सुजित तांबडे
राज्य सरकारने राजकीय आणि सामाजिक आंदोलनातील खटले मागे घेण्याचा निर्णय घेतला असताना, पुण्यातील काँग्रेस भवनमध्ये घुसून भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या आंदोलनाच्या गुन्ह्यावरून राजकीय वातावरण तापले आहे. हा गुन्हा ‘राजकीय’ म्हणून पोलीस दप्तरी नोंदविण्यात आला असून, या गुन्ह्याची पडताळणी करण्याची मागणी काँग्रेसचे प्रभारी शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी केल्याने काँग्रेस आणि भाजपमध्ये जुंपली आहे.
काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केल्याने भाजप युवा मोर्च्याच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस भवनमध्ये घुसून ‘माफीवीर जवाहरलाल नेहरू’ अशा मजकुराचे स्टीकर लावले होते. तसेच राहुल गांधी यांच्या छायाचित्राला काळे फासून निषेध नोंदविला होता. या गुन्ह्याची ‘राजकीय गुन्हा’ म्हणून नोंद झाली आहे. हा गुन्हा १८ नोव्हेंबर २०२२ रोजी घडला होता. राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार ३० जून २०२२ पर्यंतचे राजकीय आणि सामाजिक खटले हे मागे घेतले जाणार आहेत. हा गुन्हा त्यानंतर घडला असल्याने खटले मागे घेण्याच्या निर्णयाचा लाभ या गुन्ह्याला मिळणार नाही. मात्र, आता या गुन्ह्यावरून काँग्रेस आणि भाजपमध्ये वातावरण तापले आहे.
काँग्रेसचे प्रभारी अध्यक्ष अरविंद शिंदे यांनी या गुन्ह्याची नोंद सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली राजकीय गुन्हा म्हणून नोंदविण्यात आला असल्याचा आरोप केला आहे. याबाबत शिंदे म्हणाले, ‘करोना काळात सर्वसामान्य नागरिकांवर दाखल झालेले गुन्हे तातडीने माफ करण्यात यावेत. या मागणीला पाठिंबा आहे. मात्र, काँग्रेस भवनवर झालेला हल्ला हा गंभीर गुन्हा आहे. पोलीस उपायुक्तांमार्फत समिती स्थापन करून त्याची पडताळणी करावी, अशी मागणी आहे. पोलीस आयुक्तांना याबाबतचे निवेदन देण्यात आले आहे. पुणे शहरात काँग्रेस भवन ही ऐतिहासिक महत्व असलेली पवित्र वास्तू आहे.
हेही वाचा >>> चर्चेतील चेहरा, के. चंद्रशेखर राव यांची राजकीय महत्त्वाकांक्षा पूर्ण होणार का?
भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस भवनच्या इमारतीवर हल्ला करून दगडफेक केली व आमचे नेते राहुल गांधी याच्या प्रतिमेचे विद्रुपीकरण केले. तरीही सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली राजकीय गुन्हा म्हणून नोंदविण्यात आलेला आहे. त्यामुळे या गुन्ह्याची चौकशी करण्याची मागणी केली आहे. याबाबत भाजपचे शहराध्यक्ष माजी आमदार जगदीश मुळीक यांच्याशी संपर्क साधण्यात आला असता, त्यांनी ‘याबाबत माहिती घेतो’ असे सांगून अधिक बोलणे टाळले.
दरम्यान, काँग्रेसच्या एका गटाने सरसकट सर्व गुन्हे मागे घेण्याची मागणी केली आहे. त्यामध्ये माजी आमदार मोहन जोशी, रमेश बागवे यांचा समावेश आहे. याबाबत माजी आमदार जोशी म्हणाले, ‘करोना काळात दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याची मागणी केली आहे. काँग्रेस भवनवर झालेला हल्ला हा राजकीय गुन्हा नाही’.