आगामी लोकसभा निवडणूक लक्षात घेता काँग्रेसने उत्तर प्रदेशमध्ये पक्षांतर्गत मोठा बदल केला आहे. येथे काँग्रेसने अजय राय यांच्यावर प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
उत्तर प्रदेशच्या प्रदेशाध्यक्षपदी अजय राय
अजय राय यांच्याआधी ब्रिजलाल खाबरी यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी होती. मात्र अवघ्या १० महिन्यांत ही जबाबदारी आता काँग्रेसने राय यांच्यावर सोपवली आहे. ब्रिजलाल खाबरी हे काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांचे निटकवर्तीय मानले जातात. खाबरी यांची उचलबांगडी होणे म्हणजे प्रियांका गांधी तसेच उत्तर प्रदेश काँग्रेसचे मुख्यालय पुन्हा एकदा सक्रिय झाल्याचे संकेत आहेत, असे काँग्रेसच्या अनेक नेत्यांना वाटत आहे. तर राय यांच्याकडे प्रदेशाध्यपद आल्यामुळे भविष्यात उत्तर प्रदेश काँग्रेसमध्ये अनेक बदल होऊ शकतात, अशी तेथील नेत्यांनी व्यक्त केली.
प्रियांका गांधी यांचे उत्तर प्रदेशकडे विशेष लक्ष
प्रियांका गांधी या उत्तर प्रदेश काँग्रेसच्या प्रभारी आहेत. २०२२ सालच्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी या राज्याकडे विशेष लक्ष दिले होते. त्या काळात त्या अनेक धडाडीचे निर्णय घेत होत्या. मात्र या निवडणुकीत काँग्रेसला अवघ्या दोन जागा मिळाल्या होत्या.
अजय कुमार लल्लू यांच्यानंतर खाबरी यांच्यावर जबाबदारी
ब्रिजलाल खाबरी हे दलित समाजाचे प्रतिनिधित्व करणारे नेते आहेत. अजय कुमार लल्लू यांच्यानंतर काँग्रेसने खाबरी यांच्यावर प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली होती. २०२२ सालच्या निवडणुकीतील अपयशाची जबाबदारी घेऊन लल्लू त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. मात्र या दोन्ही नेत्यांच्या कार्यकाळात कोणालाही निर्णय घेण्याचे पूर्ण स्वातंत्र्य नव्हते, असे म्हटले जाते.
वाद न होऊ देण्यावर दिल्लीतील नेत्यांचा भर
दरम्यान राय यांच्याकडे आता प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी आल्यानंतर त्यांना निर्णय घेण्याचे पूर्ण स्वातंत्र्य असेल का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. निर्णय घेण्यास स्वातंत्र्य देण्यात न आल्यास भविष्यात पक्षश्रेष्ठी आणि त्यांच्यात वाद होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. २०२४ सालची निवडणूक जवळ आली आहे. अशा परिस्थितीत असा कोणताही वाद न होऊ देण्याकडेच दिल्लीतील काँग्रेसच्या नेत्याचा प्रयत्न असेल.
“पक्षात मोठे बदल होण्याची अपेक्षा”
“बऱ्याच कालावधीनंतर राय हे काँग्रेसचे मजबूत आणि कठोर निर्णय घेणारे नेते ठरू शकतात. लोकांमध्ये भाजपाविषयी नाराजी असूनही याआधीच्या प्रदेशाध्यक्षांना त्याचा पुरेसा फायदा घेता आलेला नाही. त्यामुळे उत्तर प्रदेशातील सर्वच नेते मोठ्या बदलाच्या अपक्षेत आहेत. आता राय यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड झाली आहे. भविष्यात पक्षात मोठे बदल होण्याची शक्यता आहे,” असे काँग्रेसच्या एका नेत्याने सांगितले.
“राय यांना निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य देण्यात येईल अशी अपेक्षा करू”
राय यांच्या नियुक्तीवर काँग्रेसच्या अन्य एका नेत्याने प्रतिक्रिया दिली आहे. “अजय राय यांची काम करण्याची पद्धत ही राहुल गांधी यांच्यासारखी आहे. काँग्रेसच्या नेत्यांना त्यांच्याकडून अपेक्षा आहेत. लोकसभा निवडणुकीपूर्वी आपली टीम तयार करण्यासाठी तसेच उत्तर प्रदेशमध्ये काम करण्यासाठी त्यांना पक्षश्रेष्ठी निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य देईल, अशी अपेक्षा आहे,” असे या नेत्याने म्हटले.
खाबरी यांनी व्यक्त केली नाराजी
दरम्यान, प्रदेशाध्यक्षपाहून पायऊतार व्हावे लागल्यामुळे खाबरी यांनी नाराजी व्यक्त केली आहे. “प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी आल्यानंतर मी लगेच कामाला सुरुवात केली. कारण तेव्हा उत्तर प्रदेशमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत्या. या निवडणुकीदरम्यान होणाऱ्या भ्रष्टाचारवर आळा घालण्याचा मी प्रयत्न केला. कदाचित याच कारणामुळे काही लोकांना मी आवडत नासावा,” असे खाबरी म्हणाले. तसेच पक्ष मला जी जबाबदारी देईल ती पूर्ण क्षमतेने पार पाडेन, असेही त्यांनी स्पष्ट केले.