छत्तीसगडमध्ये काही महिन्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. तत्पूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते टीएस सिंह देव यांनी मात्र राज्याच्या राजकारणात गोंधळाची स्थिती निर्माण केली आहे. काँग्रेस एका बाजूला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीकास्र सोडत असताना दुसरीकडे उपमुख्यमंत्री टीएस सिंह देव यांनी गुरुवारी (१४ सप्टेंबर) रायगड (छत्तीसगडमधील) येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमवेत कार्यक्रमाला हजेरी लावली. एवढेच नाही तर या कार्यक्रमात त्यांनी मोदींवर स्तुतीसुमने उधळली, ज्यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रायगडमधील कार्यक्रमानंतर मात्र एका जाहीर सभेत पंतप्रधान मोदी यांनी काँग्रेस सरकार आणि विरोधकांच्या इंडिया आघाडीवर जोरदार टीका केली. उपमुख्यमंत्री डीएस सिंह देव यांच्याकडे आरोग्य खात्याचा पदभार आहे. रायगड येथे झालेल्या कार्यक्रमात मोदी यांनी छत्तीसगडमधील रेल्वे आणि आरोग्य विभागाशी निगडित काही योजनांची घोषणा केली. उपमुख्यमंत्री सिंह देव आपल्या भाषणात म्हणाले, “तुम्ही आज इथे काहीतरी देण्यासाठी आला आहात, तुम्ही आजवर छत्तीसगडला खूप काही दिले आहे आणि मला विश्वास आहे की, भविष्यातही आपण आम्हाला खूप काही देत राहाल.”

हे वाचा >> छत्तीसगड, मध्य प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीकडे भाजपाचे विशेष लक्ष; कमकुवत जागांसाठी आखणार विशेष रणनीती!

पंतप्रधान मोदी यांनी छत्तीसगडला रेल कॉरिडोर, नऊ क्रिटिकल केअर ब्लॉक्स आणि सिकल कार्ड (आदिवासी नागरिकांना सिकल सेल आजाराशी लढण्यासाठी दिले जाणारं ओळखपत्र) देऊन रुग्णांना चांगले उपचार देण्याचा प्रयत्न केला आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री सिंह देव यांनी पंतप्रधानांचे आभार व्यक्त केले. सिकल सेल ॲनिमिया या आजाराचे प्रमाण मुख्यत्वे करून आदिवासी आणि मागासवर्गीय समुदायातील लोकांमध्ये अधिक दिसते. सिंह देव पुढे म्हणाले, “आम्ही नेहमीच केंद्र सरकारच्या मार्गदर्शनाखाली काम करत आलो आहोत आणि माझ्या अनुभवानुसार मला कधीही केंद्राकडून पक्षपात झाल्याचे जाणवले नाही, हे सांगायला मला कमीपणा वाटत नाही. जेव्हा जेव्हा राज्यासाठी आम्ही काहीही मदत मागितली, तेव्हा तेव्हा केंद्र सरकारने कधीही नकार न देता मदत देऊ केली आहे. यापुढेही राज्य आणि केंद्र सरकार हातात हात घालून काम करेल आणि राज्य व देशाला पुढे नेण्याचा प्रयत्न करेल.”

उपमुख्यमंत्री सिंह देव यांनी प्रशंसा करताच मंचावर बसलेल्या पंतप्रधान मोदी यांनी हात जोडून, शिर झुकवून त्यांच्या भावनांचा स्वीकार आणि भाषणानंतर सिंह देव यांच्याशी हात मिळवून त्यांना धन्यवाद दिले. या दोन्ही नेत्यांच्या भेटीचा व्हिडीओ भाजपाकडून जोरदार व्हायरल करण्यात आला. यामुळे काँग्रेससमोर मात्र अडचण निर्माण झाली. उपमुख्यमंत्री देव सिंह यांनी द इंडियन एक्सप्रेसशी बोलताना सांगितले, “आपल्या राज्यात पाहुणचार करण्याची पद्धत आहे. सरकारी कार्यक्रम असल्यामुळे व्यासपीठाला साजेसे भाषण करताना पंतप्रधानांबद्दल आदर व्यक्त केला गेला. त्या व्यासपीठावर मला आरोप-प्रत्यारोपात पडणे योग्य वाटले नाही. माझे वक्तव्य केवळ माझ्या खात्याशी संबंधित योजनांपुरते मर्यादित होते.”

