लातूर- जिल्ह्यातील सहाही मतदारसंघांवर काँग्रेस पक्षाचे मराठवाड्याचे प्रमुख आमदार अमित देशमुख यांनी दावा केल्यामुळे महाविकास आघाडीतून कोणता मतदारसंघ कोणाला सुटेल याची उत्सुकता लागली आहे. जागावाटप झाल्याशिवाय पुढे जाता येणार नसल्याचे चित्र मतदारसंघांमध्ये दिसून येत आहे.

महायुतीत शिवसेना शिंदे गटाला कोणता मतदारसंघ सुटेल हे अद्याप अनिश्चित आहे. अजितदादा गटाचे मतदारसंघ नक्की असले तरी त्या मतदारसंघात भाजपचे कार्यकर्तेच बंडखोरीच्या तयारीत असल्यामुळे एकूण जिल्ह्यातील सहा मतदारसंघांचे चित्र कसे असेल याची उत्सुकता आहे. महाविकास आघाडीत लातूर शहर व ग्रामीण हे दोन मतदारसंघ काँग्रेसचे याशिवाय निलंगा विधानसभा मतदारसंघ ही काँग्रेस पक्षाकडे, उदगीर व अहमदपूर या दोन मतदारसंघांवर राष्ट्रवादी शरद पवार गटाचा दावा आहे तर औसा विधानसभा मतदारसंघावर शिवसेनेने (ठाकरे) दावा केला आहे.

हेही वाचा – मराठवाड्यात राष्ट्रवादीत फूट पडलेल्या मतदारसंघांमध्ये चुरस

आमदार अमित देशमुख यांनी मात्र सहाही मतदारसंघांवर काँग्रेस पक्षाचा दावा सांगितला असून या सर्व मतदारसंघात अन्य पक्षाच्या तुलनेने काँग्रेस पक्षाचे काम अधिक आहे. त्यामुळे विजयाच्या निकषावर काँग्रेसचाच विचार व्हायला हवा असा आग्रह धरला आहे. औसा विधानसभा मतदारसंघात काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष श्रीशैल्य उटगे हे निवडणुकीच्या तयारीत आहेत. उदगीर या राखीव मतदारसंघात माजी नगराध्यक्षा उषा कांबळे या तयारीत आहेत. निलंगा विधानसभा मतदारसंघात डॉ. अरविंद भातंब्रे, अभय साळुंखे व अशोक पाटील निलंगेकर या तिघांची नावे चर्चेत आहेत. लातूर शहर मतदारसंघात अमित देशमुख तर लातूर ग्रामीण मतदारसंघात धीरज देशमुख या दोघांचीच नावे आहेत. महायुतीत निलंगा मतदारसंघात संभाजी पाटील निलंगेकर, औसा अभिमन्यू पवार ही नावे नक्की आहेत.

अहमदपूरमध्ये आमदार बाबासाहेब पाटील व उदगीरमध्ये मंत्री संजय बनसोडे यांना उमेदवारी नक्की आहे. लातूर शहरातून भाजपचे दोन डझन कार्यकर्ते उत्सुक आहेत. निष्ठावंतांनाच पक्षाने संधी द्यावी असा आग्रह जुने कार्यकर्ते धरत आहेत. पक्षश्रेष्ठी निष्ठावंताचा विचार करणार की नव्याने आलेल्या डॉ. अर्चना पाटील यांना उमेदवारी देणार हे ठरायचे आहे. लातूर ग्रामीण मतदारसंघ हा शिवसेना शिंदे गटाला सुटणार का, याची उत्सुकता आहे. शिवसेना शिंदे गटाकडे ग्रामीणमध्ये उमेदवारच नाही. भाजपकडे विधान परिषदेचे आमदार रमेश कराड हे पुन्हा पक्षाकडे उमेदवारी मागत आहेत, शंकर भिसे यांचे नाव नव्याने चर्चेत येत आहे, पक्षश्रेष्ठी कोणता निर्णय घेतात याकडे लक्ष आहे.

हेही वाचा – अपक्ष आमदार किशोर जोरगेवार तुतारी फुंकणार? पवार गटाकडून चंद्रपुरातून निवडणूक लढण्याचे संकेत

काही विधानसभा मतदारसंघातून विद्यमान आमदार निवडणुकीच्या रिंगणात असले तरी त्यांच्यासमोर नेमके कोण उमेदवार उभे राहणार, किती जण बंडखोरी करणार याची निश्चितता उमेदवारी अर्ज भरायला सुरू झाल्यानंतर व अर्ज मागे घेतल्यानंतरच कळणार आहे.