अयोध्येतील राम मंदिरातील मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची सध्या देशभरात चर्चा होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत, तसेच अन्य महत्त्वाच्या व्यक्तींना या कार्यक्रमाला आमंत्रित करण्यात आले आहे. दरम्यान, श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्र्स्टतर्फे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, तसेच काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी यांनादेखील या कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. येत्या २२ जानेवारी रोजी अयोध्या येथे हा कार्यक्रम होणार आहे. भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनादेखील निमंत्रण पाठवण्यात आले आहे.
उपस्थितीची शक्यता कमी
सूत्रांच्या माहितीनुसार राम मंदिर बांधकाम समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा, संघाचे अखिल भारतीय संपर्कप्रमुख राम लाल, विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष आलोक कुमार यांनी सोनिया गांधी आणि खरगे यांची भेट घेत या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आमंत्रण दिले आहे. मात्र, काँग्रेसमधील सूत्रांच्या माहितीनुसार सोनिया गांधी, तसेच खरगे या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची शक्यता कमी आहे.
रामनाथ कोविंद, प्रतिभाताई पाटील यांना निमंत्रण
या शिष्टमंडळाने भारताचे माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा, माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचीदेखील भेट घेऊन, त्यांना कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले आहे. वेगवेगळ्या राज्यांचे मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांना मात्र या कार्यक्रमासाठी निमंत्रित करण्यात आलेले नाही.
प्रत्येक राज्याला विशेष दिवस
सूत्रांच्या माहितीनुसार मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर मंदिराला भेट देण्यासाठी प्रत्येक राज्याला काही दिवस नेमून दिले जाणार आहेत. भाविकांना येण्यासाठी विशेष रेल्वेगाड्यांचे नियोजन केले जाणार आहे. भाविकांसह येण्यासाठी मुख्यमंत्र्यांनादेखील आमंत्रित केले जाईल. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी विशेष व्यवस्था केली जाणार आहे.
मोदी, योगी आदित्यनाथ, मोहन भागवत यांची भाषणे
मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी जय्यत तयारी करण्यात येत आहे. या कार्यक्रमात नरेंद्र मोदी, मोहन भागवत, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे भाषण करणार आहेत. या कार्यक्रमाला साधारण आठ हजार लोक उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
कोणकोणाला आमंत्रण?
राम मंदिर ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी दिलेल्या माहितीनुसार प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासासाठी पाहुण्यांची यादी काळजीपूर्वक तयार करण्यात आलेली आहे. त्यामध्ये उद्योजक, शास्त्रज्ञ, अभिनेते, लष्करी अधिकारी, पद्मश्री, पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित झालेले मान्यवर, बौद्ध धर्मगुरू दलाई लामा, योगगुरू बाबा रामदेव, उद्योगपती गौतम अदाणी, उद्योगपती मुकेश अंबानी, अभिनेता अमिताभ बच्चन, अभिनेता रजनीकांत, अभिनेत्री माधुरी दीक्षित, प्रभू रामाची भूमिका करणारे अरुण गोविल, दिग्दर्शक मधुर भांडारकर, गीतकार प्रसून जोशी आदी मान्यवरांना आमंत्रित करण्यात आले आहे.
राम मंदिर उभारणीसाठी काम करणाऱ्या कामगारांनाही आमंत्रण
राम मंदिराच्या उभारणीसाठी काम करणाऱ्या कामगारांनादेखील आमंत्रित करण्यात आले आहे. तसेच टाटा उद्योगसमूहाचे नटराजन चंद्रशेखरन आणि एल अॅण्ड टी उद्योगसमूहाचे एस. एन. सुब्रह्मण्यन यांनादेखील कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आले आहे.
“प्रभू रामावर श्रद्धा असणाऱ्या प्रत्येकाचे स्वागत”
“सर्व पक्षांना, तसेच माजी पंतप्रधानांना या कार्यक्रमाचे आमंत्रण देण्यात आलेले आहे. ज्या मान्यवरांनी आम्हाला वेळ दिला, त्यांच्याकडे प्रत्यक्ष जाऊन हे आमंत्रण देण्यात आलेले आहे. ज्या लोकांची प्रभू रामावर श्रद्धा आहे, त्या सर्व लोकांचे दर्शनासाठी स्वागत आहे, असे आम्ही याआधीच स्पष्ट केलेले आहे,” असे विश्व हिंदू परिषदेचे प्रवक्ते विनोद बन्सल यांनी ‘द इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना सांगितले.
“प्रत्येकालाच बोलावणे शक्य नाही. कारण…”
मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाला विरोधी पक्षाच्या नेत्यांना बोलावण्यात आलेले नाही, असा आरोप केला जात होता. हा आरोप चुकीचा असल्याचे स्पष्टीकरण विश्व हिंदू परिषदेने दिलेले आहे. “या कार्यक्रमासाठी प्रत्येकालाच आमंत्रित करणे शक्य नाही. कारण- कार्यक्रमाला किती गर्दी असावी, हा प्रमुख प्रश्न आहे. त्यामुळे सर्व पक्षांच्या प्रमुखांना आमंत्रित करण्यात आलेले आहे. मात्र, प्राणप्रतिष्ठेचा सोहळा पार पडल्यानंतर अयोध्येत प्रत्येकाचेच स्वागत आहे,” असे विश्व हिंदू परिषदेच्या पदाधिकाऱ्याने सांगितले.