Congress Belagavi session : काँग्रेसने महात्मा गांधी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या अधिवेशनाचा शताब्दी सोहळा साजरा करण्यासाठी जय्यत तयारी केल्याने बुधवारी बेळगाव शहर उत्साहाने गजबजलेलं होतं. मात्र, सुमारे ३० किलोमीटर अंतरावर असलेल्या हुदली गावात जनजीवन नेहमीप्रमाणे सुरू होतं. महात्मा गांधींच्या शिकवणीचं पालन करण्यात हे गाव अभिमान बाळगतं. १९३७ मध्ये महात्मा गांधी यांनी हुदली गावात आठवडाभर मुक्काम केला होता. कर्नाटकचा सिंह म्हणून ओळखले जाणारे स्वातंत्र्यसैनिक गंगाधरराव देशपांडे यांच्या निमंत्रणावरून त्यांनी गावात अनेक सभाही घेतल्या होत्या. गंगाधरराव देशपांडे या गावातच जन्मले होते.
गांधीजींनी केला होता हुदली गावात मुक्काम
महात्मा गांधी यांनी गावाला दिलेल्या भेटीची कथा पिढ्यानपिढ्यापासून प्रचलित आहे. १७ एप्रिल ते २४ एप्रिल १९३७ या कालावधीत गांधीजींनी गावाला भेट दिली होती. तेव्हा त्यांना राहण्यासाठी काही झोपड्या बांधण्यात आल्या. मात्र, मुसळधार पावसामुळे त्या उद्ध्वस्त झाल्या. त्यावेळी गांधीजींनी भर पावसात चालत गावातील कुमारी आश्रमात मुक्काम केला. “मला हे बाबांनी सांगितलं आणि त्यांना आजीने सांगितलं होतं, असं गावातील नारळपाणी विक्रेत्याच्या दुकानात बसलेले ऊस उत्पादक शेतकरी अफरोज मुजावर म्हणाले.”
यावेळेही नेहरू किंवा गांधी घराण्यातील कोणीतरी एखादा व्यक्ती आमच्या गावाला भेट देईल, अशी आशा अफरोज मुजावर यांनी व्यक्त केली. ते म्हणाले की, दोन्ही घराण्यांपैकी एक कुणीतरी येत आहे. महात्मा गांधी १९३७ मध्ये हुदली गावात आले होते. त्यामुळे कदाचित ते देखील येण्याची शक्यता आहे.”
महात्मा गांधी यांनी ज्या आश्रमात मुक्काम केला होता, ते अनधिकृत अतिक्रमणामुळे नष्ट झाले आहे. परंतु कर्नाटकमध्ये १९८२ मध्ये गांधी-गंगाधरराव स्मारक बांधण्यात आले. बुधवारी तेथे नूतनीकरणाचे काम सुरू होते. इमारत लहान असून तिच्या दोन्ही बाजूला काही झोपड्या आहेत. या इमारतीत एक छोटीशी गॅलरी असून त्यामध्ये महात्मा गांधी यांचे गावातील तसेच इतर ठिकाणचे आहेत. इमारतीतील एका छोट्याशा विभागात महिला आजही खादी विणण्याचे काम करतात.
गावात आजही केले जाते खादी विणण्याचे काम
“हुदली गावात ५०० कुटुंब राहतात, यापैकी २०० हून अधिक कुटुंबे खादी विणण्याचे काम करतात. गावाला खादीचे महत्व चांगलेच माहिती आहे. गावकरी कोणत्याही इलेक्ट्रिकल मशीनशिवाय खादी विणण्याचे काम करतात, अगदी महात्मा गांधी यांच्यासारखीच खादी ते विणतात”, असे हुडाली येथील खादी आणि ग्रामउद्योग सहकारी संघ लिमिटेडचे सचिव राघवेंद्र हम्मणवार (वय ४४) यांनी सांगितले. ते म्हणाले, “या संस्थेकडून गावातील स्मारकाची देखरेख आणि खादी उत्पादनाचे काम केले जाते.”
हम्मणवार म्हणाले की, “खादीच्या माध्यमातून ही संस्था दरवर्षी ३ ते ४ कोटी रुपये कमावते. जे कामगार कापसापासून धागा आणि धाग्यापासून कापड तयार करतात त्यांना उत्पादनावर आधारित दिवसाला १५० ते २०० रुपये दिले जातात”. कारखान्यातील सूत वेगळे करत असताना शिरीन अलताफ दरवाई (वय ३६) ही महिला म्हणाली, “होय, आम्हाला जास्त पैसे मिळत नाहीत, पण या पैशांचे आम्ही काय करणार? गांधीजींनी आम्हाला जे काम करायला शिकवले होते, तेच चरखा चालवण्याचे काम आम्ही करत आहोत”.
गावात दारू, बिडीचे एकही दुकान नाही
स्मारकापासून सुमारे ५०० मीटर अंतरावर गावात एक कापड गिरणी देखील आहे, जिथे गोदामातून धागा घेतला जातो आणि कापड विणले जाते. नंतर हे कापड कर्नाटकातील चार दुकानांमध्ये विकले जाते. त्यापैकी एक हुदली येथे आहे. कापसापासून धागा तयार करणे आणि धाग्यापासून कापड तयार करण्याचे सर्व काम हाताने केले जाते. या प्रक्रियेत फक्त चरख्याचा वापर केला जातो, कोणतीही इलेक्ट्रिकल मशीन वापरली जात नाही.
