काँग्रेस पक्षाचे चाणक्य, संकटमोचक अशी ओळख असलेले नेते म्हणजे अहमद पटेल. सोनिया गांधी यांचे सल्लागार असलेले अहमद पटेल हे पडद्यामागून सूत्र हलविण्यात वाकबगार मानले जात. २५ नोव्हेंबर २०२० रोजी त्यांचे निधन झाले. त्याआधी २०१९ मध्ये त्यांनी महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. काँग्रेस आणि गांधी घराण्याशी जवळीक असलेल्या अहमद पटेल यांच्या कुटुंबातील पुढच्या पिढीत मात्र काँग्रेसबाबत संमिश्र भावना आहे. त्यांचे सुपुत्र फैजल पटेल यांनी १३ फेब्रुवारी रोजी एक्सवर पोस्ट टाकत काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्याचे जाहीर केले. पक्षावर वैयक्तिक राग आणि निराशेतून पक्षाचे काम सोडत असल्याचे त्यांनी जाहीर केले. त्याचवेळी त्यांची बहीण मुमताज मात्र काँग्रेसमध्ये अद्याप सक्रिय आहे.

मुमताज पटेल गुजरातमध्ये काँग्रेस पक्षासाठी प्रचार करत असतानाच फैजल पटेल यांनी गुरुवारी एक्सवर पोस्ट टाकत काँग्रेसपासून फारकत घेतली. त्यांनी पोस्टमध्ये लिहिले, अतिशय निराशा आणि क्रोधातून मी काँग्रेस पक्षाचे काम करणे थांबविण्याचा निर्णय घेत आहे. अनेक वर्षांपासूनचा कठीण प्रवास मी थांबवत आहे. माझे दिवंगत वडील अहमद पटेल यांनी आपले संपूर्ण आयुष्य देशासाठी, पक्षासाठी आणि गांधी कुटुंबासाठी दिले. मी त्यांच्या पावलावर पाऊल ठेवण्याचा प्रयत्न केला. पण प्रत्येक पावलावर मला नकार मिळाला. यापुढे मी समाजासाठी काम करण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेस यापुढेही माझा परिवार म्हणून राहिल.

फैजल यांनी पक्षापासून फारकत घेतली असली तरी मुमताज पटेल या भरूच जिल्ह्यातील पांडवी तालुका पंचायतीच्या पोटनिवडणूक आणि संतरामपूर महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त आहेत. मुमताज काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या आणि अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या सदस्या आहेत.

अहमद पटेल यांच्या दोन्ही मुलांनी वेगवेगळा मार्ग निवडल्यामुळे फैजलच्या निर्णयाची जोरदार चर्चा होत आहे. फैजल यांनी सध्या दुसऱ्या कोणत्याही पक्षात जाणार नसल्याचे संकेत दिले असले तरी राज्यातील काँग्रेस नेत्यांना याबाबत शंका वाटते. कारण मागच्यावर्षी लोकसभा निवडणूक झाल्यापासून ते पक्षात सक्रिय नव्हते. गुजरात काँग्रेसच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितले की, फैजल पटेल यांच्या घोषणेचा काहीच अर्थ नाही कारण ते पक्षाचे प्राथमिक सदस्यही नव्हते.

हार्वर्ड बिझनेस स्कूलचे विद्यार्थी आणि कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मोठ्या सांख्यिकेवर काम करणारे फैजल हे व्यावसायिक असून आता ते वडिलांनी स्थापन केलेल्या ट्रस्टच्या माध्यमातून सामाजिक कार्यात स्वतःला झोकून देणार आहेत. पटेल कुटुंबाच्या जवळच्या सूत्रांनी सांगितले की, फैजलने राजकारणापासून दूर जाण्याचा निर्णय त्याच्या वडिलांइतकाच राजकीय प्रभाव असलेल्या लोकांच्या सांगण्यावरून घेतला आहे. मध्य गुजरातमधील अहमद पटेल यांच्या जवळच्या सहकाऱ्याने सांगितले की, फैजल यांचा सामाजिक कार्याकडे अधिक लक्ष आहे. तर मुमताज यांच्यात त्यांच्या वडिलांचा वारसा पुढे नेण्याची राजकीय क्षमता आहे.

भाऊ फैजलच्या राजकीय निवृत्तीबाबत प्रश्न विचारला असता मुमताज म्हणाल्या की, हा त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे. तसेच फैजल आणि त्यांच्या राजकीय दृष्टीकोनात फरक असला तरी वडिलांचा वारसा पुढे नेण्यात आम्ही दोघेही वचनबद्ध आहोत, असेही त्या म्हणाल्या. “आम्ही एकाच कुटुंबात राहतो आणि आम्ही दोघांनीही वेगवेगळ्या मार्गाने वडिलांचा वारसा पुढे नेण्याचे ठरविले आहे. फैजल सामाजिक कार्यात लक्ष देतील तर मी वडिलांप्रमाणेच राजकारणावर लक्ष केंद्रित करणार आहे”, असे मुमताज यांनी सांगितले.

तसेच मागच्या वर्षी लोकसभा निवडणुकीदरम्यान भरूचमध्ये सक्रिय राहिल्यानंतरही काँग्रेसने ही जागा आम आदमी पक्षाला सोडली होती. त्या म्हणाल्या, काँग्रेसने मला भरूचमधून तयारी करण्यास सांगितले होते. तरीही ही जागा ‘आप’ला देण्यात आली. पक्षाच्या निर्णयामुळे नाराज झाले तरी मी पक्षाची साथ सोडली नाही. तसेच भावंडांमध्ये काही मतभेद आहेत, या प्रश्नावर बोलताना त्या म्हणाल्या, फैजल आणि माझ्यात कोणतेही वाद नाहीत. लोकसभा निवडणुकीच्या वेळेस काही विषय झाले होते, पण ते तात्कालिक होते. आता मी पक्षाच्या धोरणानुसार काम करत आहे.

गुजरात काँग्रेसचे प्रवक्ते मनीष दोशी यांनी सांगितले की, फैजल आणि मुमताज हे अहमद पटेल यांची मुले असले तरी ते काँग्रेस कुटुंबाचाही भाग आहेत. मुमताज या काँग्रेसच्या सक्रिय सदस्य आहेत. तर फैजल वडिलांचा वारसा सामाजिक कार्यातून पुढे नेणार आहेत. काँग्रेससाठी तेही तितकेच महत्त्वाचे आहे.

Story img Loader