नांदेड : नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी दिवंगत खासदार वसंत चव्हाण यांचे सुपूत्र रवींद्र चव्हाण यांना काँग्रेस पक्षाने उमेदवारी जाहीर केली. सहानुभूतीचा फायदा उठविण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे.

काँग्रेसच्या ताकदीवर प्रश्नचिन्ह उभे केले जात असल्याच्या काळात अशोक चव्हाण यांना वसंत चव्हाण यांनी पराभूत केले. मात्र, खासदार झाल्यानंतर काही दिवसात ते आजारी पडले आणि हैदराबाद येथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. नांदेड जिल्ह्यात त्यामुळे हळहळ व्यक्त होत हाेती. या घटनेनंतर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे, नेते राहुल गांधी, नाना पटाले यांनी चव्हाण यांच्या निवासस्थानी जाऊन कुटुंबियांचे सांत्वन केले होते. त्यामुळे मुलगा रवींद्र हेच उमेदवार असतील, अशी चर्चा सुरू झाली होती. काँग्रेसने रवींद्र यांना उमेदवारी जाहीर केल्याने सहानुभूतीचा लाभ हाेऊ शकतो.

हेही वाचा – मुंबई : चेंबूरमधील शासकीय वसतिगृहात विद्यार्थिनीची आत्महत्या

u

नायगाव मतदारसंघात वर्चस्व असणाऱ्या वसंत चव्हाण यांना नांदेड जिल्ह्यात सर्वत्र पाठिंबा मिळत गेला. ते निवडून आल्यानंतर काँग्रेससह अन्य पक्षातही आश्चर्य व्यक्त केले जात होते. चव्हाण निवडून आल्यानंतर त्यांचे सत्काराचे सार्वजनिक कार्यक्रमही जिल्हाभर होऊ शकले नाहीत. ते आजारी पडले. एकेक अवयव निकामी होत गेल्याने त्यांचे २६ ऑगस्ट रोजी निधन झाले. नांदेड लोकसभेची पोटनिवडणूक जाहीर झाल्यानंतर भाजपमध्ये आता धावपळ उडाली आहे. रवींद्र चव्हाण हे अध्यापन क्षेत्रात काम करतात. त्यांची ही पहिलीच निवडणूक आहे. मात्र, वसंत चव्हाण यांच्या निवडणुकीतील सर्व प्रचार यंत्रणा लावण्यापासून त्यांनी काम केले आहे. सभांचे नियोजनांपासून ते प्रचार मुद्दे ठरविण्यापर्यंत त्यांनी काम केले होते. त्यामुळे भाजपसमोर पुन्हा आव्हान उभे केले जाईल असे सांगण्यात येत आहे. मुस्लिम, दलित आणि मराठा मतांच्या आधारे निवडून आलेल्या चव्हाण यांना पोटनिवडणुकीमध्ये पराभूत करण्यासाठी भाजपचा चेहरा कोण, याचीही उत्सुकता वाढली आहे.

हेही वाचा – धारावी पुनर्विकास प्रकल्प : पोटमाळ्यावरील घरांच्या सर्वेक्षणाच्या नावाखाली डीआरपीपीएलकडून आमिष

भाजपकडून कोणीही लढण्यास तयार असेल तर काँग्रेस नेत्यांनी आपल्यावर विश्वास टाकला आहे. त्यांचा विश्वास सार्थ ठरविण्यासाठी हाती तलवार घेतली आहे. आता आपण लढू आणि विजयही मिळवू. – रवींद्र चव्हाण, काँग्रेस उमेदवार लोकसभा नांदेड.