काँग्रेसने प्रदेशाध्यक्षपदी हर्षवर्धन सपकाळ या नवख्या नेत्याकडे अध्यक्षपदाची धुरा सोपवून नवा पायंडा पाडला आहे. विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर पक्षाला लागलेली गळती रोखण्यापासून पक्ष संघटना अधिक मजबूत करण्याचे मोठे आव्हान सपकाळ यांच्यासमोर असेल.
राज्य काँग्रेसमध्ये नवख्या किंवा अनोळखी चेहऱ्याकडे प्रथमच अध्यक्षपद सोपविण्यात आले. आतापर्यंत सर्व जुनेजाणते नेत्यांची अध्यक्षपदी वर्णी लागली होती. बुलढाण्याचे माजी आमदार एवढीच ओळख असलेल्या सपकाळ यांना राज्यभर नेतृत्व प्रस्थापित करावे लागेल. राहुल गांधी यांचे विश्वासू सहकारी असलेल्या सपकाळ यांना गटबाजीने पोखरलेल्या राज्य काँग्रेसमध्ये समन्वयाची भूमिका बजवावी लागेल. निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेसचे अनेक नेते पक्ष सोड़ून जात आहेत. गेल्याच आठवड्यात नवी मुंबईतील काँग्रेसला खिडांर पडले. अनेक नेते भाजप वा शिवसेना शिंदे गटात प्रवेश करीत आहेत. अशा वेळी गळती रोखण्याचे मोठे आव्हान सपकाळ यांच्यासमोर असेल. राज्यभर दौरे करून पक्षाचे स्थानिक नेते व कार्यकर्त्यांमध्ये विश्वासाचे वातावरण तयार करावे लागेल. सर्वांना बरोबर घेऊन जावे लागेल.
राहुल गांधी यांच्या सहकाऱ्यांमध्ये गणल्या जाणाऱ्या सपकाळ यांना राज्य काँग्रेसमध्ये कामाचा तसा अनुभव नाही. काँग्रेसला मानणारा मोठा वर्ग असला तरी पक्ष संघटनाच कमकुवत झाल्याने जनाधार आटू लागला आहे. महायुती सरकारच्या अंगावर जाण्याचे धाडस काँग्रेसला करावे लागणार आहे. यातूनच पाटी कोरी असलेल्या सपकाळ यांची अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. सहकारी संस्था वा शिक्षणसंस्था चालक असल्यास त्यामागे ईडी किंवा अन्य यंत्रणांचा ससेमिरा मागे लागू शकतो. सपकाळ आर्थिकदृष्ट्या प्रबळ अशा कोणत्याही सहकारी संस्थांशी संबंधित नाहीत. यामुळेच महायुती सरकारच्या विरोधात आक्रमक भूमिका घेण्याच्या उद्देशानेच सपकाळ यांच्या नावाला पक्षाध्यक्ष मल्लीकार्जुन खरगे आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पसंती दिली आहे. अ. भा. काँग्रेसमध्ये केलेल्या संघटनात्कम कामाचा अनुभव पाठीशी असलेल्या सपकाळ यांना राज्य काँग्रेसमध्ये बदल घडवावे लागतील.
विदर्भाला प्राधान्य
राज्य काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा विदर्भाला प्राधान्य देण्यात आले आहे. अलीकडच्या काळात रणजित देशमुख, प्रभा राव, माणिकराव ठाकरे, नाना पटोले या विदर्भातील नेत्यांकडेच अध्यक्षपद सोपविण्यात आले होते. अध्यक्षपदी बुलढाण्याचे सपकाळ यांची नियुक्ती करताना विधिमंडळ पक्षनेतेपदी चंद्रपूरचे विजय वडेट्टीवार यांना संधी देण्यात आली आहे. दोघेही नेते विदर्भातील आहेत. तसेच मराठा आणि ओबीसी असे जातीचे समीकरण साधण्यात आले आहे. लोकसभा निवडणुकीत विदर्भाने काँग्रेसला साथ दिली. विधानसभा निवडणुकीत मात्र पक्षाचा धुव्वा उडाला. भाजपमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे दोघेही विदर्भातील आहेत. तसेच काँग्रेसमध्येही दोन्ही महत्त्वाचे नेते विदर्भातील नेमण्यात आले आहेत.