स्वातंत्र्य संग्रामाच्या स्वराज चळवळीदरम्यान प्रेरणास्थान असलेली खादीच नव्हे तर महात्मा गांधींनी सांगितलेल्या इतर तत्त्वांचेही गावाकडून पालन केले जाते. विशेष बाब म्हणजे, गावात आजवर एकही दारूचे दुकान नाही. तसेच बिडी आणि सिगारेटही विकले जात नाही. आतापर्यंत गावात कोणताही जातीयवाद किंवा हिंसाचार झालेला नाही. जाती आणि समुदायाच्या आधारावर घरांची विभागणी झालेली नाही.
गावात हिंसाचाराची एकही घटना नाही.
बुधवारी स्मारकाला भेट देणारे शेतकरी सीबी मोदगी (वय ८४) म्हणाले की, “माझे आता वय झाले असून मी लहानपणापासून गावातच राहिलेलो आहे. माझ्या संपूर्ण आयुष्यात मी गावात हिंसाचार झालेला पाहिला नाही. आम्ही सर्वजण शांततेत राहतो, कारण आम्ही स्वतः गांधीजींच्या विचारांवर चालतो. इतर ठिकाणांप्रमाणे गावातून क्वचितच काही लोक कामासाठी बाहेरगावी जातात. नवी पिढी कामासाठी बाहेर जात असून आम्ही गावातच राहणे पसंत केले आहे.” महात्मा गांधी यांच्या भेटीची आठवण काढत मोदगी म्हणाले, “गांधीजी दररोज गावात सभा घेत होते. आश्रमातून निघाल्यानंतर ते गावात फिरून लोकांच्या भेटीगाठी घ्यायचे. तसेच त्यांना खादी, स्वराज्य आणि एकात्मतेचे महत्त्व सांगायचे. देश विसरला असला तरीही आम्ही गांधीजींनी सांगितलेल्या तत्वांचे पालन करत आहोत.”
हेही वाचा : BJP : भाजपा निवडणार नवा राष्ट्रीय अध्यक्ष, कुठल्या खास निकषांवर होणार निवड?
हुदली गावामध्ये ६० टक्के लिंगायत समाज आणि ३० टक्के अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींची लोकसंख्या आहे, तर उर्वरित १० टक्के लोक मुस्लिम आहेत. मुस्लिम समुदायातील एका व्यक्तीने सांगितले की, “गावात जात आणि धर्म यावरून कोणताही भेदभाव केला जात नाही.” किराणा दुकानाचे मालक असलेले २४ वर्षीय सत्यश म्हणाले की, “जेव्हा आम्ही बाहेर जातो, तेव्हा लोक आम्हाला विचारतात की तुम्ही हिंदू आहात की मुस्लीम, नंतर ते आमची जात विचारतात. माझ्या गावात मला कधीही हा प्रश्न विचारण्यात आला नाही.”
हुदली गावाचे प्रमुख काय म्हणाले?
गावातील खादी उद्योग २०० हून अधिक कुटुंबांना रोजगार देत असला तरी, उर्वरित लोक बेळगाव येथील शुगर प्रायव्हेट लिमिटे या कंपनीत काम करतात. काहीजण कापूस, ज्वारी, ऊस आणि भाजीपाल्याची शेती करतात. गावाचे प्रतिनिधीत्व करणारे रहमतुल्ला जे. बांदी (वय ४६) यांच्या पत्नी तबस्सुम म्हणाल्या की, “गावाकडे बघितल्यास तुम्हाला काही घरांवर गवताचं छत दिसेल. परंतु, यातील अनेक घरं पक्की आहेत. आम्ही नेहमी एकमेकांची मदत करतो, इथे कोणी फार श्रीमंत किंवा गरीब नाही. गांधीजींनी सांगितलेल्या तत्वांचे पालन करून आम्ही एकजुटीने राहतो.”
राहुल गांधी देणार का गावाला भेट?
नेहरू-गांधी कुटुंबातील सदस्य प्रियंका गांधी वाड्रा आणि राहुल गांधी यांच्या गावातील संभाव्य भेटीबद्दल बांदी यांना विचारले असता, ते म्हणाले ही फक्त एक अफवा आहे. एक महिन्यापूर्वी गावात कर्नाटक सरकारमधील दोन मंत्री आले होते. त्यांनी गांधीजींच्या स्मारकाच्या देखभालीसाठी आणि गावातील इतर विकासकामांसाठी ४ लाख रुपये मंजूर करून दिले. बेळगाव शहरात काँग्रेसची सभा असेल तेव्हा आम्ही गावाला भेट देऊ असं या मंत्र्यांनी आम्हाला सांगितले. पण त्यानंतर गावात कुणीही आले नाही. आम्ही आशा करतो की, यावेळी कुणीतरी गावाला भेट देईल. उशिरा का होईना ते आलेत तर आम्हाला आनंद होईल, असं बांदी यांनी सांगितले.
दरम्यान, महात्मा गांधी यांच्या विचारांचे पालन करणाऱ्या हुदली गावाला भेट देण्याबाबत काँग्रेसकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नाही. काँग्रेस पक्षाचे सर्व निर्णय घेणाऱ्या काँग्रेस कार्यकारिणी समितीचे बेळगाव शहरात २६ डिसेंबरपासून विस्तारित अधिवेशन सुरू होणार आहे. १९२४ मध्ये बेळगावच्या ऐतिहासिक अधिवेशनाचे अध्यक्षपद भूषविणाऱ्या महात्मा गांधी यांच्या शताब्दी वर्षानिमित्त हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. यासाठी काँग्रेसचे अनेक दिग्गज नेते बेळगावमध्ये तळ ठोकून आहेत.