साधारण ५० दिवसांपासून मणिपूर राज्यात हिंसाचाराच्या घटना घडत आहेत. दोन समुदायांमध्ये झालेल्या वादामुळे येथे तणावाचे वातावरण निर्माण झालेले आहे. या दंगलींमुळे आतापर्यंत अनेक नागरिकांचा मृत्यू झाला असून, शेकडो लोकांना स्वत:चे घर सोडून सुरक्षित ठिकाणी जावे लागले आहे. दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी नुकतेच सर्वपक्षीय नेत्यांची बैठक घेतली. या बैठकीत मणिपूरमधील तणाव आणि हिंसेवर मार्ग काढण्यावर चर्चा करण्यात आली. दरम्यान, मणिपूरमधील परिस्थितीवरून काँग्रेस पक्ष भाजपाला लक्ष्य करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मणिपूर हिंसाचारावर अद्याप भाष्य केलेले नाही. यामुळेही काँग्रेसकडून मोदी यांच्यावर टीका केली जात आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मणिपूरचे मुख्यमंत्री बिरेन सिंह हे अकार्यक्षम, काँग्रेसची टीका

अमित शाह यांनी मणिपूरमधील परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी बैठक बोलावली होती. या बैठकीत अमित शाह यांनी मणिपूरमधील परिस्थितीत सुधारणा होत आहे. लवकरच तेथील जनजीवन पूर्वपदावर येईल, असे विरोधकांना आश्वासन दिले. मात्र मणिपूरमध्ये विरोधकांनी शांतता परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी काँग्रेसने मणिपूरचे मुख्यमंत्री बिरेन सिंह हे अकार्यक्षम असल्याचा दावा केला. तसेच सिंह यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी केली. या परिषदेला साधारण १० विरोधी पक्षाचे नेते उपस्थित होते.

बैठकीतून काहीही साध्य झाले नाही- ईबोबी

काँग्रेसचे वरिष्ठ नेते जयराम रमेश यांनी पक्षातर्फे मणिपूर परिस्थितीवर भाष्य केले आहे. “बिरेन सिंह हे अकार्यक्षम मुख्यमंत्री आहेत. त्यांच्या नेतृत्वामध्ये मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित केली जाऊ शकत नाही,” असे जयराम रमेश म्हणाले. मणिपूरचे माजी मुख्यमंत्री ओकराम ईबोबी यांनीदेखील अमित शाह यांनी आयोजित केलेल्या सर्वपक्षीय बैठकीतून काहीही साध्य झाले नसल्याचा आरोप केला. तसेच या बैठकीत मत मांडण्यासाठी मला पुरेसा वेळ देण्यात आला नाही, असा आरोपही त्यांनी केला.

…तोपर्यंत मणिपूर धुमसतच राहणार- जयराम रमेश

जयराम रमेश यांनी पतंप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही टीका केली. नरेंद्र मोदी शांत आहेत आणि तिकडे मणिपूर राज्य जळत आहे. अमित शाह हेदेखील अकार्यक्षम असल्याचे जयराम रमेश म्हणाले. “जोपर्यंत बिरेन सिंह मुख्यमंत्रीपदावर कायम राहतील, तोपर्यंत मणिपूर राज्य धुमसतच राहणार आहे. मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित करायची असेल तर बिरेन सिंह यांना मुख्यमंत्रीपदावरून तत्काळ हटवले पाहिजे. कोणताही भेदभाव न करता शस्त्रधारी गटांना शस्त्र टाकून देण्यास परावृत्त केले पाहिजे. तेथे विश्वास, सौहार्दाचे वातावरण निर्माण करायला हवे,” असे जयरम रमेश म्हणाले.

शांतता प्रस्थापित करण्याची प्रक्रिया लवकर सुरू करायला हवी- जयराम रमेश

“तुमची विचाधारा वेगळी असली तर एखाद्या विषयावर एकमत होऊ शकते. हाच विचार घेऊन संविधानाची निर्मिती करण्यात आलेली आहे. त्यामुळे सर्वांची बाजू ऐकून आणि लोकांमध्ये विश्वास संपादन करूनच तेथे शांतता प्रस्थापित केली जाऊ शकते. ही एक दीर्घ प्रक्रिया आहे. त्याला काही आठवडे, महिने किंवा वर्षेदेखील लागू शकतात. मात्र आपल्याला या प्रक्रियेस सुरुवात करावी लागेल,” असेही जयराम रमेश म्हणाले.

इबोबी सिंह यांना तेथे सुव्यवस्था पुर्नस्थापित करण्यास १० वर्षे लागली. त्यानंतर आता तेथे विकासाची प्रक्रिया सुरू झालेली आहे. मणिपूर राज्य विविधतेतील एकता यासाठी ओळखले जाते. त्यामुळे या राज्यातील परिस्थिती लवकरात लवकर पूर्वदावर यावी अशी आम्हाला आशा आहे, असेही जयराम रमेश म्हणाले.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress criticizes bjp amit shah narendra modi on manipur violence prd