पुढील वर्षी मे महिन्यात कर्नाटकमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसने येथे भाजपाविरोधी प्रचारास सुरुवात केली आहे. काँग्रेसने येथे भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून रान पेटवले असून ठिकठिकाणी क्यूआर कोडमध्ये मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांचा फोटो लावण्यात आला आहे. विशेष म्हणजे या क्यूआर कोडसोबत “PayCM” म्हणजे ‘मुख्यमंत्र्यांना पैसे द्या’ असे लिहिलेले असून या माध्यमातून भाजपाचे सरकार भ्रष्ट असल्याचा दावा येथे काँग्रेसकडून केला जातोय. तर काँग्रेसच्या या प्रचार मोहिमेचा भाजपाने धसका घेतला असून मुख्यमंत्री बसवराजी बोम्मई यांनी संबंधित अधिकाऱ्यांना गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> झारखंड : रस्ते दुरावस्थेच्या मुद्द्यावरून आरोप-प्रत्यारोप; काँग्रेसच्या महिला आमदाराचे चक्क खड्ड्यात बसून आंदोलन

मागील आठवड्यात कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई तेलंगाणातील हैदरबादच्या दौऱ्यावर होते. यावेळी तेलंगाणात ‘४० टक्के कमिशन घेणाऱ्या मुख्यमंत्र्यांचे स्वागत आहे’ अशा आशयाचे बॅनर्स लावण्यात आले होते. त्यानंतर आता कर्नाटकमध्ये बुधवारी जागोजागी पेसीएम, असे लिहिलेले तसेच बोम्मई यांचा फोटो असलेले पोस्टर्स जागोजागी झळकले आहेत. कर्नाटक कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशनने जुलै २०२१ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींना एक पत्र लिहिले होते. या पत्रात राज्यात लाचखोरीचे प्रमाण वाढले असून भाजपा सरकारच्या काळात हे प्रमाण १० टक्क्यांवरून ४० टक्क्यांवर पोहोचले आहे, असे नमूद करण्यात आले होते. याच आरोपांचा आधार घेत काँग्रेसतर्फे कर्नाटकमध्ये भाजपा सरकारला लक्ष्य केलं जातंय.

हेही वाचा >>> Congress president election: ‘तो’ काय बाबा मोठ्ठा माणूस, आम्हाला राहुलच हवेत; शशी थरुरांकडे केरळमधल्या नेत्यांचीच पाठ

काँग्रेसच्या या पोस्टरबाजीवर बसवराज बोम्मई यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी भ्रष्टाचाराचे सर्व सरोप फेटाळून लावले आहेत. राज्याचीच नव्हे तर माझी प्रतिमा मलीन करण्यासाठीची ही एक नियोजनबद्ध योजना आहे. संबंधित अधिकाऱ्यांना याची दखल घेत याविरोधात तत्काळ गुन्हा दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. कोणताही आधार नसलेल्या मोहिमा समाजमाध्यमांवर कशा चालवायच्या याची आम्हालाही कल्पना आहे. हा सर्व प्रकार खोटा असल्याचे कर्नाटकमधील जनतेला माहिती आहे. कर्नाटकची प्रतिम मलीन करणारे सर्व प्रयत्न हाणून पाडण्याचा कर्नाटक सरकार प्रयत्न करेल, अशी प्रतिक्रिया बसवराज बोम्मई यांनी दिली आहे.

हेही वाचा >>> मुस्लिमांशी संवादप्रक्रिया कायम ,सरसंघचालकांची मशिदीला भेट

दरम्यान,’४० टक्के सरकार, भाजपा म्हणजे भ्रष्टाचार’ हा काँग्रेसच्या प्रचारातील मुक्य नारा आहे. काही दिवसांपूर्वी प्रदेश काँग्रेसचे प्रमुख डीके शिवकुमार आणि विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांनी एक रेट कार्ड प्रसिद्ध केले होते. यामध्ये राज्यातील वेगवेगळ्या क्षेत्रात सरकारी अधिकाऱ्यांनी मागितलेल्या लाचेची माहिती देण्यात आली होती. तसेच काँग्रेसने एक हेल्पलाईन आणि बेबसाईटही जारी केली आहे. कोणालाही भ्रष्टाचाराबाबत काही माहिती द्यायची असेल, तर तपशील द्यावा, असे आवाहन काँग्रेसने केले आहे. दरम्यान, काँग्रेस राबवत असलेल्या या भाजपाविरोधी मोहिमेची कर्नाटकमध्ये चांगलीच चर्चा होत आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress campaign of pay cm posters with qr code against bjp in karnataka prd