काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वातील ‘भारत जोडो’ यात्रा शनिवारी पहाटे हरिणायातून दिल्लीत दाखल झाली. यावेळी दिल्ली काँग्रेसचे अध्यक्ष अनिल चौधरी यांनी बदरपूर सीमेजवळ ‘भारत जोडो’ यात्रेचं स्वागत केलं. ही यात्रा दिल्ली दाखल होताच काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी वाड्रादेखील सहभागी झाल्याचं बघायला मिळालं.
‘असा’ असेल भारत जोडो यात्रेचा कार्यक्रम
भारत जोडो यात्रा हरियाणातून दिल्लीत दाखल झाली असून आज ही यात्रा २३ किलोमीटरचा प्रवास करणार आहे. सकाळी ६ वाजता एनएचपी मेट्रो स्टेशनवरून या यात्रेला सुरूवात झाली असून आश्रम चौक मार्गे लाल किल्ल्याजवळ या यात्रेचा समारोप होईल. यादरम्यान वीर भूमी, शक्ती स्थळ, शांती वन आणि राजघाटवर श्रद्धांजली कार्यक्रमदेखील आयोजित करण्यात आला आहे.
‘भारत जोडो’ यात्रा दिल्लीत पोहोचताच राहुल गांधी यांनी भाजपासह आरएसएसवर जोरदार टीका केली. तसेच त्यांनी करोनामुळे ‘भारत जोडो’ यात्रा स्थगित करा म्हणणाऱ्या केंद्रीय आरोग्यमंत्र्यांवरही टीकास्र सोडले. “भाजपा आणि आरएसएसची लोकं या देशात द्वेष पसरवायचं काम करत आहेत. आम्ही ज्या राज्यांमध्ये गेलो, तिथे लाखोंच्या संख्येने लोकं यात्रेत सहभागी झाले. लोकांनी आम्हाला भरभरून प्रेम दिलं”, अशी प्रतिक्रिया राहुल गांधी यांनी दिली. तसेच करोनाच्या बहाण्याने मोदी सरकारकडून ‘भारत जोडो’ यात्रेत थांबवण्याचा प्रयत्न सुरू आहे, असेही ते म्हणाले.
हेही वाचा – ‘भारत जोडो’ यात्रा आज दिल्लीत; करोनाबाबत खबरदारीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस-भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोप
तत्पूर्वी भारत जोडो यात्रा बदरपूरमध्ये पोहोचताच स्थानिक काँग्रेस नेत्यांनी या यात्रेचे जोरदार स्वागत केले. यावेळी मोठ्या संख्येने काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी बोलताना, “मी द्वेषाच्या बाजारात प्रेमाचे दुकान उघडण्यासाठी आलो आहे”, अशी प्रतिक्रिया राहुल गांधी यांनी दिली. “केवळ हाताच्या बोटावर मोजण्या इतके लोकं या देशात द्वेष पसरवत असून शेतकरी, गरीब, मजदूरांसह देशातील जनता हातात हात पकडून भारत जोडो यात्रेत चालत आहेत. आम्ही कन्याकुमारीपासून तीन हजार किलोमीटरचे अंदर पार केले आहे. मात्र, आम्ही कोणालाही त्यांच्या जातीबद्दल विचारले नाही”, असेही ते म्हणाले.