काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्याविरोधात भाजपाने आक्रमक भूमिका घेतल्यानंतर आता काँग्रेसकडूनही केंद्र सरकारवर प्रतिहल्ला करण्यात येत आहे. काँग्रेसचे सरचिटणीस राज्यसभेचे खासदार जयराम रमेश यांनी सीबीआयला पत्र लिहून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना चौकशीसाठी बोलविण्याची मागणी केली आहे. मेघालय विधानसभेच्या निवडणुकीआधी अमित शहा यांनी मेघालयमधील नॅशनल पिपल्स पार्टीच्या (NPP) मुख्यमंत्री कोनराड संगमा यांच्या नेतृत्वाखालील सरकारला सर्वात भ्रष्ट सरकार असल्याचे म्हटले होते.
काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी सीबीआयचे संचालक सुबोधकुमार जयस्वाल यांना २१ मार्च रोजी पत्र लिहिले आहे. ते म्हणाले की, केंद्रीय गृहमंत्री असलेल्या अमित शहांनी मेघालयचे सरकार सर्वात भ्रष्ट असल्याचा आरोप केला, याचा अर्थ त्यांच्याकडे काहीतरी माहिती किंवा असा आरोप करण्यासाठी ठोस कारण असणार. मग या आरोपांवर कारवाई करण्यासाठी त्यांनी कुचराई का केली? असा आरोप काँग्रेसने लावला आहे. अमित शहा यांनी १७ फेब्रुवारी रोजी सदर आरोप केला होता.
हे वाचा >> मोदींचा ‘तो’ उद्धार राहुल गांधींना पडला महाग; दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा
जयराम रमेश म्हणाले, “केंद्रीय गृहमंत्री असल्यामुळे अमित शहा यांच्याकडे निश्चितच ठोस आणि खात्रीशीर माहिती मिळण्याचा स्त्रोत आहे. त्या आधारावरच त्यांनी हे वक्तव्य केले असणार. भाजपाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष राहिलेले आणि आता केंद्रीय गृहमंत्री पदाची जबाबदारी पार पाडणारे अमित शहा यांनी ते वक्तव्य केल्यानंतर मात्र कारवाई करण्यात कुचराई केलेली आहे. त्यामुळेच देशाच्या हिताचा विचार करता आम्ही विनंती करतो की, अमित शहा यांनी केलेल्या वक्तव्याबाबत त्यांच्याकडून पुरावे मागण्यात यावेत. त्यांनी दिलेल्या माहितीचे विश्लेषण करून त्याची चौकशी झाली पाहीजे.”
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना दिल्ली पोलिसांनी नोटीस दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी जयराम रमेश यांनी हा आरोप केला आहे. राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेचा समारोप श्रीनगर येथे करत असताना एका बलात्कार पीडितेचा उल्लेख करून तिने सांगितलेली व्यथा आपल्या भाषणात मांडली होती. दिल्ली पोलिसांच्या या नोटिशीबाबत बोलताना काँग्रेसने सत्ताधाऱ्यांवर दडपशाही आणि राजकीय सूडाचा आरोप लावला. राहुल गांधी यांनी श्रीनगरमधील भाषणात सांगितले होते की, दिल्लीमधील एका मुलीने तिच्यावर झालेल्या अत्याचाराबाबत माझ्याकडे वाच्यता केली होती. जेव्हा पोलिसांना याबाबत माहिती देऊ असे सांगितल्यानंतर मुलीने नकार दिला. तिला पोलिसांची भीती वाटते, असा आरोप राहुल गांधी यांनी केला होता.
या नोटिशीबाबत प्रतिक्रिया देताना राहुल गांधी म्हणाले की, पोलिसांनी केलेल्या कार्यवाहीला काहीच अर्थ नाही. मी संसदेत आणि संसदेच्या बाहेर अदाणी प्रकरणावर बोललो त्याच्याशी याचा संबंध आहे का? असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला.