काही दिवसांपासून इंडिया आघाडीच्या घटक पक्षांत लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जागावाटपावर चर्चा सुरू आहे. मात्र, त्यापूर्वी उत्तर प्रदेशमधील समाजवादी पक्षाने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीमुळे आता इंडिया आघाडीतील मतभेद आणखी वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, समाजवादी पक्षाच्या निर्णयावर काँग्रेसनेही प्रतिक्रिया दिली आहे. “आम्ही विनम्र आहोत; पण लाचार नाही”, असे त्यांनी म्हटले आहे.
राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा १४ फेब्रुवारी रोजी उत्तर प्रदेशमध्ये दाखल होणार आहे. त्यापूर्वी काँग्रेसकडून जोरदार तयारी सुरू आहे. त्याबाबत बुधवारी काँग्रेसचे सरचिटणीस व उत्तर प्रदेश काँग्रेसचे प्रभारी अविनाश पांडे यांनी लखनऊ येथे काँग्रेस कार्यकर्त्यांबरोबर बैठक घेतली. यावेळी बोलताना त्यांनी समाजवादी पक्षाच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली.
हेही वाचा – २०२० पासून हेमंत सोरेन आरोपांच्या कचाट्यात; निवडणूक आयोगानेही केली होती अपात्रतेची शिफारस
समाजवादी पक्षाचा निर्णय हा एकतर्फी आहे आणि तो काँग्रेस कार्यकर्त्यांना मान्य नाही. या निर्णयामुळे काँग्रेस कार्यकर्ते नाराज आहेत. तसेच पक्षातील नेत्यांमध्येही नाराजी आहे. एकीकडे आपण जागावाटपाबाबत चर्चा करतोय; तर दुसरीकडे तुम्ही एकतर्फी निर्णय घेत आहात. आघाडी धर्माचे पालन करणे आपल्या सर्वांची जबाबदारी आहे; मात्र समजावादी पक्षाकडून त्याचे पालन केले जात नाही, अशी टीका अविनाश पांडे यांनी केली.
यावेळी बोलताना त्यांनी या निर्णयामागे भाजपाचा हात असल्याचाही आरोप केला. समाजवादी पक्षाने जी यादी जाहीर केली आहे, त्यापैकी काही जागांवर सखोल चर्चा झाली आहे; तर काही जागांवर अजूनही चर्चा सुरू आहे. अशा वेळी त्या जागांवर उमेदवार जाहीर होणे यात भाजपाचं काही षडयंत्र असू शकतं. कदाचित ही यादी अखिलेश यादव यांना न सांगता, प्रकाशित केली गेली असावी; अन्यथा ते असा निर्णय घेणार नाहीत. हा एक प्रकारे इंडिया आघाडीला कमकुवत करण्याचा प्रयत्न आहे, असे ते म्हणाले.
या संदर्भात द इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना उत्तर प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अजय राय म्हणाले, “या संदर्भात पक्षाचे वरिष्ठ नेते निर्णय घेतील. आम्ही त्यांच्या सूचनांचं पालन करू. मात्र, समाजवादी पक्षाच्या या निर्णयामुळे काँग्रेसचे कार्यकर्ते नक्कीच नाराज झाले आहेत. काँग्रेसमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसला ८० पैकी २५ ते ३० जागा मिळण्याची अपेक्षा आहे.”
काँग्रेसच्या या टीकेनंतर समाजवादी पक्षानेही प्रत्युत्तर दिले आहे. या संदर्भात बोलताना, समाजवादी पक्षाचे प्रवक्ते राजेंद्र चौधरी म्हणाले, “समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी मोठं मन दाखवून काँग्रेसला ११ आणि आरएलडीला सात जागा देण्याचा निर्णय घेतला आहे. असं असताना काँग्रेसकडून अशा प्रकारची विधानं का केली जात आहेत, ते आम्हाला अजूनही समजलेलं नाही. अशा गोष्टींकडे लक्ष देण्यापेक्षा आपण आता निवडणुकीच्या तयारीवर लक्ष्य केंद्रित करायला हवं. समाजवादी पक्षाने जाहीर केलेल्या काही जागांवर चर्चा सुरू असल्याचा दावा काँग्रेसतर्फे करण्यात आला होता.” या संदर्भात विचारले असता, अशी कोणतीही चर्चा सुरू नाही, असे ते म्हणाले.
दरम्यान, काँग्रेस आणि समाजवादी पक्षाने जागावाटपावरून एकमेकांवर केलेल्या टीका-टिप्पणीनंतर हा वाद वाढेल का? हे बघणे महत्त्वाचे आहे.