गडचिरोली : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवारचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राज्यातील काही जागांवरती तरुण उमेदवार देणार असे सुतोवाच केले होते. त्यात अहेरी विधानसभेचा समावेश होता. परंतु काँग्रेसनेही या जागेचा आग्रह धरल्याने आघाडीत बिघाडीची चिन्हे दिसून येत आहे. अजित पवार गटाचे नेते राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांची कन्या भाग्यश्री आत्राम यांनी नुकतेच शरद पवार गटात प्रवेश करून विधानसभेची तयारी सुरू केलेली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतील दोन्ही पक्षात अहेरीच्या जागेवरून जोरदार रस्सीखेच सुरू असल्याचे एकंदरीत चित्र आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राजकीयदृष्ट्या गडचिरोली जिल्ह्यातील महत्त्वाचे समजल्या जाणाऱ्या अहेरी विधानसभेच्या जागेवरून सद्या महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये अंतर्गत शीतयुद्ध सुरू आहे. काही दिवसांपूर्वी राज्याचे विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी काँग्रेसच्या चंद्रपूर येथील बैठकीत आणि आलापल्ली येथील सभेत अहेरी विधानसभा काँग्रेस लढवणार, असा दावा केला होता. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाने सुरवातीलाच या जागेवर दावा केलेला आहे. पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी स्वतः तसे सुतोवाच केले होते. त्या पार्श्वभूमीवर मंत्री आत्राम यांची कन्या भाग्यश्री आत्राम यांनी वडिलांची साथ सोडत शरद पवार गटात प्रवेश केला. त्यांनी विधानसभेची तयारी देखील सुरू केली आहे. बीआरएस पक्षाच्या शरद पवार गटात विलीनीकरणानंतर माजी आमदार दीपक आत्राम देखील राष्ट्रवादी काँग्रेस कडून शर्यतीत आहे.

हेही वाचा >>>“निवडणूक जिंकणार कशी, ते सांगा ?” शरद पवारांचा इच्छुकांना खडा सवाल…

दुसरीकडे काँग्रेसकडून सेवानिवृत्त वनाधिकारी हणमंतू मडावी यांचे नाव पुढे करण्यात आले आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे देखील मडावी यांच्यासाठी आग्रही आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीकडून अहेरी विधानसभेची जागा कोणत्या पक्षाला मिळणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलेले आहे.

अहेरी विधानसभा पूर्वीपासूनच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडे राहिलेली आहे. त्यामुळे इतर पक्ष यावर दावा करीत असले तरी महाविकास आघाडीचा बैठकीनंतरच याबाबत अंतिम निर्णय होणार.-अतुल गण्यारपवार, जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष

लोकसभेमध्ये या विधानसभेतून काँग्रेसला मिळालेली आघाडी आणि पक्षातील कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेता काँग्रेसने या जागेवर दावा केला आहे. महाविकास आघाडीच्या नेतृत्वाकडून याबाबत जो निर्णय होईल तो सर्वांना मान्य असेल.-महेंद्र ब्राम्हणवाडे, जिल्हाध्यक्ष काँग्रेस

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress claim on aheri assembly in sharad pawar assembly list ssp 89 amy