२०२४ साली होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला पराभूत करण्यासाठी विरोधक राष्ट्रीय पातळीवर एकत्र येण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यासाठी विरोधकांची जून महिन्यात पहिली बैठक पार पडली. त्यानंतर १८ जुलै रोजी विरोधकांची दुसरी बैठक बंगळुरू येथे पार पडत आहे. या बैठकीला वेगवेगळ्या विरोधी पक्षातील एकूण २६ नेते उपस्थित राहिले आहेत. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी आम्ही पंतप्रधानपदासाठी उत्सूक नाहीत, असे विधान केले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“आम्हाला (काँग्रेस) पंतप्रधानपदामध्ये स्वारस्य नाही”

बंगळुरू येथील बैठकीला वेगवेगळ्या राज्यातील महत्त्वाचे आणि भाजपाला विरोध करणारे एकूण २६ पक्षांचे प्रमुख उपस्थित आहेत. या बैठकीमध्ये विरोधकांमध्ये पंतप्रधानपदाचे उमेदवार कोण असतील? किमान समान कार्यक्रम काय असावा? अशा वेगवेगळ्या महत्त्वाच्या प्रश्नांवर चर्चा करण्यात येत आहे. असे असतानाच मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधानपदावर महत्त्वाचे भाष्य केले आहे. “आम्हाला (काँग्रेस) पंतप्रधानपदामध्ये स्वारस्य नाही. काँग्रेसला सत्तेतही रस नाही. केंद्रात सत्ता मिळावी म्हणून आम्ही ही बैठक आयोजित केलेली नाही. तर देशाचे संविधान, लोकशाही, धर्मनिरपेक्षता, सामाजिक नाय या सर्वांचे रक्षण व्हावे म्हणून आम्ही एकत्र येण्याचा प्रयत्न करत आहोत,” असे मल्लिकार्जुन खरगे म्हणाले.

“सत्ता आल्यानंतर भाजपाने मित्रपक्षांची साथ सोडली”

“आम्ही एकूण २६ वेगवेगळे पक्ष आहोत. आम्ही एकूण ११ राज्यांत सत्तेत आहोत. भाजपा पक्ष स्वबळावर ३०३ जागांवर निवडून आलेला नाही. त्यांनी युतीतील अन्य पक्षांची मतं वापरलेली आहेत. सत्ता आल्यानंतर त्यांनी मित्रपक्षांना सोडून दिलेले आहे,” अशी टीकाही खरगे यांनी केली.

“आमच्यातील मतभेत फार मोठे नाहीत”

“आमचे राज्यपातळीवर निश्चितच काही मतभेद आहेत. मात्र हे मतभेद वैचारिक पातळीवर नाहीत. हे मतभेत फार मोठे नाहीत. मध्यमवर्गीय, सामान्य माणसासाठी आम्ही हे सर्व मतभेद बाजूला ठेवू शकतो. देशातील तरूण, गरीब, दलित, आदिवासी, अल्पसंख्याक यांच्या हक्कांची पायमल्ली होत आहे,” असेही खरगे म्हणाले.

बैठखीला देशातील महत्त्वाच्या नेत्यांची उपस्थिती

या बैठकीला मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी, काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी, तमिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि आरजेडी पक्षाचे प्रमुख लालू प्रसाद यादव आदी नेते या दोन दिवसीय बैठकीला उपस्थित आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार बैठकीच्या पहिल्या दिवशी अनुपस्थित होते. मात्र ते बैठकीच्या दुसऱ्या दिवशी हजर झाले आहेत.

आघाडीला नवे नाव दिले जाणार

मिळालेल्या माहितीनुसार विरोधकांच्या या युतीच्या अध्यक्षपदी सोनिया गांधी यांचे नाव निश्चित केले जाण्याची शक्यता आहे. तसेच विरोधकांच्या या आघाडीला काय नाव द्यावे, या आघाडीचा काय अजेंडा असावा, किमान समान कार्यक्रम काय असावा? अशा सर्व प्रश्नांवर विसृत चर्चा करण्यात येत आहे. आघाडीचे नाव ठरवताना यामध्ये ‘India’ हा शब्द वापरू नये असे मत सोनिया गांधी यांनी मांडले आहे. तर तृणमूलच्या ममता बॅनर्जी यांनी आघाडीच्या नावामध्ये ‘फ्रंट’ हा शब्द वापरू नये, अशी भूमिका व्यक्त केली.

दोन उपसमित्यांची स्थापना केली जाण्याची शक्यता

या बैठकीत विरोधकांच्या संभाव्य आघाडीसाठी दोन उपसमित्या स्थापन केल्या जाण्याची शक्यता आहे. एका समितीकडून किमान समान कार्यक्रम निश्चित केला जाईल, तसेच दुसऱ्या समितीला देशातील कोणकोणत्या मुद्द्यांचा पाठपुरावा केला पाहिजे, याची एक ब्लुप्रिंट तयार करण्याचे काम देण्यात येणार आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress chief mallikarjun kharge said we not interested in prime minister post ahead of bengaluru opposition party meeting prd