तथापि, काही राजकीय जाणकारांच्या मते काँग्रेसमध्ये सर्व काही आलबेल नसल्याचे हे द्योतक आहे. २०१८ साली छत्तीसगडमध्ये काँग्रेसची सत्ता आल्यानंतर सिंह देव यांना स्वतःला मुख्यमंत्री व्हायचे होते, मात्र भूपेश बघेल मुख्यमंत्रीपद मिळवण्यात यशस्वी झाले. तेव्हापासून या दोन्ही नेत्यांमध्ये एकमेकांबद्दल अधूनमधून नाराजीचे सूर उमटताना दिसले आहेत. सिंह देव यांना उपमुख्यमंत्रीपद देऊन दोन्ही नेत्यांमधील राजकीय कुरघोडी शांत केल्याची चर्चा काँग्रेस वर्तुळात होती.

हे वाचा >> छत्तीसगडच्या निवडणुकीसाठी भाजपाकडून २१ उमेदवारांची यादी जाहीर; भूपेश बघेल यांच्या पराभवासाठी आखली खास रणनीती!

भाजपाने सिंह देव आणि पंतप्रधान मोदी यांच्या भेटीचा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करून त्याखाली कॅप्शन लिहून मुख्यमंत्री भूपेश बघेल यांना टोला लगावला आहे. “केंद्र सरकारबाबत राज्यातील जनतेची दिशाभूल केल्याप्रकरणी तुम्ही छत्तीसगडची माफी कधी मागणार?”, असा प्रश्न या कॅप्शनद्वारे बघेल यांना विचारण्यात आला आहे.

काँग्रेस प्रवक्त्याने या प्रकरणावर भाष्य करताना सांगितले की, सिंह देव यांच्या वक्तव्यातून इतर काही अर्थ काढण्याची आवश्यकता नाही. त्यांनी पंतप्रधानांसह शासकीय कार्यक्रमात हजेरी लावली होती. त्याप्रमाणे त्यांनी त्यांची भूमिका मांडली. तसेच पक्षाचे सोशल मीडिया विभागाचे प्रभारी सुशील आनंद शुक्ला म्हणाले की, उपमुख्यमंत्री सिंह देव हे पंतप्रधानांसह व्यासपीठावर एकत्र आल्यामुळे त्यांनी राजकीय मुत्सद्देगिरी दाखविली.

मात्र, सिंह देव यांनी मांडलेली भूमिका ही मुख्यमंत्री भूपेश बघेल मांडत आलेल्या आजवरच्या भूमिकेच्या नेमकी उलटी होती. भूपेश बघेल हे आजवर केंद्र सरकारवर आरोप करत आले आहेत. खनिज संपत्तीने समृद्ध असलेल्या छत्तीसगड राज्याला केंद्र सरकारकडून योग्य सहकार्य मिळत नसल्याचा आरोप त्यांनी केलेला आहे. नुकतेच मुख्यमंत्री बघेल म्हणाले होते, केंद्र सरकारकडून छत्तीसगडला कोळश्याच्या रॉयल्टीचे चार हजार कोटी रुपये मिळायचे बाकी आहेत. जीएसटीचा परतावा आणि केंद्रीय उत्पादन शुल्काचे येणे बाकी आहे. छत्तीसगडमधून पूर्ण भारताला कोळसा आणि स्टीलचा पुरवठा केला जातो. याच स्टील आणि कोळश्याच्या माध्यमातून वीज तयार करून मोठमोठे उद्योग उभारले जातात. पण, त्याबदल्यात छत्तीसगडला खूप कमी परतावा मिळतो.

भाजपाचे आमदार ब्रिजमोहन अग्रवाल यांनी सिंह देव यांच्या विधानाचा हवाला देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बघेल यांच्यासाठी केलेल्या टिप्पणीची आठवण करून दिली. “वाघाच्या कातड्याखाली लांडगा”, अशी टिप्पणी मोदी यांनी बघेल यांच्यासाठी केली होती, अशी आठवण अग्रवाल यांनी करून दिली. “सिंह देव यांनी हे सत्य स्वीकारले असून त्याची माहिती लोकांना करून दिली. केंद्र सरकारने कधीही छत्तीसगडसोबत भेदभाव केला नाही”, असेही ते म्हणाले.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress deputy chief minister of chhattisgarh praised pm modi bjp criticizes chief minister bhupesh baghel kvg