Rahul Gnadhi For Loksabha Election Wayanad गुरुवारी काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या पहिल्या बैठकीत केरळमधील वायनाड लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. परंतु, समितीने अंतिम निर्णय राहुल गांधी यांच्यावर सोडल्याचे पक्षातील नेत्यांनी सांगितले. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या अध्यक्षतेखाली आणि काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या उपस्थितीत केंद्रीय निवडणूक समितीची पहिली बैठक पार पडली. या बैठकीत छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल (राजनांदगाव मतदारसंघ), माजी मंत्री ताम्रध्वज साहू (महासमुंद), ज्योत्स्ना चरणदास महंत (कोरबा) यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. एक ते दोन दिवसांत उमेदवारांच्या नावांची अधिकृत घोषणा होणार असल्याची माहितीही सूत्रांनी दिली.
चांदनी चौक, नॉर्थवेस्ट दिल्ली व नॉर्थसाऊथ दिल्ली या मतदारसंघातील पक्षाच्या उमेदवारांबाबत केंद्रीय निवडणूक समिती अंतिम निर्णय घेऊ शकलेली नाही. कारण, या जागांसाठी अनेक प्रबळ उमेदवार आहेत. या बैठकीत केरळ, कर्नाटक, तेलंगणा, दिल्ली व छत्तीसगढसह १० राज्यांतील ६० जागांसाठी उमेदवार निश्चित झाल्याचेही सूत्रांनी सांगितले.
राहुल गांधी अमेठीतून निवडणूक लढवणार का?
केरळमधील काँग्रेस नेत्यांनी सांगितले की, राज्यातील उमेदवारांच्या यादीत काही आश्चर्यकारक नावांचा समावेश असेल. केरळमध्ये काँग्रेस १६ जागांवर निवडणूक लढविणार आहे. शशी थरूर यांच्यासह बहुतेक विद्यमान खासदारांना पुन्हा मैदानात उतरवले जाईल, असे ते म्हणाले. सूत्रांनी सांगितले की, समितीने कर्नाटकसाठी १० नावे मंजूर केली आहेत. केंद्रीय निवडणूक समितीने उत्तर प्रदेशमधील उमेदवारांबाबत चर्चा केलेली नाही. राहुल गांधी वायनाडमधून पुन्हा निवडणूक लढविण्याची शक्यता आहे. परंतु, राहुल गांधी वायनाडशिवाय त्यांचा जुना मतदारसंघ अमेठीतूनही नशीब आजमावतील की नाही हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
हेही वाचा : ‘राहुल यात्रा’ आज गुजरातमध्ये दाखल; मरणासन्न काँग्रेसला संजीवनी मिळणार का?
चांदनी चौक मतदारसंघासाठी जे. पी. अग्रवाल, माजी खासदार संदीप दीक्षित व महिला काँग्रेसच्या प्रमुख अलका लांबा यांची नावे समितीसमोर ठेवण्यात आली. नॉर्थसाऊथ दिल्लीसाठी दिल्ली प्रदेश काँग्रेस कमिटी अध्यक्ष अरविंदर सिंग लवली व अनिल चौधरी यांच्या नावांचा समावेश आहे. केरळमधील अलप्पुझा मतदारसंघातील उमेदवाराच्या नावावरही अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही, असेही सूत्रांनी सांगितले.