तेलंगणातील काँग्रेसच्या ‘भारत जोडो’ यात्रेत रविवारी सकाळी एक हृदयस्पर्शी दृश्य पाहायला मिळालं. या यात्रेत शाळकरी मुलं सहभागी होताच काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्यात नवा उत्साह संचारला. ते या शाळकरी मुलांसोबत यात्रेत धावू लागले. त्यांचा हा व्हिडीओ ‘भारत जोडो’ यात्रेच्या ट्विटर हँडलवर काँग्रेसकडून शेअर करण्यात आला आहे. “यात्रेत चालत असताना, वेग वाढवूया… देशाला एकजुट करण्यासाठी एकत्र येऊया” असे हा व्हिडीओ पोस्ट करत काँग्रेसनं म्हटलं आहे.
भारत जोडो यात्रींसाठी मराठवाडी-खान्देशी भोजन
या यात्रेदरम्यान राहुल गांधी अचानक धावायला लागताच त्यांच्या सुरक्षा रक्षकांची बरीच दमछाक झाली. राहुल गांधीचा उत्साह पाहता तेलंगणा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष रेवंत रेड्डींसह अन्य कार्यकर्त्यांनीही पदयात्रेत धावायला सुरुवात केली. यावेळी काँग्रेसच्या या पदयात्रेला मॅरेथॉनचं स्वरुप प्राप्त झालं होतं.
काँग्रेसच्या ‘भारत जोडो’ यात्रेचा आज ५३ वा दिवस आहे. कन्याकुमारीतून सुरू झालेल्या या यात्रेचा सध्या तेलंगणातून प्रवास सुरू आहे. रविवारी सकाळी जडचर्लामधून या यात्रेला सुरुवात झाली आहे. ही यात्रा तेलंगणामध्ये तब्बल ३७५ किलोमीटरचा प्रवास करणार आहे. या यात्रेच्या समन्वयासाठी तेलंगणा काँग्रेसनं १० समित्यांची स्थापना केली आहे. दरम्यान, आज संध्याकाळी राहुल गांधी सोलीपूरमध्ये सभेला संबोधित करणार आहेत. तेलंगणानंतर चार नोव्हेंबरला या यात्रेचं आगमन महाराष्ट्रात होणार आहे.