राजस्थान काँग्रेसमध्ये मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट समर्थक असे दोन गट पडले आहेत. या वर्षी डिसेंबर महिन्यात येथे विधानसभा निवडणूक होण्याची शक्यता आहे. असे असताना राजस्थानच्या नेत्यांमध्ये असलेले मतभेद यामुळे काँग्रेसची चिंता वाढली आहे. दुसरीकडे दिवसेंदिवस निवडणूक जवळ येत असून पुन्हा एकदा काँग्रेसचा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार कोण असणार? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. काँग्रेस पक्ष यावेळी तरुण नेत्याला संधी देणार की जुन्याजाणत्या नेत्याला म्हणजेच अशोक गेहलोत यांनाच मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून घोषित केले जाणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
अनेक आमदार यावेळी निवडणूक लढवणार नाहीत
काँग्रेस पक्षाचे नेते तथा श्रीमाधोपूर मतदारसंघाचे आमदार दीपेंद्र सिंह शेखावत यांनी आगामी विधानसभा निवडणूक लढवणार नसल्याचे जाहीर केले आहे. शेखावत हे सचिन पायलट यांचे समर्थक आहेत. पायलट यांच्या नेतृत्वाखाली २०२० साली काँग्रेसच्या १८ आमदारांनी बंड केले होते. या बंडखोर आमदारांमध्ये शेखावत यांचा समावेश होता. संगोड मतदासंघाचे आमदार भरत सिंह आणि गुडमलानीचे आमदार हेमाराम चौधरी हेदेखील आगामी विधानसभा निवडणूक लढणार नाहीत, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. भरत सिंह यांनी काही वर्षांपूर्वीच मी विधानसभेची निवडणूक लढवणार नाही, असे सांगितलेले आहे. तर चौधरी यांनी २०१८ सालीच निवडणूक लढवणार नाही, असे जाहीर केले होते. मात्र पायलट यांच्या आग्रहामुळे त्यांनी निवडणूक लढवली होती. दरम्यान, मागील काही दिवसांपासून आगामी निवडणुकीत तरुणांना संधी द्यावी. जुन्या आणि ज्येष्ठ नेत्यांनी तरुणांसाठी मार्ग मोकळा केला पाहिजे, असे चौधरी सातत्याने म्हणत आहेत.
…तर राजस्थानमधील चित्र बदलेल
“निवडणूक लढवू नको, असे मला कोणीही सांगितलेले नाही. तरुणांना संधी मिळावी म्हणून मी स्वत:च हा निर्णय घेतला आहे. मी मुख्यमंत्र्यांनाही सांगतो की नव्या चेहऱ्यांना संधी दिली पाहिजे. तरुणांनी पुढे यायला हवे. गेहलोत यांनी पत्रकार परिषद घेऊन मला राजस्थानमध्ये काँग्रेसचे सरकार हवे आहे, मात्र मी मुख्यमंत्रीपदावर दावा करणार नाही. त्याऐवजी मी तरुणांना पुढे करणार आहे, असे सांगितल्यास राजस्थानमध्ये सकारात्मक परिणाम दिसतील,” असे भरत सिंह काही दिवसांपूर्वी म्हणाले होते.
पायलट गटातील नेत्यांची अशोक गेहलोत गटावर अप्रत्यक्ष टीका
गेहलोत यांना समर्थन करणारे बरेच नेते लवकरच वयाची ८० वर्षे पूर्ण करणार आहेत. त्यामुळे सिंह, चौधरी आणि शेखावत आदी नेत्यांनी वरील विधाने करून अशोक गेहलोत तसेच गेहलोत यांचे निष्ठावंत यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका केली आहे. कोटा उत्तर मतदारसंघाचे आमदार तसेच मंत्री शांती धारीवाल हे ७९ वर्षांचे आहेत. गेहलोत यांचे विश्वासू सहकारी म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. शिक्षणमंत्री बी. डी. कल्ला हेदेखील ७० वर्षांचे आहेत. कल्ला यांना आगामी काळात तिकीट मिळणार की नाही? याबाबत अस्पष्टता आहे. कारण गेहलोत यांचे ओएसडी असलेले लोकेश शर्मा कल्ला यांच्या मतदारसंघातून लढण्यास उत्सुक आहेत. तरीदेखील ते आगामी विधानसभा लढण्यावर ठाम आहेत. दरम्यान पायलट गटातून जुन्या नेत्यांना तिकीट देऊ नये, असे म्हटले जात असले तरी गेहलोत गटातील धारीवाल यांच्यासारखे नेते निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत.
२०१८ सालच्या निवडणुकीचा निकाल काय सांगतो?
राजस्थानमध्ये काँग्रेसने तरुण नेत्यांना संधी द्यावी, तरुणांकडे नेतृत्व सोपवावे अशी मागणी केली जात आहे. मात्र २०१८ सालचे निकाल पाहता बहुतांश वरिष्ठ आणि जुन्या नेत्यांनीच निवडणुकीत बाजी मारलेली आहे. २०१८ सालच्या निवडणुकीदरम्यान सचिन पायलट हे राजस्थान काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी होते. तेव्हा गेहलोत यांच्या अनेक निष्ठावंताना तिकीट नाकारण्यात आले. त्या निवडणुकीत पक्षाने अनेक तरुण नेत्यांना तिकीट दिले होते. या निवडणुकीत तिकीट न दिल्यामुळे अनेक जुन्या नेत्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती. विशेष म्हणजे अपक्ष निवडणूक लढवलेल्या बहुतांश जुन्या नेत्यांचा विजय झाला होता. त्यांनी काँग्रेसच्या तरुण उमेदवारांचा पराभव केला होता. त्यामुळे नव्या नेत्यांना संधी देणे काँग्रेसला परवडणारे आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
“जो जिंकण्याची शक्यता, त्यालाच तिकीट देणार”
दरम्यान, राजस्थानमधील अनेक जुन्या नेत्यांच्या प्रभावाची काँग्रेसला जाणीव आहे. त्यामुळे वयाच्या निकषावर काँग्रेसने अद्याप कोणतीही भूमिका घेतलेली नाही. वयाच्या निकषाबद्दल राजस्थान काँग्रेसचे प्रभारी सुखजिंदरसिंग रंधावा यांनी सूचक विधान केले होते. “जो उमेदवार जिंकण्याची शक्यता जास्त आहे, त्याला तिकीट दिले जाणार आहे. तुमच्या घरातील एखाला सदस्य म्हातारा झाल्यावर तुम्ही त्याला घराबाहेर काढता का?” असे रंधावा म्हणाले होते.
दरम्यान, रंधावा यांचे विधान तसेच तेथील स्थानिक नेत्यांच्या भूमिका यामुळे काँग्रेस आगामी काळात मुख्यमंत्रीपदाबाबत काय निर्णय घेणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. सध्यातरी याबाबत अस्पष्टता आहे.