कोल्हापूर : उद्धव बाळासाहेब ठाकरे गटापाठोपाठ कोल्हापूर जिल्ह्यात काँग्रेस पक्षानेही पुन्हा एकदा जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा इरादा व्यक्त केला आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत जिल्ह्यातील काँग्रेसच्या चारही आमदारांनी ही मागणी लावून धरताना ‘तुम लढो हम …’ या वृत्तीचे दर्शन घडले. उमेदवारीचा प्रश्न आल्यावर तिला बगल कशी देता येईल याचेच डावपेच रचले गेले. सक्षम उमेदवाराअभावी काँग्रेसच्या उमेदवारीचा गाडा पुढे कसा जाणार असा पेच निर्माण झाला आहे. चव्हाण यांच्या राजू शेट्टी आणि भारत राष्ट्र समितीविषयी केलेल्या विधानांचीही राजकीय चर्चा आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने आढावा घेण्याचे काम सुरू केले आहे. या अंतर्गत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पहिल्या दिवशी हातकणंगले तर दुसऱ्या दिवशी कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला. लोकसभा निवडणुकीला विधानसभा क्षेत्र निहाय मतदारांचा कल कसा असेल हे चव्हाण यांनी समजावून घेतले. लोकसभा निवडणुकीचा उमेदवार ठरवण्यासाठी ही बैठक नसल्याचे चव्हाण यांनी स्पष्ट केले तरी चर्चा मात्र उमेदवार कोण असावा यावर फिरत राहिली.

हेही वाचा – नूह हिंसाचार : महापंचायतीला भाजपाचा आमदाराची उपस्थिती, २८ ऑगस्टला विश्व हिंदू परिषदेच्या यात्रेला पुन्हा सुरूवात!

पुन्हा शेट्टींभोवती पिंगा

हातकणंगले मतदारसंघात ठळक असे नाव चर्चेत पुढे आले नाही. साहजिकच समविचारी उमेदवार शोधण्याचा पर्याय शोधला गेला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्याबाबत भूमिका चव्हाण यांनी जाणून घेतली. त्यावर शेट्टी यांच्याशी हातमिळवणी करावी आणि ती टाळण्यात यावी अशा संमिश्र भावना व्यक्त करण्यात आल्या. तर पृथ्वीराज चव्हाण यांनी आगामी लोकसभा विधानसभा निवडणुकीसाठी मित्रपक्ष मिळवण्यासाठी काँग्रेस पक्ष प्रयत्न करीत आहे. राजू शेट्टी यांच्याशी आमचे बोलणे झाले आहे. ते नेहमी जातीयवादी पक्षांना विरोध करीत असल्याने भाजपसोबत जाणार नाहीत, असे सांगितले. मात्र शेट्टी यांच्यासोबत महाविकास आघाडीने नेमकी काय चर्चा झाली हे अद्याप उघड केलेले नाही. स्वाभिमानी शेतकरी संघटना वा शेट्टी यांच्याकडून सध्या तरी याबाबत काहीच विधान करण्यात आलेले नाही. तूर्तास शेट्टी हे प्रागतिक पक्ष या नव्या आघाडीची घडी बसवण्यात मग्न आहेत.

कोल्हापुरात टाळाटाळ

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात प्रामुख्याने काँग्रेसचे आजी – माजी अध्यक्ष अशी दोन नावे पुढे आली. कोल्हापूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष सतेज पाटील यांनी माजी अध्यक्ष आमदार पी. एन. पाटील यांनी लोकसभा निवडणूक लढवावी असे सुचवले. याउलट पी. एन. पाटील यांनी मागील लोकसभा निवडणुकी वेळी तुम्ही निवडून दिलेले खासदार बाजूला गेले असल्याने आता लोकसभा निवडणूक तुम्हीच लढवावी, असे म्हणत सतेज पाटील यांना गळ घातली. उमेदवारीची माळ आपल्या गळ्यातून दुसऱ्याच्या गळ्यात घालण्याचा प्रकार सुरू झाला आहे. नेतेच अशी टाळाटाळ करीत असतील तर कार्यकर्त्यांनी नेमका कोणता बोध घ्यायचा असा प्रश्न उपस्थित झाला आहे. मुंबई येथे लोकसभा निवडणुकीची आढावा बैठक झाली. तेव्हाही असाच प्रकार घडला होता. हे पाहता जिल्ह्यात काँग्रेसचे पाच आमदार असताना आणि जिल्ह्यातील सर्वात प्रबळ पक्ष असा दावा केला असताना लोकसभेची उमेदवारी टाळण्याचे हे डावपेच काँग्रेसच्या अस्तित्वावर शंका उपस्थित करणारे ठरले आहे.

हेही वाचा – एका बाजूला ‘राजकीय धोंडे’ तर दुसरीकडे विकासावर मंथन

काँग्रेस – बीआरएस सामना

आगामी निवडणुकीत महाराष्ट्रात काँग्रेस पक्ष कर्नाटक फॉर्मुला राबवणार आहे. महाविकास आघाडीमधील सर्व पक्ष एकत्रपणे भाजपला विरोध करणार आहेत, असा उल्लेख करताना पृथ्वीराज चव्हाण यांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची भारत राष्ट्र समिती (बीआरएस) ही भाजपची बी टीम आहे. बीआरएसला सर्व रसद भाजपच्या वतीने देण्यात येत आहे. तेलंगणामधील निवडणुका काँग्रेस पक्ष भक्कमपणे उभारून तेथे विजय मिळवणार आहे, असा दावा केला आहे. चव्हाण यांनी हे विधान केल्यानंतर बीआरएसकडून त्यांच्या विरोधात कडवट प्रतिक्रिया उमटली.

पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असतान शेतीच्या हितासाठी काय केले हे सांगावे. शेतकऱ्यांच्या नरडीचा फास लागण्याचे काम काँग्रेसच्या कार्यकाळात झाले आहे हे त्यांनी विसरू नये. काँग्रेसचे लोक बाहेर जात असताना त्याला कसे रोखता येईल हे चव्हाण यांनी आधी पहावे, असे म्हणत बीआरएसचे माणिक कदम यांनी डिवचले आहे. तेलंगणामध्ये बीआरएसचा मुख्यमंत्री होणारच आहे पण महाराष्ट्रातही पक्षाचा मुख्यमंत्री होईल, असा दावा केला आहे. त्यामुळे तेलंगणानावरून काँग्रेस विरुद्ध बीआरएस असा राजकीय सामना रंगताना दिसत आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress claims both lok sabha seats in kolhapur but no one wants to be a candidate print politics news ssb