दिगंबर शिंदे
सांगली : लोकसभा निवडणुकीसाठी आठ महिन्याचा अवधी उरला असताना सांगलीत राजकीय हालचाली गतीमान तर झाल्या आहेतच, पण याचबरोबर बहुरंगी लढतीचे चित्र दिसत आहे. काँग्रेसने वसंतदादा पाटील यांचे नातू आणि वसंतदादा कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील यांचे नाव निश्चित केले असल्याचे खुद्द माजी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी गेल्याच आठवड्यात काँग्रेसच्या मेळाव्यात जाहीर केले, तर भाजपकडून तिसर्यांदा मैदानात उतरण्याची तयारी विद्यमान खासदार संजयकाका पाटील यांनी सुरू केली असली तरी पक्षांतर्गत नाराजीशी सामनाही करावा लागत आहे. तर भाजपकडूनच माजी आमदार पृथ्वीराज देशमुख तयारीत आहेत.
उमेदवारीवाटपात खांदेपालट होणार असे गृहित धरुन देशमुखांनी संपर्क वाढवला आहे. त्यातच स्वाभिमानी शेतकरी संघटना, बहुजन वंचित विकास आघाडी, राष्ट्रीय समाज पार्टी यांनीही लोकसभेची तयारी सुरू केली असून भारत राष्ट्र समितीची चाचपणी सध्या सुरू आहे. लोकसभा लढवायची की विधानसभा लढवायची या द्बिधा मनस्थितीत गत निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवारीचा खेळखंडोबा झाला. अखेरच्या टप्प्यात आल्यानंतर सगळेच हातातून जात आहे हे लक्षात येताच वसंतदादा घराण्यातील विशाल पाटील यांनी निवडणुक लढविण्याची मानसिकता दाखवली. मात्र, तोपर्यंत काँग्रेसने मित्रपक्ष असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सांगलीची जागा देउन टाकली होती. यामुळे काँग्रेसच्या चिन्हापासून वंचित राहिलेल्या विशाल पाटलांना अखेर स्वाभिमानीच्या चिन्हावर मैदानात उतरावे लागले होते. तरीही त्यांना सव्वा तीन लाख मते मिळाले होती. मात्र, मैदानात बहुजन वंचित आघाडीच्यावतीने मैदानात उतरून भाजपचे विद्यमान आमदार गोपीचंद पडळकर यांनी तीन लाख मते घेतली होती. हीच उमेदवारी भाजपचा विजय सुकर करण्यास कारणीभूत झाली. या बदल्यात पडळकर यांना भाजपने विधान परिषदेचे सदस्यत्व देउन उतराई होण्याचा प्रयत्न केला.
आणखी वाचा-गोंदिया-भंडारा लोकसभा मतदारसंघावर काँग्रेसचा दावा
गेली दहा वर्षे सांगलीच्या काँग्रेसच्या बालेकिल्ल्याला खिंडार पाडण्यात भाजप यशस्वी झाली असली तरी यावेळी हा धोका ओळखून काँग्रेसने आठ महिने अगोदरच तयारी सुरू केली आहे. यावेळी कोणत्याही स्थितीत गड पुन्हा काँग्रेसला मिळवून द्यायचाच या जिद्दीने प्रयत्न सुरू आहेत. अगोदर निरीक्षकांमार्फत पदाधिकार्यांचा कानोसा घेण्यात आला. त्यानंतर गेल्या आठवड्यात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा दोन दिवसांचा दौरा आयोजित करण्यात आला होता. यावेळी त्यांनी ‘दादांची सांगली काँग्रेसकडेच चांगली’ अशी घोषणा करीत दादा घराण्यातच उमेदवारी देण्यात येणार असल्याचे सुतोवाच केले. गतवेळी लोकसभेची उमेदवारी कोणाच्या गळ्यात मारायची असा प्रश्न काँग्रेसपुढे होता. यावेळी राष्ट्रवादी, शिवसेना यांच्या महाविकास आघाडीची ताकद लक्षात घेउन विशाल पाटलांच्या हातीच लोकसभेची सुत्रे देण्याचे जवळजवळ निश्चित करण्यात आल्याचे दिसते. तसे माजी राज्यमंत्री डॉ. कदम यांनी जाहीरच केले आहे.
दोन पाटलांच्या लढत दिसत असताना भाजपमध्ये सर्व काही अलबेल आहे असेही नाही. उमेदवारीच्या लढाईत भाजप ग्रामीणचे माजी जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख हेही उतरले आहेत. त्यांनीही आपला मतदार संघ वगळून अन्य मतदार संघात दौरे सुरू केले आहेत. आटपाडी, जत, तासगावबरोबरच मिरज तालुययात त्यांच्या फेर्या आणि गाठीभेटी वाढल्या आहेत. तर विद्यमान खासदार संजयकाका पाटील यांनीही ग्रामीण भागातील दौरे वाढविले आहेत. सिंचन योजनांना देण्यात आलेली गती, महामार्गाचे विस्तारलेले जाळे या गोष्टी जनतेसमोर मांडून आपली मांड पक्की करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. मात्र उमेदवारीबाबत भाजपने अद्याप आपले पत्ते खुले केलेले नाहीत. यामुळे उमेदवारीचा संघर्ष संपल्यानंतरही भाजपचा अंतर्गत संघर्ष कोणत्या थराला जातो यावर बरेच काही अवलंबून असणार आहे.
याशिवाय जिल्ह्यात वंचित बहुजन आघाडी, स्वाभिमानी विकास आघाडी, रासप आणि भारत राष्ट्र समिती यांनीही उमेदवारीसाठी चाचपणी सुरू केली आहे. गतवेळची वंचित आघाडीची तीन लाख मते असल्याने त्यांच्याही आशा कायम आहेत. तर रासपचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांनीही दोन दिवस मतदार संघाचा दौरा करून चाचपणी केली. त्यांची स्वाभिमानी शेतकरी संघटनेशी मैत्री होण्याचे संकेत माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिले आहेत. यामुळे यावेळची निवडणुक इंडिया विरूध्द एनडीए अशी न राहता बहुरंगीच होण्याचे संकेत मिळत आहेत.