महेश सरलष्कर
काँग्रेसला दुय्यम स्थान देऊन वा वगळून बिगरभाजप विरोधकांची एकजूट करणाऱ्या विरोधी पक्षनेत्यांना काँग्रेसने चपराक दिली आहे. ‘भारत जोडो यात्रेमुळे काँग्रेसचा हत्ती जागा झालेला आहे. काँग्रेस हाच भाजपविरोधी ऐक्याचा प्रमुख स्तंभ आहे, हे भाजपेतर पक्षांनी लक्षात घ्यावे’, असे काँग्रेसने ‘यूपीए’तील घटक पक्ष तेच अन्य प्रादेशिक पक्षांना ठणकावले आहे.
हेही वाचा <<< बावनकुळेंचे स्वप्न अन् शिंदे गटात चलबिचल
दिल्लीमध्ये रविवारी झालेल्या ‘राष्ट्रवादी काँग्रेस’च्या राष्ट्रीय अधिवेशनामध्ये पी. सी. चाको यांनी विरोधी ऐक्यामध्ये शरद पवार हेच महत्त्वाची भूमिका बजावू शकतात, असे विधान केले होते. त्यावर, काँग्रेसचे माध्यम विभागाचे प्रमुख जयराम रमेश यांनी, ‘आता विरोधी पक्षांचे काँग्रेसकडे लक्ष वेधले गेले आहे. भारत जोडो यात्रेमध्ये काँग्रेस काय करत आहे, याची त्यांना उत्सुकता निर्माण झाली आहे. पण, ही यात्रा विरोधकांची एकजूट करण्यासाठी काढलेली नाही. देशातील लोकांना जोडण्यासाठी आणि काँग्रेसला मजबूत करण्यासाठी काढलेली आहे’, अशा आक्रमक शब्दांत विरोधकांच्या ऐक्यातील अंतर्विरोधावर त्यांनी बोट ठेवले.
हेही वाचा <<< राजस्थान: काँग्रेसमधील पक्षांतर्गत संघर्ष पुन्हा चव्हाट्यावर
‘काँग्रेस मजबूत असेल तरच विरोधकांची भक्कम एकजूट होऊ शकते. काँग्रेसला वगळून विरोधकांचे ऐक्य होऊ शकत नाही. विरोधकांची एकजूट म्हणजे काँग्रेसला कमकुवत करणे होत नाही. ही बाब काँग्रेस आघाडीतील घटक पक्षांनाही समजून घेतली पाहिजे. काँग्रेस स्वतःला आणखी कमकुवत होऊ देणार नाही. मजबूत काँग्रेस हाच भाजपविरोधी ऐक्याचा प्रमुख स्तंभ आहे’, असे जयराम रमेश म्हणाले. ‘भारत जोडो’ यात्रेमुळे काँग्रेसच्या पक्षसंघटनेत नवी उर्जा निर्माण होत आहे. ब्लॉक स्तर, जिल्हा व राज्यस्तरावर उत्साह संचारू लागला आहे. त्यांच्यामध्ये आशा-आकांशा निर्माण झाली आहे. लोक स्वतः यात्रेत सकाळी येताना दिसतात, काँग्रेसचे कार्यकर्ते त्यांना बोलवायला जात नाहीत. सकाळी ५ हजार तर, संध्याकाळी २५-३० हजार लोक यात्रेत सहभागी होत आहेत. ही यात्रा सकाळी सात वाजता सुरू होते पण, ती सहा वाजताच सुरू झाली पाहिजे असे राहुल गांधींचे म्हणणे आहे, असे रमेश म्हणाले.
आम्ही दुपटीने आक्रमक होऊ!
काँग्रेसचे तत्कालीन राष्ट्रीय प्रवक्ते विठ्ठलराव गाडगीळ यांनी संघाबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर द्यायला नकार दिला होता. ते म्हणाले होते की, ‘आरएसएस’ म्हणजे ‘रूमर स्प्रेडिंग सोसायटी’ (अफवा पसरवणारी संघटना) आहे. संघ व भाजप नेहमीच द्वेषाचे राजकारण करतो. पण, त्यांच्या खोट्या प्रचाराला काँग्रेस आक्रमकपणे प्रत्युत्तर देत आहे. संघ आणि भाजपला काँग्रेसकडून आक्रमक प्रत्युत्तराची अपेक्षाच नव्हती. आता काँग्रेस आक्रमक प्रत्युत्तर देऊ लागल्यावर धक्का बसल्यामुळे भाजप मागे जाऊ लागला आहे. जेवढा भाजप आक्रमक होईल, त्याच्या दुपटीने काँग्रेस आक्रमक होऊन प्रत्युत्तर देईल, असा काँग्रेसची बदललेली भूमिका स्पष्ट केली.
‘खोटेपणाचे कारखाने ओव्हरटाइम सुरू’
कन्याकुमारीहून यात्रा सुरू करूनही राहुल गांधींनी विवेकानंदांच्या स्मारकाला भेट दिली नाही, ते ४५ हजारांचा टी शर्ट घालतात, अशा अनेक अफवा भाजपकडून पसरवल्या जात आहेत. अमित शहा, स्मृती इराणी, तेजस्वी सूर्या या भाजपचे नेत्यांमुळे भाजपमधील ‘खोटेपणाचे कारखाने ओव्हरटाइम सुरू’ आहेत, असा टोलाही रमेश यांनी हाणला. ही खोटी विधाने म्हणजे काँग्रेसच्या ‘भारत जोडो’ची भाजपला भीती वाटू लागल्याचे लक्षण आहे. पारदर्शकता असावी या मुख्य उद्देशाने यात्रेचे थेट प्रक्षेपण केले जात आहे. त्यामुळे राहुल गांधींनी विवेकानंदांच्या स्मारकाला भेट दिली की नाही हे लोकांना समोर दिसते. भाजपच्या खोटेपणाला काँग्रेसने प्रत्युत्तर दिलेले आहे, असे रमेश म्हणाले.