्षात घेऊन २०२४ साली होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने आतापासूनच तयारी सुरू केली आहे. याचाच एक भाग म्हणून या पक्षाने उत्तर प्रदेशच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी माजी आमदार अजय राय यांच्यावर सोपवली आहे.
भाजपातून बीएसपी, नंतर काँग्रेसमध्ये प्रवेश
याआधी उत्तर प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष ब्रिजलाल खाबरी हे होते. गेल्या वर्षी त्यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला होता. याआधी साधारण तीन दशके ते बहुजन समाज पक्षात होते. विधानसभा निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर काँग्रेस पक्षाने त्यांच्यावर प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवली होती. या निर्णयामुळे त्यावेळी अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती. मात्र आता काँग्रेसने उत्तर प्रदेशचे प्रदेशाध्यक्षपद अजय राय यांच्याकडे सोपवले आहे.
नरेंद्र मोदींविरोधात लढवली होती निवडणूक
अजय राय हे यापूर्वी भाजपामध्ये होते. नंतर समाजवादी पक्षात त्यांनी प्रवेश केला. २०१२ साली त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. २०१४ आणि २०१९ साली त्यांनी वाराणसी मतदारसंघातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात लोकसभा निवडणूक लढवली होती. मात्र या दोन्ही निवडणुकांत त्यांचा पराभव झाला होता. अजय राय यांनी एकूण पाच वेळा आमदारकी भूषवलेली आहे. यापैकी १९९६, २००२, २००७ या तीन निवडणुका त्यांनी भाजपाच्या तिकिटावर लढवल्या होत्या. भाजपात असताना २००९ साली वारणसी मतदारसंघातून तिकीट मिळेल, अशी त्यांना अपेक्षा होती. मात्र त्यावेळी या मतदारसंघासाठी भाजपाचे वरिष्ठ नेते मुरली मनोहर जोशी यांना तिकीट देण्यात आले होते. त्यानंतर त्यांनी राजीनामा देत समाजवादी पक्षात प्रवेश करत वाराणसी मतदारसंघातून निवडणूक लवढली होती. मात्र त्या निवडणुकीत राय यांचा पराभव झाला होता. पुढे त्यांनी कोलासला मतदारसंघासाठी आयोजित केलेली विधानसभेची पोटनिवडणूक लढवली होती. त्या निवडणुकीत मात्र त्यांना विजय मिळाला होता.
अनेकवेळा पराभव मात्र तरीदेखील काँग्रेसकडून महत्त्वाची जबाबदारी
२०१२ साली दिग्विजय सिंह हे उत्तर प्रदेश काँग्रेसचे प्रभारी होते. त्यांनी अजय राय यांच्या काँग्रेस प्रवेशासाठी महत्वाची भूमिका बजावली होती. काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर राय यांनी नव्याने तयार झालेल्या वारणसीतील पिंद्रा मतदारसंघातून निवडणूक लढवत विजय मिळवला होता. २०१७ आणि २०२२ सालच्या विधानसभा निवडणुकीत राय यांना पराभवाचा सामना करावा लागला. मात्र तरीदेखील काँग्रेस पक्षाने वेळोवेळी त्यांच्यावर वेगवेगळ्या जबाबदऱ्या दिल्या.
राय यांच्याविरोधात अनेक गुन्हे
अजय राय यांच्याविरोधात अनेक गुन्हे दाखल आहेत. गुंडगिरीतून राजकारणात आलेल्या ब्रिजेश सिंह यांच्याशी अजय राय यांचे चांगले संबंध आहेत, असा दावा केला जातो. २०१५ साली गंगेत गणेश विसर्जन करण्यास परवानगी द्यावी, ही मागी घेऊन काही साधूंनी आंदोलन केले होते. या आंदोलनादरम्यान हिंसाचार घडला होता. याच हिंसाचाराप्रकरणी राय यांना अटक करण्यात आली होती. याच प्रकरणी राय ९ महिने तुरुंगात होते. डिसेंबर २०२२ मध्ये भाजपाच्या नेत्या स्मृती इराणी यांच्याविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी राय यांच्याविरोधात लैंगिक छळाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.