गडचिरोली : उमेदवारीसाठी काँग्रेसमध्ये सुरु असलेला तिढा सुटला असून गडचिरोलीतून मनोहर पोरेटी यांना संधी देण्यात आली आहे. माजी खासदार मारोतराव कोवासे यांचे पुत्र विश्वजित कोवासे आणि मनोहर पोरेटी यांच्यामध्ये चुरस होती. अखेर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या जवळचे समजले जाणारे पोरेटी यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. तर आरमोरीचा तिढा कायम आहे. 

गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी आणि गडचिरोलीच्या जागेसाठी इच्छुकांची संख्या मोठी होती. त्यामुळे येथील उमेदवारी शेवटपर्यंत लांबल्या गेली. शनिवारी भाजपाने जाहीर केलेल्या यादीत विद्यमान आमदार होळी यांना डच्चू देत डॉ. मिलिंद नरोटे यांनां संधी देण्यात आली. यानंतर रात्री उशिरा काँग्रेसने देखील गडचिरोलीचा उमेदवार जाहीर केला. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष राहिलेले मनोहर पोरेटी हे काँग्रेसचे जुने नेते आहेत. त्यांचे वडील देखील काँग्रेसमध्ये होते. संयमी नेते म्हणून त्यांची जिल्ह्यात ओळख आहे. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचे ते निकटवर्तीय आहेत. पोरेटी यांच्या उमेदवारीसाठी वडेट्टीवार यांनी विशेष प्रयत्न केल्याचे बोलले जाते. त्यामुळेच शेवटच्या क्षणी विश्वजित कोवासे यांचा पत्ता कट झाला.

हेही वाचा >>>इम्तियाज जलील औरंगाबाद पूर्व मधून निवडणुकीच्या रिंगणात

याशिवाय डॉ. सोनल कोवे यांनी देखील गडचिरोलीसाठी शेवटपर्यंत प्रयत्न केले. परंतु पक्षातील वरिष्ठस्तरावर पोहोचण्यात ते अपयशी ठरले. गडचिरोली काँग्रेसमध्ये वडेट्टीवार विरुद्ध पाटोले असा संघर्ष लपलेला नाही. त्यामुळे गडचिरोलीची जागा आपल्याकडे ठेवून वडेट्टीवार यांनी पटोलेंना धोबीपछाड दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. लोकसभेत खासदार नामदेव किरसान यांना मारोतराव कोवासे यांनी समर्थन दिले होते. बऱ्याच सभांना ते वडेट्टीवार यांच्या सोबत दिसले. मुलाच्या उमेदवारीसाठी त्यांनी जुन्या नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या. पण सर्व प्रयत्न निष्फळ ठरले. या प्रक्रियेत जिल्हाध्यक्ष आणि खासदाराची जोडगोळी कुणाच्या बाजूने होती हे कुणालाच कळले नाही. रविवारी दुपारपर्यंत आरमोरीची उमेदवारी जाहीर झालेली नव्हती. याठिकाणी कोण बाजी मारणार याबद्दल उत्सुकता आहे. 

नरोटे विरुद्ध पोरेटी थेट लढत 

तब्बल दोन दशकानंतर गडचिरोलीत पहिल्यांदाच दोन्ही पक्षाकडून नवे चेहरे विधानसभेच्या मैदानात उतरणार आहेत याठिकाणी भाजपकडून डॉ. मिलिंद नरोटे विरुद्ध काँग्रेसचे मनोहर पोरेटी अशी थेट लढत होणार आहे. विशेष म्हणजे पोरेटी आणि नरोटे हे एकमेकांचे नातेवाईक आहेत. त्यामुळे मामा भाच्यातील लढातिकडे जिल्ह्याचे लक्ष लागून आहे.