मुंबई: काँग्रेस पक्षाने कर्नाटक, तेलंगणा विधानसभेवेळी दिलेल्या हमीची अंमलबजावणी केली जात नाही अशा पद्धतीच्या भाजपने प्रसिद्ध केलेल्या जाहिरातींवरून काँग्रेसने गुरुवारी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली. या तक्रारीवर चौकशी केली जाईल, असे निवडणूक आयोगाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
काँग्रेसच्या प्रसारमाध्यमे व प्रसिद्धी विभागाचे अध्यक्ष पवन खेरा यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या शिष्टमंडळाने निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली. भाजपच्या जाहिरातीतून काँग्रेसचा अपप्रचार झाला असून याविरोधात निवडणूक आयोगाने भाजपवर कारवाई करावी, एफआयआर दाखल करावा, अशी मागणी पक्षाच्या वतीने करण्यात आली.
हेही वाचा >>>त्र्यंबकनगरीत पूजाअर्चेसाठी उमेदवारांची गर्दी वाढली
राज्यातील प्रमुख वर्तमानपत्रात पहिल्या पानावर भाजपने काँग्रेसविरोधात खोट्या जाहिराती प्रसिद्ध केल्या. काँग्रेस पक्षाने दिलेली योजनांची हमी लागू केली नाही, असा अपप्रचार करण्यात आला आहे. याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्यात आल्याचे ते म्हणाले. अशी तक्रार काँग्रेसकडून देण्यात आली असल्याचे निवडणूक आयोगाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. काँग्रेसने तक्रार केली असून त्याची चौकशी केली जाईल. चौकशीअंती पुढील कारवाई केली जाईल, असे या अधिकाऱ्याने स्पष्ट केले.
हेही वाचा >>>Rahul Gandhi : राहुल गांधींनी महाराष्ट्र विधानसभा निवडणूक प्रचाराची सुरुवात विदर्भापासून का केली?
शिष्टमंडळात प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, माध्यम प्रभारी सुरेंद्र राजपूत, चयनिका उनियाल, सचिन सावंत, चरणजित सप्रा, विधि विभागाचे प्रदेशाध्यक्ष अॅड. रवी जाधव आदी उपस्थित होते.
‘पराभव दिसू लागल्याने भाजपकडून आरोप’
भारत जोडो यात्रेविषयीच्या आरोपाविषयी बेलताना अतुल लोंढे यांनी भाजपला पराभव दिसू लागल्याने असे आरोप केले जात असल्याचे म्हटले. निवडणुकीत पराभव होत असल्याचे दिसू लागतात असे अहवाल बाहेर काढले जातात. दलित, आदिवासी, गरीब, महिला, शेतकरी व युवकांचे प्रश्न उपस्थित होताच अशा प्रकारे सनसनाटी निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अशी वक्तव्ये करीत असल्याचे ते म्हणाले.