अलिबाग : नुकत्याच विधान परिषद निवडणूकीत काँग्रेसच्या असहकार्यामुळे शेकाप सरचिटणीस जयंत पाटील यांचा पराभव झाला होता. आता विधानसभा निवडणूकीत काँग्रेसकडून शेकापला असहकार्याची भूमिका घेतली जाण्याची चिन्ह दिसू लागली आहेत. अलिबागची विधानसभेची जागावर काँग्रेसने दावा सांगितला आहे. त्यामुळे शेकापची आणखी कोंडी होण्याची शक्यता आहे.
विधान परिषदेच्या ११ जागांसाठी नुकतीच निवडणूक पार पडली. या निवडणूकीत शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील यांचा पराभव झाला. शेवटच्या क्षणी काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाने असहकार्याची भूमिका घेतल्याने जयंत पाटील यांची कोंडी झाल्याचे पहायला मिळाले. हा पराभव शेकापच्या चांगलाच जिव्हारी लागला. पराभवानंतर ज्यांना मदत केली त्यांनीच फसवल्याची खंत जयंत पाटील यांनी अलिबाग येथे कार्यकर्त्यांशी संवाद साधतांना व्यक्त केली. विधानसभा निवडणूकीत मित्रपक्ष सहकार्य करतील पण त्यांच्या मदतीवर अवलंबून न राहता विधानसभा निवडणूकीची तयारी करण्याचा सल्ला त्यांनी कार्यकर्त्यांना दिला होता.
हेही वाचा…अजित पवारांची स्वबळाची घोषणा का ?
याच्या दोनच दिवसांनी काँग्रेसने अलिबागच्या विधानसभा जागेसाठी दावा सांगितला आहे. अलिबाग मधील बॅरीस्टर अंतुले काँग्रेस भुवन येथे एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सचिव प्रविण ठाकूर उपस्थित होते. यावेळी कार्यकर्त्यांचा आग्रहासाठी मी अलिबाग विधानसभेची जागा लढविण्यासाठी तयार असल्याचे ठाकूर यांनी जाहीर केले. महाविकास आघाडीकडून ही जागा काँग्रेसला मिळावी यासाठी प्रयत्न करू अशी ग्वाही त्यांनी दिली.
लोकसभा निवडणूकीत शिवसेनेच्या अनंत गीते यांना काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाची मते मिळाली नाहीत . मते गीतेंना मिळाली ती शेकापचीच होती असा दावा शेकाप सरचिटणीस जयंत पाटील यांनी काही दिवसांपूर्वी केला होता. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्ते नाराज होते. त्यामुळे अलिबागची जागा काँग्रेसनेच महाविकास आघाडी कडून लढवावी अशी मागणी पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी केली आहे.
हेही वाचा…कारण राजकारण: राऊत यांच्यासमोर जुन्या सहकाऱ्यांचे आव्हान?
त्यामुळे विधानपरिषद निवडणूकीपाठोपाठ आगामी विधानसभा निवडणूकीतही काँग्रेसकडून शेकापची कोंडी केली जाणाच्या चिन्ह दिसत आहेत. महाविकास आघाडीचे जागा वाटप अद्याप झालेले नाही. पण अलिबागची जागा काँग्रेसने लढवावी अशी मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांची तसेच कार्यकर्त्यांची मागणी आहे. त्यामुळे पक्षाने संधी दिलीच तर मी ही निवडणूक लढविणार असल्याचे काँग्रेसचे ठाकूर यांनी स्पष्ट केले आहे.