हरियाणामध्ये नुकत्याच नगरपालिका निवडणुका पार पडल्या. काँग्रेसने या निवडणुका न लढवण्याचा निर्णय घेतला होता. काँग्रेसने या निवडणुका न लढवण्याचा घेतलेला निर्णय आम आदमी पक्षाच्या पथ्यावर पडणार असे दिसून येते आहे. याचा थेट फायदा ‘आप’ला होण्याची दाट शक्यता आहे. १९ जून रोजी हरियाणामध्ये ४६ नगरपालिकांची निवडणूक झाली. २२ जून रोजी या निवडणुकांचे निकाल जाहीर होणार आहेत. या निवडणुकीत काँग्रेसने एकही उमेदवार उभा केला नसला तरी काही उमेदवार मात्र पक्षाच्या पाठिंब्याने निवडणूकीच्या रिंगणात उतरले आहेत. भाजपा आणि जेजेपी युती २२ तारखेला लागणाऱ्या निकलाबाबत उत्सुक आहे तर आम आदमी पक्ष त्यांच्या टार्गेटवर असणाऱ्या हरियाणामध्ये मजबूत पाय रोवण्याच्या तयारीत आहे. काँग्रेसने घेतलेला निर्णय ‘आप’साठी हरियाणामध्ये महत्वाची राजकीय पायरी ठरण्याची शक्यता आहे. हरियाणाच्या दोन्ही बाजूला असलेल्या दिल्ली आणि पंजाब या राज्यांमध्ये आम आदमी पक्षाची सत्ता आहे. 

जिल्हा आणि बूथ पातळीवर कार्यकर्ते उपलब्ध नसल्याचे कारण सांगत काँग्रेसने या निवडणुकीपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला होता. देशात भाजपानंतर सर्वात मोठा पक्ष असणाऱ्या काँग्रेसला हरियाणामध्ये पक्षांतर्गत वादामुळे खीळ बसली आहे. गेल्या सात आठ वर्षांत ते हरियाणात मजबूत संघटनात्मक बांधणी करू शकले नाहीत. पक्षाचे प्रभारी विवेक बंसल यांच्या म्हणण्यानुसार उदयपूर इथे झालेल्या चिंतन शिबिरात देण्यात आलेल्या सूचनांनुसार निर्णय घेण्यात येत आहेत. 

काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आणि माजी मुख्यमंत्री भुपिंदरसिंग हुड्डा यांनी पक्षाच्या नगरपालिका निवडणुका न लढवण्याच्या निर्णयाचे समर्थन केले आहे. हरियाणामध्ये पक्षाने कधीही नगरपालिका निवडणुका त्यांच्या चिन्हावर लढवल्या नाहीत आणि आता संघटित कार्यकर्त्यांचा अभाव असताना तसे करणे मूर्खपणाचे ठरले असते असे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान आम आदमी पक्ष काँग्रेसमधील अस्वस्थतेचा फायदा करून घेण्याच्या प्रयत्नात आहे. २०१९ ची लोकसभा आणि विधानसभा निवडणूक लढल्यानंतर ‘आप’ आता स्थानिक पातळीवर पाय रोवण्याच्या तयारीत आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत आप ने ९० पैकी ४६ जागांवर निवडणूक लढवली होती. त्यांचा एकही उमदेवार निवडून आला नाही. त्यांच्या जवळजवळ सर्वच उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली होती. ‘आप’ला मिळालेल्या मतांचा वाटा हा ०.४८ टक्के इतका होता. लोकसभा निवडणुकीतही ‘आप’ची कामगिरी फारशी चांगली नव्हती. ‘आप’मधील सूत्रांनी ‘द इंडियन एक्सप्रेस’ला दिलेल्या माहितीनुसार आप त्यांच्या चिन्हावर निवडणूक लढवून पक्षाच्या कार्यकर्त्यांवर पकड मजबूत करण्यासाठी प्रयत्न करत आहे. केंद्र सरकारवर असलेल्या नाराजीचा फायदा होईल अशी अपेक्षा ‘आप’ला आहे.