लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने काँग्रेस पक्षाकडून पक्षापातळीवर अनेक बदल केले जात आहेत. नेत्या प्रियांका गांधी यांना उत्तर प्रदेशच्या प्रभारी पदावरून हटवून त्या जागी उत्तर प्रदेशची जबाबदारी राज्यसभा खासदार अविनाश पांडे यांच्याकडे देण्यात आली आहे, तर राजस्थानच्या मुख्यमंत्रिपदासाठी गेल्या अनेक वर्षांपासून प्रयत्नशील असणारे राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री तथा वरिष्ठ नेते सचिन पायलट यांच्यावरदेखील पक्षाने महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे. त्यांची छत्तीसगडचे प्रभारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. दरम्यान, त्यांच्या या नेमणुकीनंतर राजस्थानच्या विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी कोणाकडे सोपवली जाणार? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
मुख्यमंत्रिपदासाठी सचिन पायलट यांची धडपड
गेल्या कित्येक वर्षांपासून राजस्थानच्या काँग्रेसमध्ये नेतृत्त्वावरून वाद आहे. राजस्थान विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा वाद काहीसा शमला होता. राजस्थानचे मुख्यमंत्रिपद मिळावे यासाठी सचिन पायलट कित्येक वर्षांपासून प्रयत्नरत आहेत. मात्र, माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्यामुळे पायलट यांना ती संधी कधी मिळालीच नाही. विधानसभा निवडणुकीच्या अगोदर सचिन पायलट गेहलोत यांच्यावर उघड टीका करत होते. त्यामुळे राजस्थानमधील गटबाजी काँग्रेसच्या हायकमांडसाठी चिंतेचा विषय ठरला होता. विधानसभा निवडणुकीदरम्यान पायलट यांचा विरोधाचा सूर नरमला होता. मात्र, निवडणुकीत आमचा विजय झाल्यास आम्ही सर्व जण आमचा नेता ठरवू, असे सांगताना दिसत होते. त्यामुळे काँग्रेसचा विजय झाल्यास राजस्थानमधील दुफळी आणखी वाढण्याची शक्यता होता. मात्र, विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाला.
विरोधी पक्षनेतेपद कोणाकडे?
काँग्रेस पक्ष उत्तर प्रदेशमध्ये सध्या विरोधी बाकावर आहे. या पक्षाने अद्याप विरोधी पक्षनेत्याची निवड केलेली नाही. असे असतानाच पक्षाने सचिन पायलट यांच्यावर छत्तीसगडच्या प्रभारीपदाची जबाबदारी सोपवली आहे. त्यामुळे काँग्रेस राजस्थानच्या विरोधी पक्षनेतेपदी कोणाची नियुक्ती करणार? असे विचारले जात आहे.
विरोधी पक्षनेतेपदी नवा चेहरा?
दुसरीकडे राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्यावरही राष्ट्रीय स्तरावर नवी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यांची राष्ट्रीय युती समितीचे सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. म्हणजेच, राजस्थान काँग्रेसचे नेतृत्व करणाऱ्या सचिन पायलट आणि अशोक गेहलोत या दोन्ही महत्त्वाच्या नेत्यांना केंद्रीय पातळीवर नवी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यामुळे काँग्रेस राजस्थानमध्ये विरोधी पक्षनेतेपदी नव्या नेत्याची निवड करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.