छत्तीसगडमध्ये विधानसभा निवडणुकीला अवघ्या सहा महिन्यांपेक्षा कमी कालावधी राहिलेला असताना काँग्रेस पक्षाने संघटनेच्या नेतृत्वात बदल केला आहे. आदिवासी नेते मोहन मरकाम यांना बाजूला सारून, त्यांच्या जागी आणखी एक आदिवासी नेते दीपक बैज (वय ४१) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दीपक बैज हे बस्तर लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत. बुधवारी रात्री काँग्रेसने या निर्णयाची घोषणा केली. छत्तीसगडच्या बस्तरमधील दोन वेळचे आमदार आणि २०१९ साली लोकसभा निवडणूक जिंकलेल्या दीपक बैज यांना काँग्रेसने छत्तीसगडच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी दिली आहे. २०१९ साली राज्यातील ११ खासदारांपैकी काँग्रेसचे केवळ दोन खासदार विजयी झाले; त्यामध्ये बैज यांच्या नावाचा समावेश आहे. सध्या ते आदिवासी व्यवहार मंत्रालयाच्या सल्लागार समितीमध्ये आहेत.
खासदार म्हणून निवडून आल्यानंतर बैज यांनी परराष्ट्र व्यवहार विभागाच्या स्थायी समितीचे सदस्य म्हणून २०२० पर्यंत काम पाहिले. त्यानंतर रसायन व खते विभागाच्या स्थायी समितीमध्येही सदस्य म्हणून त्यांची निवड झाली होती.
हे वाचा >> काँग्रेससाठी छत्तीसगड केवळ ‘एटीएम’ मशीन; पंतप्रधान नरेंद्र मोदींची टीका
काही दिवसांपासून मुख्यमंत्री भूपेश बघेल आणि प्रदेशाध्यक्ष मोहन मरकाम यांच्यात मतभेद निर्माण झाल्याची कुजबुज ऐकायला येत होते. त्या अनुषंगाने काँग्रेस श्रेष्ठींनी प्रदेशाध्यक्ष बदलण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगण्यात येते. छत्तीसगडमधील काही नेत्यांचे म्हणणे आहे की, या निर्णयामुळे विधानसभेच्या ९० जागांसाठी उमेदवारांची निवड करताना भविष्यात काँग्रेसलाच अडचण निर्माण होऊ शकते.
कोण आहेत दीपक बैज?
विद्यार्थीदशेत असल्यापासून दीपक बैज भारतीय राष्ट्रीय विद्यार्थी संघटनेत कार्यरत होते. २००८ साली त्यांना विद्यार्थी संघटनेचे बस्त जिल्हाध्यक्ष पद देण्यात आले होते. २००९ साली युवक काँग्रेसचे महासचिव म्हणून त्यांना बढती मिळाली. २०१३ साली दीपक बैज यांना चित्रकूट विधानसभेसाठी तिकीट मिळाले आणि त्यांनी पहिल्याच निवडणुकीत यश मिळवले. २०१८ साली पुन्हा एकदा चित्रकूट विधानसभेतून निवडणूक लढवत त्यांनी १७ हजारांच्या मत्याधिक्याने विजय प्राप्त केला. दीपक बैज यांची लोकप्रियता वाढल्यामुळे २०१९ साली त्यांना बस्तरमधील लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास सांगण्यात आले. याही निवडणुकीत त्यांनी विजय मिळवला. देशभरात भाजपाची लाट असतानाही दीपक बैज यांनी लोकसभा निवडणूक जिंकून दाखवली. त्यानंतर त्यांना अखिल भारतीय आदिवासी काँग्रेस कमिटीचे राष्ट्रीय उपाध्यक्षपद देण्यात आले.
आणखी वाचा >> राज्यातील शेतकऱ्यांसाठी कर्जवाटपाचे ‘छत्तीसगड मॉडेल’?
दीपक बैज यांच्यासमोरील आव्हाने काय आहेत?
पुढील सहा महिन्यांत छत्तीसगड विधानसभेची निवडणूक होणार आहे. काँग्रेससमोर राज्याची सत्ता राखण्याचे मोठे आव्हान आहे. त्यासाठीच काही महिन्यांपूर्वी काँग्रेसचे राष्ट्रीय अधिवेशन रायपूर येथे घेण्यात आले होते. यावेळी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी छत्तीसगडच्या नेत्यांसोबत बैठक घेऊन आगामी निवडणुकीत सर्वांनी एकमुखाने निवडणुकीला सामोरे जावे, असे आवाहन केले. विरोधात असलेल्या भाजपाकडून सरकारला घेरण्याची कोणतीही संधी सोडण्यात येत नाही. छत्तीसगडची स्थापना झाल्यापासून दीर्घकाळापर्यंत या राज्यात भाजपाची सत्ता होती. त्यामुळे पुन्हा सत्ता प्राप्त करण्यासाठी भाजपाकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर स्वपक्षातील दुफळी आणि विरोधकांचे आव्हान, अशी दुहेरी कसरत करण्याचे काम दीपक बैज यांना करावे लागणार आहे.