छत्तीसगडमध्ये या वर्षी विधानसभेची निवडणूक होणार आहे. ही निवडणूक जिंकण्यासाठी काँग्रेसने आतापासूनच तयारी सुरू केली आहे. पक्ष बळकट करण्यासाठी येथे काँग्रेसकडून प्रयत्न केले जात आहेत. दरम्यान भाजपाच्या नंदकुमार साई या बड्या नेत्याने काँग्रेमध्ये प्रवेश केल्यानंतर साधारण महिन्याभरानंतर त्यांची छत्तीसगड औद्योगिक विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी नेमणूक करण्यात आली आहे. साई हे आदिवासी समाजाचे प्रतिनिधित्व करणारे बडे नेते आहेत.
भूपेश बघेल यांनी साई यांना दिल्या शुभेच्छा
साई यांची औद्योगिक विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती केल्यानंतर छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. “औद्योगिक विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी विराजमान झाल्यामुळे साई यांचे अभिनंदन तसेच त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा,” असे भूपेश बघेल म्हणाले आहेत.
निवडणुकीत नंदकुमार साई काँग्रेसचा आदिवासी चेहरा
मागील काही दिवसांपासून ७७ वर्षीय नंदकुमार साई भाजपा पक्षावर नाराज होते. ही नाराजी ओळखून काँग्रेसने राजकीय खेळी करत त्यांना पक्षात दाखल करून घेतले. आगामी निवडणुकीत साई हे काँग्रेसचे आदिवासी समाजाचा चेहरा असतील. सुरगुजा आणि बस्तर या आदिवासीबहुल जिल्ह्यांत प्रचार करण्यासाठी साई यांची काँग्रेसला मदत होणार आहे.
भाजपात असताना साई विरोधी पक्षनेते
१९८० सालापासून साई हे भाजपा पक्षात होते. ते दोन वेळा खासदार तर तीन वेळा आमदार राहिलेले आहेत. साई यांनी विधानसभेचे विरोधी पक्षनेतेपद भूषवलेले आहे. भाजपातील ते एक महत्त्वाचे नेते होते. त्यांना मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार मानले जायचे. मात्र माजी केंद्रीय मंत्री रमण सिंह यांच्यामुळे त्यांची मुख्यमंत्रीपदाची संधी हुकली होती.
साई यांच्या राजीनामापत्रात काय आहे?
साई यांनी भाजपाच्या सदस्यत्वाचा राजीनामा देताना नाराजी व्यक्त केली होती. माझ्याविरोधात कटकारस्थान रचले गेले, असा आरोप त्यांनी केला होता. “मी भाजपामध्ये असताना पक्षाने मला अनेक जबाबदाऱ्या दिल्या. मीदेखील पूर्ण क्षमतेने या जबाबदाऱ्या पार पाडल्या. याबद्दल मी पक्षाचे आभार मानतो. मात्र मागील काही वर्षांपासून माझी प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न करण्यात आला. माझ्यावर खोटे आरोप करण्यात आले. माझ्या राजकीय विरोधकांनी खोटे कट रचले. याच कारणामुळे मला फार दु:ख होत असून मी भाजपाच्या सदस्यत्वाचा तसेच माझ्या सर्व पदांचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे,” असे साई आपल्या राजीनाम्यात म्हणाले होते.
टी. एस. सिंहदेव यांची उपमुख्यमंत्रीपदी नियुक्ती
दरम्यान, या वर्षी छत्तीसगडमध्ये विधानसभेची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीआधी टी. एस. सिंहदेव यांची काँग्रेसने उपमुख्यमंत्रीपदी नियुक्ती केली आहे. छत्तीसगडमधील सरगुजा राजकीय घराणे आणि मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्यातील तणाव कमी व्हावा, यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे म्हटले जात आहे.